टाटा टाइम्स नाऊ

0
760

‘टाइम्स नाऊ’चे संपादक अर्णव गोस्वामी यांचा राजीनामा ?

संपादकीय बैठकीत अर्णव गोस्वामी यांनी आपला राजीनामा जाहीर केला.

नवी दिल्ली
 पत्रकार अर्णव गोस्वामी यांनी टाइम्स नाऊ या इंग्रजी वृत्त वाहिनीच्या मुख्य संपादक पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून अर्णव गोस्वामी हे त्यांच्या ‘द न्यूज अवर’ या लोकप्रिय कार्यक्रमात दिसत नव्हते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संपादकीय बैठकीत अर्णव गोस्वामी यांनी आपला राजीनामा जाहीर केला. आपण स्वत: काहीतरी नवे सुरू करणार असल्याचेही त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितल्याचे समजते. दरम्यान, मंगळवारी रात्री ९ वाजता होणाऱ्या ‘द न्यूज अवर शो’ चे सूत्रसंचालन अर्णव गोस्वामी करणार असल्याचे टाइम्स नाऊ वाहिनीवर सांगण्यात येत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून अर्णव गोस्वामी ‘टाइम्स नाऊ’मध्ये संपादक पदावर कार्यरत आहेत. ‘टाइम्स नाऊ’ वाहिनीवर ‘द न्यूजअवर’ या चर्चेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कायम अर्णव गोस्वामी हेच करतात. या कार्यक्रमावरील त्यांच्या आक्रमकपणामुळे ते कायम चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच अर्णव गोस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही विशेष मुलाखत घेतली होती. टेलिव्हिजनवर थेट बातम्या देण्यास खासगी वाहिन्यांना परवानगी देण्यात आल्यानंतर पहिल्या फळीत जे चेहरे पुढे आले. त्यामध्ये अर्णव गोस्वामी यांचाही समावेश होतो. ‘एनडीटीव्ही’ या वाहिनीवर पहिल्या फळीतील पत्रकारांच्या चमूमध्ये त्यांचा समावेश होता. ‘टाइम्स समूहा’ने २४ तास चालणारी वृत्तवाहिनी काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर अर्णव गोस्वामी या वाहिनीमध्ये संपादक म्हणून दाखल झाले. तेव्हापासून या वाहिनीचा चेहरा म्हणून अर्णव गोस्वामी यांच्याकडे बघितले जाते.

अर्णव गोस्वामी यांनी १९९५ मध्ये कोलकाता स्थित दैनिक द टेलिग्राफमधून पत्रकारितेस सुरूवात केली होती. परंतु काही दिवसांतच ते दिल्ली येथे एनडीटीव्ही या वृत्त वाहिनीत रूजू झाले. त्यावेळी डीडी मेट्रो या वाहिनीवर एनडीटीव्हीचा कार्यक्रम ‘न्यूज टू नाइट’ प्रसारित होत. या कार्यक्रमाचे वार्तांकन ते करत. १९९८ मध्ये एनडीटीव्हीने स्वतंत्र वाहिनी सुरू केल्यानंतर त्यांनी कार्यक्रम निर्माता म्हणून या वाहिनीत काम सुरू केले. एनडीटीव्हीवर ते ‘न्यूज अवर’ हा कार्यक्रम सादर करत. त्यांनी २००३ पर्यंत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. वर्ष २००६ मध्ये त्यांची टाइम्स नाऊ या वृत्त वाहिनीच्या मुख्य संपादकपदी निवड झाली. तेव्हापासून ते न्यूज अवर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होते.

गोस्वामी हे मुळचे आसामचे आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठातील हिंदू कॉलेजमधून समाजशास्त्रात बीए तर ऑक्सफोर्ड विद्यापीठातून एमए केले आहे. गोस्वामी यांचे आजोबा आसामचे प्रसिद्ध वकील होते. त्यांचे काका गौरी शंकर भट्टाचार्य हे कम्युनिस्ट पक्षात होते. त्यांनी आसामचे विरोधी पक्षनेते पदही भूषवले होते. त्यांचे वडील मनोरंजन गोस्वामी हे भारतीय लष्करातून कर्नल पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या वडिलांनी १९९८ मध्ये गुवाहाटीतून भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांचे मामा गुवाहाटी पूर्वचे माजी आमदार आहेत. तसेच आसाम भाजपचे ते माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. पाकिस्तान स्थित एका दहशतवादी गटाने धमकी दिल्यामुळे गोस्वामी यांना नुकतीच ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

 लोकसत्ता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here