राहूल गांधींच्या भाषणाने भाजपवाले अस्वस्थ का ?

0
2276

जागतिक व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक भाषणं ठोकली.भाजप सरकारच्या काळात ‘भारत कसा बदलत आहे’ याचे अत्यंत रसभरीत वर्णन करून टाळ्या मिळविल्या.त्यांच्या होत असलेल्या जंगी स्वागतानं प्रत्येक भारतीय नागरिकांची छातीही 56 इंचापर्यंत फुगली.भारतानं कशी आणि किती प्रगती केलीय हे मोदी बाहेर जावून अगदी तिखट-मीठ लावून सांगत होते.आता मोदींना त्यांच्याच पध्दतीनं प्रत्युत्तर देण्याचं कॉगेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी ठरविलेलं दिसतंय.राहूल गांधी यांनी बर्कले येथील कॅलिफॉर्निया विद्यापीठात जाऊन भाषण दिलं.मी कॉग्रेसचा प्रवक्ता नाही,किंवा हितचिंतकही नाही.तटस्थ पत्रकार म्हणून मला राहूल गांधींचे भाषण परिपक्व वाटले.आपले राजकीय विरोधक असलेल्या नरेंद्र मोदी यांची त्यांनी व्यक्तीगत ताऱीफ केली.त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.परंंतू त्यांची धोरणं देशासाठी किती महागात पडत आहेत हे प्रभावीपणे सांगितले.नोटाबंदीचा निर्णय आणि जीएसटीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा तडाखा बसल्याचे वास्तव त्यांनी जगासमोर मांडलं.सरकारी निर्णयानं शेतकरी आणि उद्योजक कसे जेरीस आलेत हे सांगतानाच त्यांनी रोजगार निर्मिती घटल्याने तरूण बेरोजगारांचे तांडे नोकरीसाठी इतस्ततः कसे भटकत आहेत हे ही स्पष्ट केलं.एवढेच नव्हे तर पक्षानं सांगितलं तर आपण पंतप्रधानपदाचे उमेदवार व्हायलाही तयार आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मोदींच्या राजवटीत हिंसा,व्देष आणि धु्रवीकरणाच्या राजकारणाने डोके वर काढले आहे.हे मुद्दे देशासाठी नवे असून हाच न्यू इंडिया आहे असा टोलाही राहूल गांधी यांनी लगावला.तो भाजपच्या वर्मी लागावा असाच होता.

खरं तर राहूल गांधी यांच्या  भाषणाची  दखल घेण्याची गरज नाही अशी टिप्पणी  केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी  केली होती. मात्र राहूल गांधी यांच्या भाषणाचे परिणाम काय होऊ शकतात हे जेव्हा भाजप नेत्यांच्या लक्षात आले त्यानंतर स्मृती इराणी यांच्यापासून पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यापर्यंत सर्वांनीच भाषणावर टीका करायला सुरूवात केली.भारत बदल रहा है हे सत्य नाही हे वास्तव प्रथमच राहूल गांधींच्या भाषणाने जगासमोर आले.देश किती समस्यांना सामोरं जात आहे हे ही जगासमोर आलं.न्यू इंडियातील वास्तवाचं प्रतिबिंब राहूल गांधींच्या भाषणात उमटल्यानं आणि अमेरिकेतील माध्यमांनी गांधींच्या भाषणाला जोरदार प्रसिध्दी दिल्याने सारे भाजप नेते अस्वस्थ झाले.जागतिक नेता होण्याची इच्छा धारण करणार्‍या मोदी यांच्यासाठी हे सुचिन्ह नाही.मोदी जे बोलतात ते सत्यच आहे असं नाही हे देखील अमेरिकेच्या लक्षात आलं.त्यामुळं राहूल गांधींना लक्ष्य केलं जातंय.राहूल गांधींना आता बाहेरची निमंत्रण येऊ लागली आहेत.ही बाबही भाजपला धोक्याची वाटायला लागली आहे.मोदी जेथे जातील तेथे जाऊन उद्या राहूल गांधींनी हीच टेप वाजविली तर प्रतिमा निर्मितीचा जो कार्यक्रम मोदींनी हाती घेतला आहे तो अयशस्वी होणार आहे.हा धोका स्वीकारायला भाजप नेते तयार नसल्याने त्यांनी आगपाखड सुरू केली आहे.खरं तर मोदी जेव्हा बाहेर जाऊन जोरदार सभा घेतात,खरं खोटं रेटून सांगतात तेव्हा त्यांच्यावर फार काही कोणी टीका करीत नाही.त्याच्या उलट आता घडायला लागताच भाजप नेत्यांच्या कानात धोक्याची घंटा वाजायला लागली आहे. इराणीबाई म्हणाल्या,देशात कोणी ऐकत नाही म्हणून हे नेते बाहेर जाऊन बोलत आहेत.अमित शहा म्हणाले,देशात अपयशी ठरलेले नेते अमेरिकेत भाषणं ठोकत आहेत.खरं  म्हणजे अपयशी झालेल्या किंवा देशात ज्यांची भाषणं कोणी ऐकत नाही अशा नेत्यांनी बाहेर जाऊन केलेल्या भाषणाची भाजपनं दखल घेण्याचंच कारण नव्हतं.पण भाजप नेते गांधी या नावाला घाबरतात हे सत्य पुन्हा एकदा दिसून आलं आहे.सारा आक्रोश त्यातूनच सुरूय.राहूल गांधींच्या या भाषणानंतर मोदी जेव्हा केव्हा अमेरिकेत जातील तेव्हा मोदी,मोदीचे नारे लावणारा समाज त्यांना भारताचं खरं चित्र काय तुम्ही सांगता ते की,गांधी सांगतात ते असा प्रश्‍न विचारल्याशिवाय राहणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here