वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी धोरण तयार करा

    0
    728
    मुंबई : ठाण्यात वृत्तपत्र विक्रेत्यांना ज्या पद्धतीने महापालिकेने काही अटी व शर्तीच्या आधारे फुटपाथवर स्टॉल उभारण्याची परवानगी दिली आहे; त्याच पद्धतीने मुंबई महापालिकेने मुंबईतील वृत्तपत्र विक्रेत्यांना संरक्षण द्यावे. त्यासाठी सर्वंकष धोरण तयार करावे, अशी मागणी मंगळवारी महापालिका आयुक्त अजय मेहता यांच्याकडे वृत्तपत्र विक्रेत्यांच्या शिष्टमंडळाने केली.

    मुंबईतील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अजय मेहता यांची भेट घेतली. शिष्टमंडळामध्ये उपमहापौर अलका केरकर यांच्यासह अजित पाटील, अजित सहस्रबुद्धे, शिरीष परब, जयवंत डफळे, सुशांत वेंगुर्लेकर, घनश्याम यादव, संजय सानप यांचा समावेश होता.
    मुंबई-ठाणे वृत्तपत्र विक्रेता एकीकरण समितीच्या माध्यमातून मुंबईत वृत्तपत्र वितरित करण्याचे काम केले जाते. मुंबईत सुमारे दोन हजार वृत्तपत्र विक्रेते आहेत. अनेक ठिकाणी हे वृत्तपत्र विक्रेते फुटपाथवर बसून वर्तमानपत्रे विकतात.महापालिकेतर्फे त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. त्यामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांना संरक्षण देण्यात यावे, असे पत्र शिष्टमंडळाने आयुक्तांना दिले आहे. आयुक्तांनी हे पत्र विकास नियोजन विभागाला पाठविले असून, त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती शिष्टमंडळाने दिली. आमदार आशिष शेलार यांच्यासह वृत्तपत्र विक्रेत्या संघटनेचे प्रतिनिधी अजित पाटील, अजित सहस्रबुद्धे, शिरीष परब, जयवंत डफळे, सुशांत वेंगुर्लेकर, घनश्याम यादव, संजय सानप यांनी आयुक्त अजय मेहता यांना वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here