पन्नाशी पार केलेल्या छोटया आणि मध्यम वृत्तपत्रांचा आौढ्यात होणार सन्मान 
रकारला काय वाटायचं ते वाटो,महाराष्ट्राच्या जडनघडणीत जिल्हास्तरीय आणि छोटया तसेच मध्यम वृत्तपत्राचं मोठंच योगदान आहे. ते नाकारणं हा शुद्ध  कृतघ्नपणा आहे .स्वातंत्र्य लढयात आज अस्तित्वात असलेल्या अनेक छोटया दैनिकांनी,साप्ताहिंकांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे.आणीबाणीतही अनेक मोठी वृत्तपत्रे गलितगात्र झालेली असताना छोटया वृत्तपत्रांनी आणीबाणीचा धैर्यानं मुकाबला केला.छोटया दैनिकांचे अनेक संपादक तुरूंगात गेले.  ते उन्मत्त सत्ताधीशांना शरण गेले नाहीत.घाबरलेही नाहीत.आपली शक्ती मर्यादित क्षेत्रापुरती आहे हे ज्ञान असतानाही त्यांनी जी हिंमत दाखविली त्याला तोड नाही.पत्रकारिता हे सतीचं वाण असतं हे त्यांनी आपल्या कृतीतून  दाखवून दिलं.अनेक संकटं आली,सत्तनं जेरीस आणलं ..  कोणीही डगमगलं नाही.की जाहिरातींसाठी कोणीही तडजोडी केल्या नाहीत.वृत्त्तपत्र स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी यासर्व संपादकांनी आपल्या परीनं नक्कीच शर्थीचे प्रयत्न केले.त्यानंतरही जेव्हा जेव्हा वृत्तपत्रांवर हल्ले झाले,वृत्तपत्रांचा आवाज बंद कऱण्याचा प्रयत्न झाला तेव्हा हीच जिल्हास्तरीय वृत्तपत्रे पेटून उठली आणि त्यांच्या निर्धारापुढं बिहार प्रेस बिलासाऱखी बिलंही सरकारला मागं घ्यावी लागली.लोकशाही व्यवस्थेचं रक्षण तर ही छोटी वृत्तपत्रे करीत आलीच त्याचबरोबर त्यांनी लोकांच्या प्रश्‍नांना वेशिवर टांगून त्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका पार पाडल्याची शेकडयात उदाहरणं देता येतील.सरकारी यंत्रणेकडून सामांन्यांवर होणारे जुलूम,धनदांडग्यांकडून होणारे अन्याय,अत्याचार यांना वाचा फोडण्याचं काम याच वृत्तपत्रांनी केलं आणि आजही करीत आहेत.सार्वजनिक प्रश्‍नांच्याबाबतीत तर जिल्हास्तरीय वृत्तपत्रांनी अजोड कामगिरी पार पाडली आहे.लोकांना बरोबर घेऊन या वृत्तपत्रांनी लोकचळवळी उभ्या केल्या आणि कोणाचीही पर्वा न करता अशा चळवळीचं नेतृत्व केलं.आज  मराठवाडयात रेल्वेचं जाळं विणलं जात आहे त्याचं श्रेय सुधाकरराव डोईफोडे आणि नांदेडच्या प्रजावाणीला द्यावं लागेल,मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकऱणाचा विषय असो किंवा सेझ विरोधी लढा असो अलिबागच्या कृषीवलनं या लढ्याचं नेतृत्व केलं आणि हे प्रश्‍न तडीस नेले,दैनिक सागरनं कोकणातील अनेक प्रश्‍न हाताळले आणि लोकांना न्याय मिळवून दिला.सांगलीचा ललकार असेल,ठाण्याचा सन्मित्र असेल,धुळ्याचा आपला महाराष्ट्र असेल,अमरावतीचा हिंदुस्थान असेल,नाशिकचा गावकरी असेल,बीडचा झुंजार नेता आणि चंपावतीपत्र असेल,उस्मानाबादचा संघर्ष असेल,सोलापूरचा संचार,विश्‍व समाचार असेल,नगरचा नवा मराठा असेल,सातार्‍याचा ऐक्य आणि ग्रामोद्धार असेल, मुंबईचा शिवनेर असेल किंवा पुण्याचा प्रभात असेल  या आणि अशा अनेक दैनिकांनी आपल्या भागातील प्रश्‍नांसाठी लढा  दिला,ते प्रश्‍न तडीस नेले.चळवळी जिवंत ठेवण्याचं अत्यंत मोठं काम या वृत्तपत्रांनी केलं.आज जी मंडळी सारा मिडिया मुठभर भांडवलदारी कंपन्यांच्या घश्यात घालण्याचं मनसुबे रचत आहे ते भलेही छोटयांनी बजावलेल्या भूमिकेबद्दल कृतघ्न झाले असतील पण मराठी पत्रकार परिषद असेल किंवा या राज्यातील सामांन्य जनता असेल ती या वृत्तपत्रांना विसरलेली नाही.त्यामुळंच दैनिक मराठवाडाचा उल्लेख केला तरी आजही अनेकजण सद्दगदीत होतात.जे लोकप्रेम या दैनिकांना मिळालं ते भांडवलदाऱी किंवा साखळी वृत्तपत्रांना मिळाण शक्य  नाही . मुळात जिल्हा पत्रे ही  आपल्या मातीतून जन्माला आलेली होती.आहेत . मातीचा गंध त्यांच्या प्रत्येक शब्दातून येत होता,म्हणूनच सभोवतालच्या लोकांची दुःख मांडतांना त्यांना दुःख व्यक्त कऱण्यासाठी उदार शब्द घ्यावे लागले नाहीत.तळमळीनं,पोटतिडकीनंच ते सारे व्यक्त होत.
आज सरकारी जाहिरात  धोरणांमुळं यापैकी अनेक दैनिकं अडचणीत आलेली आहेत.वर उल्लेख केलेल्यांपैकी अनेक दैनिकांनी पन्नाशी पार केलेली आहे.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी चार हात करीत,कोणताही आधार नाही,भांडवल नाही की राजकीय पाठिंबा नाही अशा स्थितीतही निर्भिड पत्रकारितेची कास धरीत या वृत्तपत्रांनी महाराष्ट्राच्या विकासात मोठं योगदान दिलं आहे.ते भलेही सरकार विसरणार असेल पण मराठी पत्रकार परिषद वर उल्लेख केलेल्या आणि अश्याच अनेक दैनिकांचं आणि साप्तािहिकांचं शतशः ऋुण व्यक्त करीत आहे.या ऋुणातून उतराई होण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून मराठी पत्रकार परिषदेनं पन्नाशीचा पल्ला पार केलेल्या अथवा पन्नाशीच्या आसपास असलेल्या दैनिकांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे.1 सप्टेंबर 2018 रोजी औढा नागनाथ येथे होणार्‍या छोटया आणि मध्यम वृत्तपत्रांच्या मेळाव्यात स्थानिक खासदार राजीव सातव यांच्या हस्ते हा सन्मान केला जाणार आहे.आपल्याच मानसांच्या उपस्थित होणारा हा सन्मान नक्कीच लाखमोलाचा असणार आहे.राज्यातील सर्वच वृत्तपत्रांचा सन्मान शक्य नाही पण प्रत्येक विभागातून एक अशा प्रकारे दहा नियतकालिकांच्या मालकांचा अथवा संपादकांचा सन्मान करण्यात येणार आहे.दैनिकांबद्दल सार्वजनिक स्वरुपात अशी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.त्यामुळे या सन्मानाला आगळा अर्थ आहे हे नक्की ,.. .

LEAVE A REPLY