उदंड मार्तंड या हिंदीतील पहिल्या वृत्तपत्राचा महिला अंक 30 मे 1826 रोजी प्रसिध्द झाला.त्याचं स्मरण म्हणून 30 मे हा दिवस हिंदी पत्रकारिता दिवस म्हणून देशभर साजरा केला जातो. उदंड मार्तंड सुरू झाला त्या घटनेला आज 192 वर्षे पूर्ण होत आहेत.त्याचं स्मरण आज देशभर केलं जात आहे.
उदंड मार्तंड कलकत्ता येथून साप्ताहिक स्वरूपात प्रसिध्द व्हायचं.जुगलकिशोर शुक्ल हे उदंड मार्तंडचे संपादक,मालक होते.12 बाय 8 अशा पुस्तकाच्या आकारात दर मंगळवारी उदंड मार्तंड प्रसिध्द व्हायचा.ब्रज आणि खडीबोली भाषेत तो निघायचा.मात्र उदंड मार्तंड फारच अल्पजिवी ठरले.अवघे 79 अंक प्रकाशित करून अवघ्या दीड वर्षात 1827 मध्ये बंद पडले.आजच्या सारखेच त्यावेळेस देखील सरकारी मदतीशिवाय वृत्तपत्र चालविणे कठिण होते.इंग्रज किंवा मिशनर्यांच्यावतीने जी वृत्तपत्रे चालविली जात होती त्यांना पोस्टाची सवलत मिळायची पण उदंड मार्तंडला तशी सवलतही मिळाली नाही.इतरही अडचणी होत्याच.त्यामुळं उंदड मार्तंडचं प्रकाशन बंद करावं लागलं.उदंड मार्तंड बंद पडल्यानंतर तब्बल 23-24 वर्षांनी हिंदीतील पहिले दैनिक समाचार सुधा 1854 मध्ये सुरू झालं.आज हिंदी वृत्तपत्रसृष्टीचा वेलू गगाणावरी गेला आहे.देशात हजारांवर हिंदी वृत्तपत्रे प्रसिध्द होत असून 80 दशलक्ष पेक्षा जास्त प्रती दररोज छापल्या जातात.
1780 मध्ये जेम्स ऑगस्टस हिकी यानं बंगाल गॅझेट हे वृत्तपत्र सुरू केलं.त्यानंतर देशी भाषेतील वृत्तपत्र सुरू व्हायला तब्बल पन्नास वर्षे लागली.उदंड मार्तंड सुरू झाल्यानंतर सहा वर्षांनी मराठीत बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले.
हिंदी पत्रकारिता दिवसाच्या तमाम हिंदी भाषक पत्रकार मित्राना मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीनं मनापासून शुभेच्छा.