मुंबईः सरकारच्या विरोधात सातत्यानं लेखणी चालवावी लागते म्हणून  सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी पत्रकारांचे सामुहिक प्रश्‍न सोडविताना नेहमीच टाळाटाळ करीत असते.त्यामुळं यापुढं पत्रकारानी सरकारवर फार अवलंबून न राहता स्वतःच  आपले प्रश्‍न संघटीतपणे सोडविले पाहिजेत हे आता आपण लक्षात घेतले पाहिजे.मुंबई मराठी पत्रकार संघानं त्यादृष्टीनं सुरूवात केली असून संघाच्या सदस्यांना 1200 रूपयांची पेन्शन देण्याचा निर्णय मुंबई मराठी पत्रकार संघानं घेतला आहे.65 वर्षे वयापेक्षा ज्यांचे वय जास्त आहे आणि ज्यांना पेन्शनची गरज आहे अशा पत्रकारांना पत्रकार संघ पेन्शन देणार आहे.मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी आज ही घोषणा केली आहे.मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी मुंबई संघाच्या या निर्णयाचे स्वागत केले असून अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांचे मनापासून अभिनंदन केले आहे. —

*ज्येष्ठ सदस्यांना मार्चपासून पेन्शन*
 
मुंबई :६५ वर्षांच्या वरील सेवानिवृत्त आणि गरजू सदस्यांना मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने मार्च २०१८ पासून दरमहा रु. १२००/- पेन्शन सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा संघाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र वाबळे यांनी आज केली.
अल्प पगारावर पत्रकारिता करून निवृत्त झालेले अनेक ज्येष्ठ पत्रकार आजही पेन्शनपासून वंचित आहेत. अनेकांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. त्यात वाढत्या वयाबरोबर जडणारे आजार आणि औषधोपचारांसाठी येणारा खर्च यामुळे अनेक ज्येष्ठ पत्रकार हवालदिल झालेले दिसतात. या पार्श्वभूमीवर मुंबई मराठी पत्रकार संघाच्या ६५ वर्षांवरील सर्व सेवानिवृत्त आणि गरजू सदस्यांना मार्चपासून पेन्शन देण्यात येईल, असे श्री. वाबळे यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी संघाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना पेन्शन वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून येण्याचे आमंत्रण दिले होते. मुख्यमंत्र्यांनी ते स्वीकारले असून शिष्टमंडळाच्या विनंतीनुसार मार्च महिन्यात सदर कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आपला बहुमुल्य वेळ देणार आहेत, अशी माहिती देखील श्री. वाबळे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
भविष्यात पेन्शनच्या रकमेत घसघशीत वाढ करण्याच्या दृष्टीने मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे निधीसंकलन करण्यात येईल, असेही श्री. वाबळे यांनी पत्रकात शेवटी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here