‘अच्छे दिन’ पत्रकाराला ‘भोवले’

0
1404

मेरठ – पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवणारा व्हिडीओ व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केल्याने एका स्थानिक पत्रकाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेरठ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. व्हिडीओ शेअर करणा-या पत्रकाराने सांगितलं आहे की, ‘व्हिडीओत पंतप्रधान नरेंद्र मोदी अच्छे दिनच्या प्रश्नावर मेंढ्यांच्या कळपाला उत्तर देताना दाखवण्यात आलं होतं, आणि या मस्करीमुळे कोणाचं काही नुकसान झालं आहे असं मला वाटत नाही’.

सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात यासंबंधी तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलीस ठाण्याचे एसएचओ अंबरेश सिंह यांनी सांगितलं आहे की, ‘अफगान सोनी नावाच्या व्यक्तीवर कलम 500 (बदनामी) आणि कलम 60 (कॉम्प्युटरशी संबंधित गुन्हा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे’. एका हिंदी वृत्तपत्रासाठी काम करत असलेल्या पत्रकार अफगाण सोनी यांनी एसएसपी मंजिल सैनी यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हिडीओ शेअर करताच, इतर सदस्यांनी त्यावर आक्षेप घेतला आणि एसएसपींकडे यासंबंधी तक्रार करत कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर मंजिल सैनी यांच्या आदेशानुसार अफगान सोनी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, ग्रुपमधील इतर सदस्यांना त्यासंबंधी माहिती पुरवण्यात आली आहे.

‘माझ्या धर्मामुळे करण्यात आलं टार्गेट’
आपल्याविरोधात झालेल्या कारवाईवरुन आश्चर्य व्यक्त करत अफगाण सोनी यांनी सांगितलं आहे की, ‘याआधीदेखील अनेकांनी एसएसपी यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर अपमानास्पद फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. मात्र त्यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. मला माझ्या धर्मामुळे टार्गेट करण्यात आलं आहे. मी चुकून तो व्हिडीओ शेअर केला होता. सोशल मीडियावर अनेकजण अपमानास्पद आणि आक्षेपार्ह पोस्ट करत असतात, मग त्यांच्याविरोधात कारवाई का केली जात नाही’.

अफगान सोनी यांनी व्हिडीओ शेअर झाल्यानंतर ग्रुपमधील सदस्यांची माफी मागितली होती. आपण चुकून हा व्हिडीओ शेअर केल्याचं त्यांनी सांगितलं होतं. याच्या एक दिवसआधी तामिळनाडूमधील विरुधूनगर जिल्ह्यातील श्रीविलिपुथुर पोलिसांनी एका बेरोजगार तरुणाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसंबंधी अपमानास्पद वक्तव्य केल्याने अटक केली होती.

 ऑनलाईन लोकमतवरून साभार 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here