एक आठवण

शरद पवार तेव्हाचे आणि आजचे…

2012 मधील गोष्ट आहे.तेव्हा महाराष्ट्रात कॉग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती.अजित पवार यांचा तेव्हा एवढा दरारा होता की,त्यांच्यासमोर कोणी ‘ब्र’ उच्चारू शकत नसे.’अजित पवार बोले दल हले’ असे ते दिवस होते.राज्यातील कॅबिनेट मंत्री या नात्यानं अजित पवार नांंदेड जिल्हयातील माळेगाव येथील एका शेतकरी मेळाव्यासाठी माळेगावला गेले होते.त्याचं भाषण सुरू असताना एक गरीब शेतकरी उठला।जाहीर सभेत न घाबरता त्यानं थेट अजित पवार यांना काही प्रश्‍न विचारायला सुरूवात केली.अनपेक्षितपणे घडलेल्या या प्रकारामुळे सार्‍यांच्या नजरा त्या शेतकर्‍यांच्या दिशेनं वळल्या.कॅमेरे देखील शेतकर्‍यांच्या दिशेनं वळले.हे पाहून अजित पवार अस्वस्थ झाले.आपल्या समोर बोलण्याची भल्याभल्यांची हिंमत नाही अशा स्थितीत एक गरीब शेतकरी भर सभेत उभा राहतो आणि काही प्रश्‍न विचारतो हे अजित पवार यांना अजिबात आवडले नाहीँ .ते त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होते.मात्र शेतकर्‍यांच्या मेळाव्यात ते या शेतकर्‍याला काही बोलू शकत नव्हते.त्यामुळं ‘वडयाचं तेल वांग्यावर’ या उक्ती प्रमाणे मग त्यांनी पत्रकारांना धारेवर धरले..’यांना तर दंडुक्यानंच ठोकलं पाहिजे’ असे उद्दगार त्यांनी काढले..खरं म्हणजे यात पत्रकारांची चूक काय होती ? ते आपलं वार्तांकनाचं काम करीत होते.मात्र बातमीमुळं ‘एक सामांन्य शेतकरी अजित पवारांना आव्हान देण्याची हिंमत दाखवू शकतो हा मेसेज राज्यात पोहचू शकतो’ हे अजित पवार यांना माहिती होतं आणि म्हणूनच ते पत्रकारांवर भडकले होते.दंडुक्यानं मारण्याची भाषा त्यांंनी केली होती. त्यांच्या या वक्तव्यानं राज्यात हलकल्लोळ माजला.पत्रकारांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली.त्याचा एक फायदा असा झाला की,कधी नव्हे ते सारे पत्रकार आणि पत्रकार संघटना ‘पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती’च्या बॅनरखाली एकत्र आले.मुंबईत या संघटनांची बैठक झाली.त्यात ‘अजित पवार यांच्या बातम्यांवर बहिष्कार टाकण्याचा’ एकमुखी निर्णय झाला.तो सर्वांनीच तंतोतंत पाळला.दररोज विविध चॅनल्सवर झळकणारे,वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर दिसणारे अजित पवार माध्यमातून गायब झाले.पुण्यातील पत्रकारांनी तर खास पुणेरी स्टाईलनं अजित पवार यांना धक्का दिला.एका कार्यक्रमासाठी अजित पवार आले असता ते भाषणाला उठले की,एकजात सारे कॅमेरे बंद झाले..म्हणजे शूटिग बंद केली गेली.नोटस घेणार्‍या प्रिन्टच्या पत्रकारांनी लेखण्या म्यान केल्या.’अजित पवारांनी राज्यातील पत्रकारांची माफी मागावी’ अशी प6कारांची मागणी,इच्छा,अपेक्षा होती.स्वभावानुसार अजित पवार त्याला तयार नव्हते.प्रकरण वाढत चाललं होतं.हे पवारांच्या अनुभवी , चाणाक्ष नजरेतून सुटलं नाही.याचे पक्षावर काय परिणाम होणार हे देखील त्यांनी हेरलं.शरद पवार यांनी मग कोल्हापूरमध्ये एक पत्रकार परिषद घेतली.त्यात त्यांनी राज्यातील पत्रकारांची बिनशर्त माफी मागितली.त्यांच्या या दिलदारपणाचं,खिळाडूवृत्तीचं तेव्हा राज्यात स्वागत झालं. आम्ही देखील हा विषय तेथेच संपविला.यावरून पत्रकारांमध्ये मत प्रवाह होते.’अजित पवारांनी पत्रकारांबद्दल अपशब्द काढले आहेत तर माफी देखील त्यांनीच मागावी’ असं एका गटाचं म्हणणं होतं.दुसरा गट म्हणत होता की,’शरद पवार हे पक्षाचे अध्यक्ष आहेत,देश पातळीवरचे नेते आहेत ,त्यांनी माफी मागितली तर विषय संपवावा’.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या बैठकीत शरद पवारांच्या माफीमुळं अजित पवारांच्या बातम्यावरील बहिष्कार मागे घेतला गेला आणि विषय संपविला गेला.व्यक्तीगत पातळीवर मला याची मोठीच किंमत मोजावी लागली.माझ्या 18 वर्षाच्या जॉबवर पाणी सोडावं लागलं.असो

मुद्दा हा की जी चूक शरद पवारांनी केलेली नव्हती त्या चुकीची शरद पवारांनी माफी मागत आपल्या सहिष्णूतेचं,सभ्यपणाचे आणि सुसंस्कृतपणाचे दर्शन तेव्हा जगाला घडविला होतं.मात्र दुदैर्वानं ती सहिष्णूता शरद पवार यांना श्रीरामपुरात दाखविता आली नाही.नातेवाईकांचा उल्लेख होताच त्यांचा तोल गेला आणि ‘पत्रकारांनी माफी मागावी’ अशी मागणी त्यांनी केली.खरं म्हणजे त्यांच्या जिव्हारी लागेल असं पत्रकार काहीच बोललेला नव्हता.बहुतेक नेत्यांभोवती नातेवाईकांचा गराडा पडलेला असतो.शरद पवार त्याला अपवाद नाहीत.सार्‍याच पक्षात जशी ‘घराणेशाही’ आहे तशीच ‘नातलगशाही’ देखील आहे.सत्ता असली की,नातेवाईक जवळ येतात..सत्तेचा मलिदा संपला की,दूर जातात ही जगरहाटी आहे.त्यामुंळं पत्रकाराचा हा प्रश्‍न त्यांनी नेहमीच्या खिळाडूवृत्तीनं घेणं अपेक्षित होतं.ते त्यांनी केलं नाही.पवार असे का,वागले यावरून आता तर्क वितर्क व्यक्त होत आहेत.त्यामागं पवारांचं काही राजकारण आहे का ? आम्हाला माहिती नाही पण पत्रकारानं काही चुकीचं विचारलं नव्हतं हे आमचं मत आहे आणि त्यावर आम्ही ठाम आहोत.आता ‘तो पत्रकार कोणाची तरी सुपारी घेऊन आला होता’ वगैरे अफवा पसरविल्या जात आहेत.काही फोटो व्हायरल केले जात आहेत.हा नेहमीचाच आमचा अनुभव आहे.एखादया पत्रकारावर जेव्हा हल्ला होतो तेव्हा तो पत्रकारच किती बदमाश आहे आणि हल्लेखोर किती सोज्वळ, साधू संत आहे याचे किस्से ऐकविले जातात.आमच्या हे सारं अंगवळणी पडलं आहे.संबंधित पत्रकारांच्या बाबतीत आणखीनही कंडया पिंकविल्या जातील.त्याचं करता येईल तेवढं चारित्र्यहनन केलं जाईल.मात्र त्यामुळं वस्तुस्थिती बदलत नाही, किंवा त्यानं विचारलेला प्रश्‍न दुर्लक्षिला येणार नाही.जनतेच्यावतीनं नेत्यांना प्रश्‍न विचारणं हा पत्रकारांचा हक्क आहे.हे प्रश्‍न तुम्हाला आवडतीलच असेच असू शकत नाहीत.न आवडते प्रश्‍नही येणारच.अन हे पवारांनाच विचाचरलेले जातात असं नाही। ते बाळासाहेब ठाकरेंना ही विचारले जायचे,राज ठाकरेंनाही विचारले जातात आणि फडणवीसांनाही विचारले जातात.ज्यांना पत्रकारांनी प्रश्‍न विचारणे आवडत नाही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंच्याप्रमाणं पत्रकार परिषदा घेण्याच्या भानगडीतच न पडलेलं बरं.पत्रकारांना सामोरं जायचंच असेल तर मग येणारा प्रश्‍न तेवढ्याच खिळाडूपणे घेण्याची तयारी असली पाहिजे.

आम्ही श्रीरामपूरच्या पत्रकारांबरोबर आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here