शेती टिकली पाहिजे

0
1016

“रायगड जिल्हयातील शेती आणि शेतकरी टिकला पाहिजे” अशी व्यापक चळवळ सुरू कऱण्याची आता नक्कीच गरज निर्माण झालीय.रायगडमध्ये नागरिकरण आणि औद्योगिकऱणाचा वेग एवढा प्रचंड आहे की,आणखी पाच-पचवीस वर्षांनी जिल्हयात शेती शिल्लक राहणार नाही आणि शेतकरीही केवळ गुगलवर सर्च करूनच पहावा लागेल अशी स्थिती असेल.उपलब्ध आकडेवारीच बघा.2010 मध्ये जिल्हयात 1लाख 24 हजार 200 हेक्टरमध्ये भाताची लागवड झाली होती.2012 मध्ये हे क्षेत्र 1 लाख 23 हजार 700 पर्यत घटलं.2013 मध्ये त्यात लक्षणीय घट झाली अन केवळ 1 लाख 14 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड झाली.2014 मध्ये ते 1लाख 13 हजार 200 पर्यंत कमी झालं.यावर्षी त्यात आणखी घट झाल्याचं सांगितलं जातं.म्हणजे केवळ पाच वर्षात जवळपास अकरा ते बारा हजार हेक्टर लागवड योग्य क्षेत्रफळ घटलं असेल तर गोष्ट चिंता वाटावी आणि चिंता करावी अशीच आहे. ही केवळ भाताचीच स्थिती आहे असं नाही.नाचणी आणि एवढंच कशाला आंबा पिकाची देखील स्थिती फार वेगळी आहे असं नाही.वरील आकडेवारींचा अर्थ एकच आहे की,रायगडात सेझ आणि तत्सम महाकाय प्रकल्प शेती गिळंकृत करीत निघाले आहेत.त्यात भर पडलीय ती शेतीबद्दलच्या अनिच्छेची. शेतीबद्दलचं आकर्षण नव्या पिढीला राहिलेलं नाही हे सर्वश्रुत आहे..शेती हा व्यवसाय बेभरवश्याचा, पूर्णतः निसर्गािघिन झालेला आहे.तो एक प्रकारचा जुगारच आहे.हा जुगारही वर्षानुवर्षे हरायचीच वेळ येत असेल तर शेतकर्‍यांची नवी पिढी नवा मार्ग चोखळणार हे उघडच आहे.रायगड आणि संपूर्ण कोकणात हेच झालंय.कोकणात शेतीला उद्योगाचा नवा पर्याय आला.अनेक कारखाने आल्यानं शेतकर्‍यांची  मुलं या कारखान्यात कामाला लागली.ज्यांना नोकर्‍या मिळाल्या नाहीत त्यांनी अन्य व्यवसाय सुरू केले.या सर्वाचा परिणाम असा झाला की,शेतीची ओढ कमी झाली.शेतीवर अवलंबून असणार्‍यांच्या सख्येतही लक्षणीय घट झाली.अनेकांना शेती बोजा वाटायली लागली.त्यातून चांगली किंंमत मिळते म्हणून कित्येकांनी आपली शेती विकून टाकली.एकीकडं शेतीतील गुंतवणूक आणि त्यातून मिळणारं उत्पन्न याचीं तोंडमिळवणी होत नव्हती आणि दुसरीकडं शेतीला प्रतिष्ठा नसल्यानं अनेक समस्यांना सामोरं जावं लागत होतं.यातून शेतीमुक्त होण्याचे पर्याय अनेकांनी शोधले असले तरी काही तरूणांनी मात्र शेतीमधील प्रश्‍नांचा बाऊ न करता शेतीमध्येच नवनवे प्रयोग करून अनेकांना तोंडात बोटं घालावी लागावीत असे चमत्कार  करून दाखविले या वस्तुस्थितीकडंही कानाडोळा करता येणार नाही.नव्या दमाच्या प्रयोगशील तरूण शेतकर्‍यांनी अत्याधुनिक तंत्राचा वापर करून भाताचं उत्पादन तर वाढविलंच त्याच बरोबर परंपरागत पीक पध्दती बदलून कोकणातही शेंगा हळद आणि तत्सम गोष्टी होऊ शकतात हे सप्रमाण दाखवून दिलं.काहींनी फुल शेतीत प्रयोग केले तर फळशेती किफायदशीर कशी होऊ शकते याचाही काही तरूणांनी आदर्श घालून दिला.रायगडमध्ये अलिबागचा कांदा असेल,तोंडली असेल,श्रीवर्धनची रोठा सुपारी असेल,अलिबागच्या काही भागातला हापूस असेल ही पिकं प्रसिध्द आहेत.त्यात उत्पादन वाढ झाली तर नक्कीच रायगडची शेती समृध्द आणि ऩफा देणारी  होऊ शकते हे ओळखून तेथेही नवनवे प्रयोग केले जाऊ लागले आहेत.अनेक सुशिक्षित तरूण रायगडात जाणीवपूर्वक शेतीत काम करून शेती हा विषय आता तुच्छतेनं बघण्याचा राहिला नसून तो ही आता  प्रतिष्ठीतपणे करण्यासारखा व्यवसाय झाला आहे हे दाखवून देत आहेत.नेरळच्या जवळ शेखर भडसावळे यांनी शेतीत अनेक बदल करून शेती हा व्यवसायही फायद्याचा होऊ शकतो हे दाखवून दिले आहे.शेतीला पुरक व्यवसायाची जोड द्यायला हवी असे सांगितलं जाते.शेखर भडसावळे यांनी कृषी पर्यटनाचा प्रयोग केला.तो एवढा यशस्वी आणि लोकप्रिय झाला की,जिल्हयातील असंख्य शेतकरी कृषी पर्यटनाच्या माध्यमातून स्वउन्नतीचा नवा मार्ग चोखळताना दिसत आहेत.हे बदल शेतीबद्दलचे भाव आणि भावना बदलायला लावणारे असल्यानं अशा प्रयोगशील शेतकर्‍यांचं कौतूक करणं,त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप मारणं हे समाज म्हणून आपलं कर्तव्य आहे.सरकारला शेती आणि शेतकरी ही व्यवस्थाच मोडीत काढायची आहे.नवे भूसंपादन विधेयक हेच सांगते.सामांन्य शेतकर्‍याकडील शेती काढून ती धनदांडग्या कंपन्यांच्या घश्यात घालण्याचं देशव्यापी षडंयंत्र सुरू आहे.अशा स्थितीत काही शेतकरी आपल्या जमिनीत पाय रोवून सरकारची मनमानी मोडून काढत असतील आणि हमारी खेती नही देंगेचे नारे देत असतील आणि देशातील शेती उत्पन्न वाढवत असतील तर अशा शेतकर्‍यांना सलाम करणं नक्कीच आवश्यक आहे.प्रगतीशील शेतकर्यांचा सत्कार सरकार आणि जिल्हा परिषदाही करतात.परंतू तो एक उपचार असतो.त्यात मायेचा ओलावा नसतो.अनेकदा ज्या शेतकर्‍यांचे सत्कार होतात त्यांच्या निवडीबद्दलही प्रवाद व्यक्त होतात.जे खरे प्रयोगशील आहेत ते बाजुला राहतात आणि नेत्यांच्या किवा अधिकार्‍यांच्या जवळची मंडळी सत्कारमुर्ती म्हणून मिरवतात.हे सारं टाळत आणि खरोखर ज्या शेतकर्‍यांनी शेती वाचविण्यासाठी,उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केलेत, त्यात नवे प्रयोग केलेत अशा शेतकर्‍यांचे त्यांच्या बांधावर जाऊन आपलेपणानं सत्कार कऱण्याचा एक चांगला उपक्रम रायगड प्रेस क्लबनं गेल्या वषीपासून सुरू केला आहे.प्रयोगशील शेतकर्‍यांचा त्यांच्या बांधावर जाऊन सत्कार करण्याची अभिनव कल्पना मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस संतोष पवार यांचीे.त्यांनी ती व्यक्त केली आणि मिलिंद अष्टीवकर,विजय पवार,अभय आपटे,संतोष पेरणे,भारत रांजनकर,दीपक शिंदे यानी आणि त्याच्या अन्य उपक्रमशील पत्रकार  मित्रांनी  ती उचलून धरत तिला एका व्यापक चळवळीचं स्वरूप प्राप्त करून दिलं.रायगड जिल्हयातील पंधरा तालुक्यातील प्रत्येकी दोन याप्रमाणं तीस प्रगोयशील शेतकर्‍यांचा एकाच दिवशी त्यांच्या शेतावरच्या बांधावर जाऊन सत्कार कऱण्यात येतो.या सत्कारात केवळ उपचारच नसतो तर आपुलकी आणि प्रमाचा ओलावा आणि कृतज्ञतेची भावनाही प्रत्येक पत्रकाराच्या मनात ओतप्रोत भरलेली असते.कोणी तरी आपल्याघरी येतंय,आपल्या कार्याचं कौतुक करतंय ही गोष्टही प्रत्येक शेतकर्‍याला दिलासा देणारी,आणि शेतीबद्दलची आपली निष्ठा अधिक भक्कम कऱणारी असते.त्यामुळं रायगड प्रेस क्लबच्या या उपक्रमाचं मला कौतूक आहे.खरं तर बातमी देणं हेच पत्रकारांचं काम आहे असं अनेक जण म्हणतात.मला हे अजिबात पटत नाही.पत्रकार हा टपाल्या नाही.केवळ खबर्‍याही नाही.समाजातील तो जर एक सजग आणि संवेदनशील  घटक असेल तर त्यानं समाजाच्या सुख दुःखात भागिदार झालं पाहिजे असं मला नेहमी वाटत आलेलं आहे.पत्रकार म्हणून सामाजिक उत्तरदायीत्वाचंही भान आपण पाळलंच पाहिजे असा माझा आग्रह असतो.तीच मराठी पत्रकारितेची परंपरा आहे.महाराष्ट्रात ज्या पुरोगामी,लोकहिताच्या ज्या चळवळी झाल्या त्या एकतर पत्रकारांनी उभारल्या होत्या किंवा त्यात बिनीचे शिलेदार म्हणून पत्रकार आपली भूमिका पार पाडत होते.रायगडच्या पत्रकारांनी हा वसा जपलाय याचा मनस्वी आनंद मला आहे.मुंबई-गोवा महामार्गासाठीचं आंदोलन असो,सेझ विरोधी आंदोलन असो,स्थानिक प्रश्‍नांची चर्चा घडवून आणणारे महाचर्चा सारखे उपक्रम असोत अथवा  जिल्हयाला भेडसावणार्‍या पाणी टंचाईशी मुकाबला कऱण्यासाठी वनराई बंधारे बांधण्याचे काम असो हे रायगडमधील पत्रकारांनी केले आहे.ही सारी कामं राज्यासाठी आदर्श ठरणारी नक्कीच आहेत.शेतकर्‍यांचा त्यांच्या बांधावर जाऊन सत्कार कऱण्याचा उपक्रम केवळ अभिनंदनीयच आहे असं नाही तर तो अनुकरणीयही आहे. त्यामुळं रायगड प्रेस क्लबच सर्व टीमचं मनापासून अभिनंदन.जाता जाता रायगडच्या पत्रकारांना एकच सूचना करावी वाटते.7 जून रोजी पुण्यात मराठी पत्रकार परिषदेचं चाळीसावं अधिवेशन झालं.अधिवेशनाच्या समारोप कार्यक्रमात बोलताना जलपुरूष राजेंद्रसिंहजी यांनी प्रत्येक जिल्हा पत्रकार संघानं एक गाव दत्तक घेऊन तेथील पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावावा अशी सूचना केली आहे.रायगड प्रेस क्लबनं असं एखादं गाव दत्तक घेत त्याच  जलस्वयंपूर्ण गाव केलं तर तो देखील एक वेगळा आदर्श ठरेल.रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष संतोष पेऱणे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी याचा विचार करावा

रायगडमधील शेती टिकावी यासाठी जे शेतकरी प्रयत्न करीत आहेत त्यांच्या यशोगाथाचं हे पुस्तक दरवर्षी निघालं पाहिजे आणि त्याचं वितऱणी जाणीवपूर्वक झालं पाहिजे. कारण त्याचं हे काम लोकां पर्यंत गेले पाहिजे . ज्या शेतीनिष्ठ शेतकर्‍यांना रायगड प्रेस क्लबनं गौरविलं आहे,ज्यांचा सत्कार केला आहे अशा सर्व शेतकरी बांधवांना मनापासून शुभेच्छा आणि अभिनंदन

               एस,एम.देशमुख

                

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here