मुंबई ः पत्रकारांना चहापानासाठी म्हणून घरी बोलवायचं,त्यांना गढूळ आणि दूषित पाणी पाजायचे,पत्रकारांना त्रास व्हावा म्हणून घरात धूर करायचा ही सारी विकृतपणाची लक्षणं नाहीत काय ? हे सारे उद्योग अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले आहेत.या विरोधात पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती,अकोला जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि जिल्हयातील अन्य पत्रकार संघटनांनी आवाज उठविल्यानंतर आता आस्तिककुमार पाण्डेय यांच्यावर कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत.स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे.

अकोल्यात नुकताच मोर्णा महोत्सव साजरा झाला.हा प्रशासनाचा उपक्रम नव्हता असं आता सांगितलं जातंय.तो मोर्णा फाऊंडेशनचा उपक्रम होता असंही आता बोललं जातंय.हे खरं असेल तर मग मोर्णा महोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासकीय अधिकार्‍यांनी आपलं वजन वापरून सहयोग राशी गोळा कऱण्यास सहकार्य का केले,हा प्रश्‍न अकोला शहरात विचारला जात आहे.जिल्हाधिकार्‍यांनी प्रतिष्ठेचा केलेला या महोत्सवाकडं माध्यमांनी मात्र कानाडोळा केला.महोत्सवास फार प्रसिध्दी मिळालीच नाही.त्यामुळं जिल्हाधिकारी पाण्डेय याचं पित्त खवळलं.त्यांनी प्रसिध्दी न देणार्‍या संपादक,पत्रकारांना अद्यल घडविण्याचं ठरविलं.त्यासाठी ़़

आवर्जुन संपादकांना बोलावण्यात आलं.सारे पत्रकार आल्यावर मग जिल्हाधिकार्‍यांची नाटकं सुरू झाली.संपादकांना गढूळ आणि दूषित पाणी पाजलं गेलं.त्याचा त्रास काही पत्रकारांना झाला.त्यानंतर धूर पेटविण्यात आला.त्यानं पत्रकारांच्या डोळ्यास त्रास झाला.हे काय चाललंय अगोदर पत्रकारांच्या ध्यानातच आलं नाही.मग जिल्हाधिकार्‍यांचा उद्देश कळल्यानंतर सारेच पत्रकार संतप्त झाले आणि त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना धारेवर धरले.मग दिलगिरी वगैरे झाले.पण घरी बोलावून पत्रकारांचा अवमान करणं हाच आस्तिककुमारचा उद्देश होता.या घटनेचा मराठी पत्रकार परिषद,पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीसह राज्यातील सर्वच पत्रकार संघटनांनी धिक्कार केला.निवडणुकांच्या तोंडावर माध्यमांना अशी वागणूक परवडणारी नसल्यानं या प्रकाराची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली असून जिल्हाधिकर्‍यांना कारणे दाखवा नोटीस पाठविली जाऊ शकते.नोटिशीचे उत्तर समाधानकारक आले नाही तर आस्तिककुमार यांच्यावर कारवाई होऊ शकते.सर्व्हिसबुकमध्येही याची नोंद होऊ शकते.

जिल्हाधिकारी हा सरकार आणि जनता यांच्यातला दुवा म्हणून जिल्हयात काम करीत असतो.जिल्हाधिकार्‍यांनी जनतेशी कसं वागायचं याचं प्रशिक्षणही त्यांना दिलं जातं.मात्र हे सारं विसरून एखादया चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांप्रमाणे जिल्हाधिकार्‍याचं वर्तन संतापजनक होतं.या घटनेचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे.सरकारनं आता विलंब न करता आस्तिककुमार यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यानी केली आहे.असं सांगितलं जातं की,आस्तिककुमार हे प्रामाणिक अधिकारी आहेत.कर्तव्य कठोर आहेत.असतीलही पण कोणत्याही कारणानं ते पत्रकारांशी ज्या पध्दतीनं वागले त्याचं समर्थन होऊ शकत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here