साईनाथ यांना भालेराव स्मृती पुरस्कार

0
704

औरंगाबाद : जागतिक कीर्तीचे ग्रामीण पत्रकार पी. साईनाथ हे यंदाच्या अनंत भालेराव स्मृती पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. गेली ३५ वर्षे सातत्याने भारतातील ग्रामीण जीवन, शेतीच्या समस्या, दारिद्रय़ व विषमता या विषयांवर केलेल्या अभ्यासपूर्ण वार्तांकनाबद्दल साईनाथ यांचा हा गौरव केला जात आहे, असे अनंत भालेराव व प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकरअण्णा मुळे व सचिव डॉ. सविता पानट यांनी सांगितले.

हा पुरस्कार ज्यांच्या स्मरणार्थ दिला जातो, ते तत्कालीन मराठवाडा दैनिकाचे संपादक अनंतराव भालेराव यांच्या पत्रकारितेचा ग्रामीण जीवन हाच गाभा होता. अनंतरावांच्या पत्रकारितेत जे मुख्य सूत्र होते, ते धरूनच साईनाथ यांच्या पत्रकारितेची दमदार वाटचाल झाली आहे, त्यामुळे प्रतिष्ठानच्या विश्‍वस्त मंडळाने सवरेत्तम ग्रामीण पत्रकाराला हा पुरस्कार देण्याचे ठरविले. प्रतिष्ठानच्या स्थापनेचे हे २५ वे वर्षे आहे. यानिमित्ताने पुरस्काराची रक्कम २५ हजारांवरून ५0 हजार रु. करण्याचे मंडळाने ठरविले आहे. यंदाचा पुरस्कार वितरण समारंभ १३ नोव्हेंबर रोजी सायं. ५.३0 वा. तापडिया नाट्यमंदिरात होईल. यावेळी पी साईनाथ हे ‘ संकटमें ग्रामीण भारत’ या विषयाची मांडणी करतील.
दुष्काळ आणि भूक या विषयांवरील जागतिक तज्ज्ञांमध्ये पी. साईनाथ यांचा समावेश होतो. देशभर मिळेल, त्या वाहनांनी व प्रसंगी पायी प्रवास करून शेतकरी, शेती, दुष्काळ व ग्रामीण जीवनातील शोषण या विषयांवर सखोल व सचित्र वार्तापत्रे साईनाथ यांनी लिहिली. या दरम्यानच त्यांनी ‘ एव्हरीबडी लव्हज ड्राऊट’ (दुष्काळ आवडे सर्वा) हे पुस्तक लिहिले. ते आजही दुष्काळ या विषयावरील वार्तांकनाचा उत्कृष्ट नमुना मानले जाते. त्याच्या आतापर्यंत सहा लाखांवर प्रती विकल्या गेल्या असून ३१ आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत.
अनेक भाषांमध्ये त्याचे अनुवाद झाले आहेत. मॅगसेसे अवार्ड, बी. डी. गोयंका अवार्ड, अम्नेस्टी अवार्ड आदी पुरस्कार व मानद डॉक्टरेट यांसह अनेक बहुमान त्यांना देश, विदेशात प्राप्त झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here