कोकणातील पत्रकार पुन्हा रस्त्यावर

0
698
अलिबाग- मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकऱणाचं बंद पडलेलं काम पुन्हा सुरू करावं आणि ते काम निर्धारित वेळेत पूर्ण करावं यामागणीसाठी रायगडसह कोकणातील पत्रकार मंगऴवार दिनांक 23 डिसेंबर रोजी पेण येथे ‘महामार्ग रोको’ आंदोलन करणार असल्याची माहिती रायगड प्रेस क्लबच्या पत्रकात देण्यात आली आहे.या आंदोलनाचे नेतृत्व ज्येष्ठ पत्रकार एस.एम.देशमुख करणार आहेत.
कोकणातील पत्रकारांनी सतत पाच वर्षे शांततेच्या मार्गानं आंदोलन केल्यानंतर मुंबई-गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्याच्या चौपदरीकरणाच्या कामासा 2011 मध्ये सुरूवात झाली.जून 2014 पर्यत हे काम पूर्ण करण्याचे आदेश महावीर कन्स्ट्रक्शन आणि सुप्रिम इन्फ्रास्टक्चर या ठेकेदार कंपन्यांना देण्यात आले होते.मात्र नोव्हेंबर 2014पर्यत या कंपन्यांनी चौपदरीकरणाचं 30 टक्के काम देखील पूर्ण केलेलं नाही.निर्धारित वेळेत काम पूर्ण न केल्याने या कंपन्यांना वित्त पुरवठा करणाऱ्या बॅकांनी त्याच्या कर्जाचे पुढील हाप्ते देण्यास नकार दिल्यानं या कंपन्यांनी गेल्या दीड महिन्यापासून काम बंद केले आहे.वाढलेले बजेट आणि टोल मुदत वाढून मिळण्याची शक्यता नसल्यानं या कंपन्यांनी आता आपला गाशा गुंडाळल्यातच जमा आहे.या पार्श्वभूमीवर महामार्ग चौपदरीकरणाचा प्रश्न पुन्हा एकदा टांगणीला लागलेला आहे.
एका बाजुला सागरी महामार्गाची चर्चा केली जाते,दुसरीकडं नवी मुंबई विमानतळ 2019 पर्य़त पूर्ण होईल असे वादे केले जात असताना कोकणाच्या विकासाचा महामार्ग ठरू शकणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाकडं कोणी आस्थेनं बघताना दिसत नाही.महामार्गाच्या प्रकल्पग्रस्तांचीही उपेक्षा सुरू आहे.पहिल्या टप्प्यात केवळ 192 हेक्टर जमिन संपादित करायची असताना त्यांना नवी मुंबई विमानतळासाठी जे पॅकेज दिले आहे त्याच धर्तीवर पॅकेज दिले जावे अशी मागणी केली जात आहे त्याकडंही सरकार दुर्लक्ष करीत आहे.सिडकोला पाणी पुरवठा कऱणाऱ्या पाईप लाईन बदलण्याचे कामही रखडले आहे.अशा स्थितीत सरकारला महामार्गाचे चौपदरीकरण करायचे आहे की नाही? हाच प्रश्न निर्माण झालेला आहे.नितीन गडकरी यांनी नुकतेच रत्नागिरीत दुसऱ्या टप्प्यचं काम सुरू करण्याची घोषणा केली होती.त्याची घोषणा होताच पहिल्याच टप्प्याचं काम बंद पडल्यानं कोकणातील जनतेच्या मनात संशय निर्माण झालेला आहे.मुंबई आणि पुण्याला जोडणाऱ्या सर्व महामार्गाचे विनाव्यत्यय चौपदरीकऱण झालेले असताना कोकणातून जाणाऱ्या या एकमेव महामार्गाच्या कामात वेगवेगळे अडथळे निर्माण करून सरकार कामास विलंब करीत असल्याचा कोकणी जनतेचा समज झालेला आहे.एकीकडे सरकारची ही ़अनास्था आणि दुसरीकडे दर वर्षी होणाऱ्या दीड हजारावर अपघातात 500च्या वर निष्पाप जनतेचे जाणारे बळी आणि बाराशेच्या वर प्रवासी जखमी होत असल्यानं हा महामार्ग तातडीनं चौपदरी होणं ही काळाची गरज निर्माण झाली आहे.
कोकणातील जनतेच्या याच भावना सरकारच्या कानी घालण्यासाठी रायगडसह कोकणातील पत्रकार येत्या 23 तारखेला पुन्हा एकदा महामार्ग रोको आंदोलन करणार आहेत.सकाळी 11 वाजता पत्रकार पेणमधील गाधी स्मारकाजवळ जमा होतील.तेथून ते मोर्चाने महामार्ग प्राधिकरणाच्या पेण कार्यालयावर चालून जातील.तेथे निवेदन दिल्यांनंतर मोर्चाने ते महामर्गावर येतील आणि पेण रेल्वे स्थानकासमोरच्या महामर्गावर ते ठिय्या देतील अशी माहिती रायगड प्रेस क्लबच्या प्रसिध्दी पत्रकात देण्यात आली आहे.
कोकणातील जनतेच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी सुरू असलेल्या या लढ्यात सामाजिक संघटना तसेच पत्रकारांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस संतोष पवार,कोकण विभागीय चिटणीस मिलिंद अष्टीवकर,रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुळकर्णी,रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पवार,कार्याध्यक्ष संतोष पेरणे सरचिटणीस भारत रांजनकर,पेण प्रेस क्लबचे अध्यक्ष दत्ता म्हात्रे,विजय मोकल यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here