अलिबागःरायगड आणि मावळ लोकसभा मतदार संघात शेकापला आपली मतं सुनील तटकरे आणि पार्थ पवार यांच्याकडं वळविता आलेली नाहीत.’शेकाप तुमच्या पाठिशी असल्याने दोन्ही मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार प्रचंड मताधक्यानं विजयी होतील’ असा विश्‍वास जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना दिला होता.मात्र तसे झाले नाही.सुनील तटकरे यांचा जेमतेम विजय झाला तर मावळमध्ये पार्थ पवार यांचा लाजीरवाणा पराभव झाला.त्यामुळं शेकापची झाकली मुठ उघडी पडली.ं’शेकापची जिल्हयातील अडीच लाख मतं नेमकी कोणाच्या पारडयात पडली’? असा प्रश्‍न विश्‍लेषक विचारू लागले.शेकापचा बालेकिल्ल्ला असलेल्या अलिबागमध्ये देखील जयंत पाटील सुनील तटकरेंना फार मोठा लीड मिळवून देऊ शकले नाहीत.थोडक्यात कार्यकर्त्यांनी शेकाप-राष्ट्रवादी ही युती नाकारत जयंत पाटील सांगतील त्याला मत देण्याचे नाकारले.याचा फटका दोन्ही उमेदवारांना बसला.त्यामुळं रायगडमध्ये भलेही तटकरे जिंकले असले तरी जयंत पाटील पराभूत झाल्याने स्वाभाविकपणे ते कमालीचे अस्वस्थ झाले आणि त्यांनी आपला सारा राग पत्रकारांवर काढला.मतमोजणी अंतिम टप्प्यात असताना दुपारी जयंत पाटील तावातावानेच मतमोजणी कक्षात आले.त्यांच्यासमवेत त्यांचे अनेक कार्यकर्ते देखील होते.कोणताही पास नसताना हे कार्यकर्ते मतमोजणी कक्षात घुसले.तेथे उपस्थित असलेल्या पत्रकारांपैकी लोकसत्ताचे प्रतिनिधी हर्षद कश्याळकर यांच्या अंगावर जात जयंत पाटील यांनी त्यांची कॉलर पकडली आणि मग त्यांच्या कानशिलात लगावली.’तुम्ही काय वाट्टेल त्या बातम्या छापता काय’? असे जयंत पाटील मोठ मोठ्यानं ओरडत होते.हा प्रकार घडल्यानंतर सारे पत्रकार निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे गेले.त्यांनी त्यांच्याकडे तक्रार दाखल केली असून अलिबाग पोलीस ठाण्यात देखील जयंत पाटील यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली असून विविध कलमांखाली जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी या घटनेचा निषेध केला असून मुख्यमंत्र्यांनी या घटनेची दखल घेत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडं केली आहे.मराठी पत्रकार परिषद आणि राज्यातील अन्य संघटनांनी या घटनेचा तीव्र शब्दात धिक्कार केला आहे.रायगडमधील पत्रकारांची उद्या बैठक होत असून या बैठकीत पुढील दिशा नक्की केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here