अर्ध्या गावाची तहान भागविली

0
935

थोडं नियोजन केलं, थोडं धाडसं दाखविलं,थोडी आर्थिक झळही  सोसली. त्यातून  माझ्या अर्ध्या गावाची तहान भागविता आली. आज एक चांगलं काम आपल्या हातून घडल्याचा आनंद उपभोगतोय.

मराठवाड्यातलं देवडी हे माझं गाव.कायम दुष्काळी.कधी काळी संपन्न,सधन असलेला हा पट्टा आज दुष्काळी बनलाय.जमिनीत पाणी जिरविण्याचा प्रयत्न झालाच नाही.उपसा मात्र प्रचंड झाला.हे दुष्काळाचं कारण.आज स्थिती अशी बनलीय की,पिण्याच्या पाण्यासाठीही मारामार.गावच्या उश्या पायथ्याला असलेली धरणं कोरडी पडलीत.नद्या तर केव्हाच मृत्युमुखी पडल्यात.दहा-बारा पुरूष खोलीच्या विहिरीही ओक्या-बोक्या दिसतात.चारशे फुट खोलीच्या बोअरवेल कोरडे उसासे देत आहेत.त्यामुळं मराठवाडयात पाण्यासाठी हाहाकार माजलाय.काही शहरात आठ दिवसाआड पाणी येतंय,काही शहरांना पंधरा दिवसातून एकदा पाण्याचं दर्शन घडतंय.लातूर सारख्या शहरांना तर महिन्यातून एकदा पाणी मिळतंय.जिल्हयाच्या ठिकाणीची हा अवस्था.मराठवाड्याचा ग्रामीण भाग कोणत्या अवस्थेत असेल याची कल्पना कदाचित पुण्या-मुंबईच्या पव्लिकला येणार नाही.स्थिती भीषण आहे एवढंच मी सांगू शकतो.या स्थितीला तोंड कसं द्यायचं याचं कोणतंच नियोजन सरकारजवळ नाही.अशा स्थितीत पुढील पाच-सहा महिने मराठवाड्याला कोणत्या अग्निदिव्यातून जावं लागणार आहे याची कल्पना मला माझ्या गावातील अवस्थेवरून आली.देवडीत गेली दोन-तीन वर्षे नळ योजना सुरू होती.चार-आठ दिवसांनी का होईना पाणी मिळायचं.मात्र नळाला ज्या विहिरीतून पाणी यायचं ती विहिरच कोरडी पडली,अन पाण्याचं दुर्भिक्ष्य जाणवायला सुरूवात झाली.बाकीचे पाण्याचे श्रोत अगोदरच बंद पडले होते,आता नळाचं पाणीही बंद झाल्यानं ग्रामस्थ हवालदिल झाले.मला गावाहून अनेक मित्रांनी फोन केले,’यात्रा जवळ आलीय काही तरी करा’ असा लकडा त्यांनी लावला .आभाऴच  फाटलंय अशा स्थितीत मी काय करू शकणार होतो?तरीही गावी गेलो.परिस्थिती पाहिली.गावातील मित्रांशी चर्चा केली.काही अधिकार्‍यांशी बोललो.सरकारच्या लेखी गावात पाणी टंचाईच नव्हतीच.कारण सरकारनं दहा-बारा विहिरी आणि बोअरवेल अधिगृहित केलेल्या आहेत.त्यामुळं या बोअरवेलमधून गावकरी पाणी घेतात असं सरकारी कागदपत्रांवरून दिसतं. अधिकारी तीच भाषा बोलताहेत. वस्तुस्थिती अशी आहे की,ज्या अधिगृहित बोअरवेल आहेत त्यापैकी बहुतेक बोअरवेल केव्हाच कोरड्या पडलेल्या आहेत.त्यामुळं तेथून पाणीच मिळत नाही.ज्यांच्या बोअरवेल अधिगृहित झालेल्या आहेत त्यांना 9 हजार रूपये सरकार देत आहे.म्हणजे सरकारचा पैसाही जातोय आणि पाणीही मिळत नाही ही स्थितीय.गेली काही वर्षे काहींनी पाणी नसलेल्या बोअरमधून लाखो रूपये कमविले आहेत.अधिगृहित कोरडया बोअरवेल आणि विहिरीतून पाणी मिळतंय असा सरकारी अहवाल असल्यानं टँकर सुरू होण्याचा प्रश्‍नच नव्हता.अशा स्थितीत पर्याय शोधणं आवश्यक होतं.माझ्या राहत्या वाड्याच्या समोरच आमचा गायवाडा आहे.काही बुजुर्गांनी सांगितलं,’ तिथं पाणी मिळू शकेल’.अगोदरच गावच्या शिवारातील 300-400 फुट खोल असलेल्या बोअरवेल कोरड्या पडल्यान जमिनीला आणखी एक छिद्रं पाडण्यासाठी माझं  मन धजावत नव्हतं.तरीही गावातील मित्रांच्या  आग्रहामुळं बोअर घेण्याचा निर्णय घेतला.निर्णय तर झाला पण बोअरवेलसाठीची अवाढव्य गाडी गावात आणायची कशी? हा प्रश्‍न होता.त्यासाठी  गायवाड्याची मागची भिंत पाडली.गाडी आत आली.बोअरवेलचं काम सुरू झालं.वीस फुटाचे एक-दोन-पाच-सात पंप आत सोडले तरी केवळ धुराळाच बाहेर येत राहिला.माझं मन सैरभैर होतं.पाणी मिळेल की नाही या चिंतेने मी अस्वस्थ होतो.त्यामुळं जरा दूरच जाऊन बसलो.185 फुटावर थोडं पाणी मिळालं.नंतर पुन्हा धुऱाळाच येत राहिला.अखेर अकरावी छडी टाकली अन जोरदार मुसंडी मारत पाणी बाहेर आलं.अंगणात पाण्याचे लोट वाहू लागले.उपस्थित ग्रामस्थांनी राणूबाई की जयचा ( रेणुका देवी ही आमची ग्रामदेवता.रेणुकेचा अपभ्रंश राणूबाई असा झाला.) जयघोष केला.मी धावतच आलो.पाणी पाहून माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता.सारेच आनंदीत झाले होते.मी आणखी दोन छडया टाकायला सांगितल्या.240 फुटावर काम थांबविलं. फार  खोल जाण्यात अर्थ नव्हता.कारण खाली बोल्डर लागलं होतं.( बोल्डर म्हणजे काय मला माहिती नाही.मात्र बोअर घेणार्‍यांनेच आता थांबा असं सांगितलं.मी थांबलो.) मी लगेच माजलगाव गाठलं.मोटर वगैरे साहित्य घेऊन आलो.दुसर्‍या दिवशी मोटर सुरू झाली.पहिल्याच दिवशी दोन-तिनशे लोकांनी पाणी भरलं.यात्रेसाठी आलेले व्यापारी,आणि भक्तांना मोठा दिलासा मिळाला.23 आणि 24 जानेवारीच्या यात्रेची तहान आमच्या पाण्यानं भागली होती.सारेच दुवा देत होते.आता वाड्याच्या बाहेर पाईप काढलाय.सकाळी साडे आठ ते साडे अकरा आणि सायंकाळी पाच ते सात अशी मोटर सुरू असते.तीन हजार लोकवस्तीच्या गावातील किमान हजार लोकांची तहान आम्ही  घेतलेल्या निर्णयामुळं भागली आहे.साठ -सत्तर हजार खर्च झाला.पण हजार लोकांसाठी पाण्याची कायम सोय झाली.सारं गाव आनंदीत झालं आहे.दोन-दोन मैलावरून ज्या बंधुःभगिनींना पाणी आणावं लागायचं त्यांची सोय अगदी घराजवळच झाल्यानं मंडळी आनंदत आहे.. पाणी भरतानाचा त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद मी विसरू शकत नाही.थोडं धाडस केलं,नियतीनं साथ दिली.काही प्रमाणात का होईना गावाची तहान भागविण्यात मी यशस्वी झालो. याचं समाधान मला नक्कीच आहे.आता एकच अपेक्षा आहे हे पाणी अखंडपणे वाहत राहो आणि गावकर्यांना पुन्हा पाण्यासाठी पायपीट कऱण्याची वेळ येऊ नये.मराठवाड्याला पाण्याची गरज आहे.अनेक व्यक्ती अशा पध्दतीनं प्रयत्न करीत व्यक्तिगत स्वरूपात जनतेला पाणी उपलब्ध करून देत आहे.हे आवश्यकही आहे.केवळ सरकारवर विसंबून राहण्यासारखी स्थिती आज मराठवाड्यात नाही.मिळेल तेथून पाणी उपसावे लागेल.त्याला पर्याय नाही.या प्रयत्नात मला सहभागी होता आलं याचा आनंद आहेच आहे.

एस.एम.देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here