आ.जयंत पाटलांवर आरोप

0
678
रायगड लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या छाननीच्या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांना एकेरी भाषा वापरुन अपमानीत करणे, महिला पोलीस अधिकार्‍यांशी असभ्य वर्तन करणे आणि सुमंत भांगे यांच्यावर छाननीच्या वेळी दबाव आणण्याचा प्रयत्न करुन, आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी रायगड लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांच्याकडे करणार असल्याची माहिती काँग्रेसभुवनमध्ये गुरूवारी आयोजित काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आली.

आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजयभाऊ कवळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व रायगड जि.प.सदस्य महेंद्रशेठ दळवी, अँड.महेश मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सचिव अँड.जनार्दन पाटील, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष म.ही.पाटील, माजी आमदार मधुकर ठाकूर आदि मान्यवर उपस्थित होते.
निवडणूक आयोगाने १ एप्रिल रोजी उमेदवारांचे निवडणूक प्रतिनिधी कोण या संदर्भात अध्यादेश जारी केला आहे. त्यामध्ये विधानसभा व विधान परिषद सदस्य आणि खासदार हे लोकप्रतिनिधी उमेदवारांचे निवडणूक प्रतिनिधी म्हणून राहू शकत नाहीत. त्यामुळे आमदार जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगाच्या आदेशांचे उल्लंघन केले असल्याने, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आघाडीतर्फे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे करण्यात येणार असल्याचे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सचिव अँड.जनार्दन पाटील यांनी सांगितले.
७ एप्रिल रोजी झालेल्या छाननीच्या दिवसभराच्या कामकाजाच्या व्हीडीओ चित्रिकरणाची प्रत मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व रायगड जि.प.सदस्य महेंद्रशेठ दळवी, यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांच्याकडे केली होती. ती प्राप्त झाली आणि आज पत्रकार परिषदेच्या वेळी ही चित्रफीत दाखविण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here