नवी दिल्ली, दि. 26 – विमान कंपन्यांना विमानांमध्ये इंग्रजी भाषेसोबत हिंदी वर्तमानपत्रे आणि मासिके उपलब्ध करून देणे सक्तीचे झाले आहे. नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाने(डीजीसीए) सर्व विमान कंपन्यांना प्रवाशांसाठी हिंदी वर्तमानपत्रे आणि मासिके उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. प्रवाशांना हिंदी वर्तमानपत्रे आणि मासिके उपलब्ध होतायेत की नाही हे सुनिश्चित करण्यासाठी डीजीसीएने सर्व विमानकंपन्यांना नोटीस जारी केली आहे.
विमानात हिंदी भाषेतील वाचन साहित्य न उपलब्ध करून देणे, हे अधिकृत भाषेसाठी तयार करण्यात आलेल्या सरकारी धोरणाचे उल्लंघन ठरेल, डीजीसीएचे सह महासंचालक ललित गुप्ता यांनी सर्व विमान कंपन्यांना याबाबत एक पत्र पाठवलं आहे.
दूसरीकडे डीजीसीएच्या या आदेशानंतर कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी ट्विटरद्वारे खोचक टीका केली आहे. ‘आता भारतीय विमानात हिंदी मासिकंही वाचायला देण्याचा डीजीसीएचा विचार आहे…(शाकाहारी जेवणासोबत)’ असं ट्विट त्यांनी केलं. काही दिवसांपूर्वी भारतीय विमानकंपनी एअर इंडियाने खर्चावर कात्री लावण्याच्या उद्देशाने देशांतर्गत विमान प्रवासादरम्यान इकॉनॉमी क्लासमध्ये नॉन व्हेज पदार्थ न देण्याचा निर्णय घेतला होता.
याशिवाय, डीजीसीएच्या एका माजी अधिकाऱ्यानेही या निर्णयावर ताशेरे ओढले आहेत. हा निर्णय पूर्णपणे निरर्थक आहे. डीजीसीए ही सुरक्षा नियामक संस्था आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या निर्णयांशी त्यांचे काहीही देणेघेणे नाही.
लोकमतवरून साभार