कांबळे यांच्या वक्तव्याचा कॉग्रेसकडून निषेध

0
709

पत्रकारांना जोड्याने मारण्याची भाषा करणा-या

भाजप मंत्र्याची मस्ती जनताच उतरवेलः सचिन सावंत

दिलीप कांबळे यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा

मुंबई दि. 27 मे 2017

पत्रकारांना जोड्याने मारण्याचे शिक्षण मला माझ्या पक्षाने दिले आहे असे म्हणणा-या भाजप नेत्यांची सत्तेची मस्ती राज्यातील जनताच उतरवेल अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सावंत म्हणाले की, संपूर्ण देशात आज पत्रकारांना दहशतीखाली वावरावे लागत आहे. सरकारविरोधात लिहिणे हे मोठे पातक झाले आहे. सरकारविरोधात लिहिल्यास मोदी आणि फडणवीस सरकारला राग येतो. या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पत्रकारांबाबत जवळपास अशीच भाषा केली होती. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनीही पत्रकारांबाबत अशी भाषा वापरली होती. दिलीप कांबळे हे आपण डेंजर असून आपल्याला पक्षाने ही शिकवण दिल्याचे सांगत आहेत. लोकशाहीत मंत्र्यांनी पत्रकारांना संरक्षण देण्याची भाषा केली पाहिजे पण भाजपचे मंत्री पत्रकारांना जोड्याने मारण्याची भाषा करून लोकशाहीचे धिंडवडे काढत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष शेतक-यांना साले म्हणतात. डोक्यात सत्तेची नशा गेल्याने अशी भाषा येऊ शकते असे सावंत म्हणाले.

सध्या देशातील आणि राज्यातील पत्रकारांना कठीण काळातून जावे लागते आहे. अशा वेळी काँग्रेस पक्ष लोकशाहीचा चौथा स्तंभ असणा-या माध्यामांना आणि माध्यम प्रतिनिधींना निर्भिडपणे काम करता यावे म्हणून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. सत्तेत असताना काँग्रेस पक्षावरही टीका होत होती. संविधानाने लोकशाहीत निर्भीडपणे लिहिण्याचा अधिकार दिला आहे काँग्रेस पक्षाने कायमच त्या अधिकाराचा आणि माध्यमांच्या स्वातंत्र्याचा सन्मान राखला आहे. पत्रकारांना जोड्याने मारण्याची भाषा करणारे आणि शेतक-यांना साले म्हणणा-या भाजप नेत्यांची सत्तेची मस्ती गोरगरिब दलित आणि शेतकरी उतरवल्याशिवाय राहणार नाहीत. मोदी सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्याच्या मुहूर्तावर महानगरपालिका निवडणुकीत जनतेने काँग्रेस पक्षाला कौल देऊन ही प्रक्रिया सुरु केली आहे. कांबळे यांच्या वक्तव्यावरून फडणवीस सरकारचे मंत्रीमंडळ कोणत्या दर्जाचे आहे ते जनतेला कळून येत आहे. पत्रकारांना जोड्याने मारण्याची भाषा करणा-या दिलीप कांबळे यांची मंत्रीमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here