शेतकरी आंदोलनातून शेतकर्‍यांच्या हाती काही लागेल असं  वाटत नाही.याचं कारण असं की,हे आंदोलन आता शेतकर्‍यांचं राहिलं नाही.ते राजकारण्यांच्या ताब्यात गेलंय.जयाजी सुर्यवंशी यांनी शेतकर्‍यांची फसवणूक केल्यानंतर हे आंदोलन आता भरकटणार,भलत्याच लोकांच्या तावडीत सापडणार अशी भिती  वाटत होतं.तसंच घडतंय.मुख्यमंत्री पहिल्या दिवसापासून सांगत होते की,काही राजकीय शक्ती या आंदोलनामागे आहेत.भाई जगताप यांनी आज  मुख्यमंत्र्यांच्या या आरोपाला दुजोरा देत या आंदोलनामागं कॉग्रेसचं ब्रेन असल्याचं जाहीर करून आंदोलनाचं पुढं काय होणार याचं सुतोवाच केलंय.नाशिक येथील सुकाणू समितीच्या बैठकीत किंवा शेतकरी मेळावयात भाई जगताप काय करीत होते ? ते शेतकरी असतीलही पण एका पक्षाचे ते प्रवक्तेही आहेत हे शेतकरी विसरले नाहीत म्हणून तर त्यांना कडवा विरोध झाला..यावर राजू शेट्टीचं म्हणणं असं की,शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्यासाठी सैतानाची मदत घ्यावी लागली तरी आम्ही ती घेऊ.या त्यांच्या वाक्याला भाई जगताप यांना झालेल्या विरोधाचा संदर्भ होता.उद्दिष्ट साध्य होण्यासाठी चळवळीत सर्वांची मदत घ्यावी लागते हे जरी खरं असलं तरी ज्यांची मदत आपण घेतो ते सदाभाऊ खोत  वृत्तीचे नसतीलच याची हमी कोण घेणार ?.सैतानांना बरोबर घेऊन आपण अल्टिमेटम देऊ शकत नाही.कारण सैतानाचं काम विद्वंस करणं असतं.शिवाय विध्व् स करून किंवा हिसांचारानं कोणतेच प्रश्‍न सुटत नसतात.मध्यप्रदेशात सध्या काय सुरूय बघतोच आहोत.पाच शेतकरी गोळीबारात गेले.राहूल गांधी तिथं येऊन राजकारणच करताहेत.त्यांना अटक झाली तर परभणीपासून पुण्यापर्यंत कॉग्रेसवाल्यानं मिर्च्या झोंबण्याचं काहीच कारण नव्हतं.राहू द्या की चार दिवस आत.काय बिघडलं ? मात्र आज  वातावरण असं होते की , राहुलजींना केव्हा अटक होते आणि आपण मोदींचा निषेध  कधी  करतो ? .अशोक चव्हाण यांनी तर गोळ्या खाण्याची तयारी दाखविली.हा शुध्द भंकपणाय.कोण मारतंय यांना गोळ्या ?.अन गोळ्या जेव्हा चालतात तेव्हा हे पुढारी तिथं असतात तरी का ? आंदोलन कोणतंही असो,मरतात सामांन्य माणसंच.मध्यप्रदेशात जे मेले ते सामांन्य शेतकरीच ना.? गोळ्या चालत होत्या तेव्हा एकही भंपक पुढारी तिथं नव्हता. नंतर सारे डोमकावले जमा झाले . पाच-सहा शेतकरी कुटुंब देशोधडीला लागली त्याची चिंता कोणाला नाही.निषेध होतोय राहूल गांधींच्या अटकेचा.सारं ढोंग आहे.महाराष्ट्रातलं शेतकरी आंदोलन मध्यप्रदेशच्या मार्गानं घेऊन जाण्याची तयारी सुरू आहे की,काय अशी शंका यावी अशी वक्तव्य आज राजकीय नेत्यांनी केलीत.राजू शेट्टी यांनी तीन दिवसाचा अल्टिमेटम दिलाय.शंभर वर्षाचे शेतकर्‍यांचे प्रश्‍न तीन दिवसात सुटावेत की,सोडवावेत असा अल्टिमेटम देणं हा दुसरा भंपकपणा आहे.तीन दिवसात सरकार काहीच करणार नाही.सरकार घाबरलं आणि त्यानं मंत्रिगटाची स्थापना केली असं कोणाला वाटत असेल तर हे मंत्रीगट केवळ कालापव्ययासाठी असतात हे पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार संरक्षण कायदा करावा की नको यासाठी नेमलेल्या मंत्रीगटाचा अनुभव आमच्या पाठिशी आहे.ज्या नारायण राणे यांचा कायद्याला विरोध होता तेच मंत्रीगटाचे प्रमुख होते.यातून निष्कर्ष काय निघणार हे आम्हाला माहिती होते.घडलंही तसंच.शेतकर्‍यांसाठी नेमलेल्या मंत्रीगटाचे असेच निष्कर्ष असतील.थोडक्यात सरकारनं आता आंदोलनाची पोथी ओळखलीय.शिवाय आता पाऊस सुरू झालाय.दोन दिवसात तो सर्वत्र पसरणार आहे.एकदा पाऊस सुरू झाला की,शेतकर्‍यांच्या पेरणीची लगबग सुरू होईल.मग शेतकर्‍यांनी पेरण्या कराव्यात की,आंदोलन असा प्रश्‍न निर्माण होणार आणि हे आंदोलन हळूहळू ओसरणार.सरकारला हे पक्क माहित असल्यानं मुख्यमंत्री आम्ही कर्ज माफ केल्याचीच टेप वाजवत आहेत , राहणार.

राजू शेट्टीनी अल्टिमेटम दिले ,बच्चू कडू शंभर पावले पुढे गेले  .त्यांनी थेट बॉम्ब फोडण्याची भाषा केली.ते बॉम्ब फोडतील आणि सरकार बघत बसेल असं त्याना वाटतं का ?  हे काही होणार नाही पण बच्चू कडूचं वक्तव्य आलं की,लगोलग भाजप नेत्यांनी त्याच्या वक्तव्याचा निषेध केला.बॅकफूटवर गेलेल्या सरकारला सावरण्यासाठीच तर अशी भडकावू वक्त्यवे होत नसतील ना?  अशीही रास्त शंका येते. शेकापचे नेते आमदार  जयंत पाटील यांनी मुंबईचं पाणी तोडण्याची भाषा केली.पेण तालुक्यात हेटवणे येथे तालुक्यातील 45 गाावांना पाणी पुरवठा कऱण्यासाठी धरण बांधलं गेलं.पंचवीस वर्षे झाली हे पाणी सिडकोला आणि अन्य खासगी कंपन्यांना दिलं जातंय.शेतकर्‍यांना ते मिळतच नाही.सिडकोला जाणारे हे पाणी रोखू न शकलेले जयंत पाटील मुंबईला मिळणारे पाणी तोडण्याची भाषा करतात तेव्हा गंमत वाटते.शेतकरी चळवळ आणि मुबईचा पाणीपुरवठा याचा संबंध काय ?.मुंबईत राहणार्‍यांनी शेतकर्‍यांच्या मागण्याना विरोध केलाय का ? शिवाय तुमचं भांडण हे मुंबईत राहणारांबरोबर आहे की,सरकारबरोब ? म्हणजे आपण काय बोलतो आहोत याचं तारतम्य बाळगण्याची गरज या नेत्याना वाटत नाही.एकीकडं सैतानाची मदत घेण्याची भाषा करायची आणि दुसरीकडं मुबईचं पाणी तोडायच्या धमक्या द्यायच्या.म्हणजे सैतान तुम्हाला चालणार पण मुंबईकर नको.मुंबईत शेतकर्‍यांची मुलं नाहीत का  राहात. ? ही सारी विधान या लोकांना शेतकरी प्रश्‍नांशी काही देणं घेणं नाही हे दाखविणारीच आहेत.मुळात शेतकर्‍यांनाही या मंडळींबद्दल विश्‍वास राहिलेला नाही.एकीकडं सरकारविरोधात बोलणारे शेट्टी आणि कडू सरकारला मदत करीत असतात.स्वाभिमानीने अगोदर सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा आणि मग जर तरची भाषा बोलावी.दोन्ही डगरीवर हात ठेऊन असणार्‍यांच्या धमकयांना सरकार भिक घालणार नाही हे स्पष्टय.त्यामुळं मला तरी या आंदोलनास फार काही भवितव्य आहे असं वाटत नाही.ज्या उर्मीनं हे आंदोलन सुरू झालं,जो दबाव पहिली दोन दिवस होता तो नंतर राहिला नाही.याचं कारण हे आंदोलन नेतृत्वहिन बनलं.सुकाणू समिती नंतर झाली पण तीत शेतकरी कमी आणि राजकारणी जास्त अशी स्थिती झाली.त्यामुळं सरकारला मतलबी विरोध हेच या आंदोलनाचं सूत्र होऊन गेलं.शेतकरी हित बाजुलाच राहिलं.माझ्याकडं शेती आहे.शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांशी मी चांगला परिचित आहे.ते मी अनुभवले देखील आहेत.त्यामुळंच या आंदोलनाची सुरू असलेली फरफट बघवत नाही.सरकारला जे हवंय तेच घडतंय.त्यामुळं  शेतकर्‍यांच्या हाती काहीच लागणार नाही हे स्पष्ट दिसतंय.हे आंदोलन असंच संपणार,पुन्हा दुसरं शेतकरी आंदोलन पुढील दहा-पाच वर्षे तरी उभं राहत नाही.या काळात शेतकरी भरडला जात राहणार.कर्जमुक्ती झालीच पाहिजे म्हणत विरोधक संघर्ष यात्रा काढणार,सभागृह बंद पाडणार.होणार काहीच नाही.देशातील शेतकर्‍यांचं ही शोकांतिका आहे  की,विश्‍वास कोणावर ठेवावा हेच त्याला आता कळेनासं झालंय.ज्यांच्यावर विश्‍वास ठेवला त्यानी दगा दिलाच म्हणून समजा.जयाची हा फारच चिल्लर आणि छोटा माणूस आहे.तो स्वस्तात विकला जाणार हे गृहित होतंच,मात्र स्वतः शेतकर्‍यांचे तारणहार समजाणारे अनेकजण असेच विकले गेलेत.त्यातून शेतकरी संघटीत होऊ शकला नाही.शेतकरी संघटीत झालाच नाही पाहिजे ही सर्वपक्षीय इच्छा आहे.ती पुन्हा एकदा फलद्रुप होताना दिसते आहे.

एस.एम.देशमुख 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here