राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या सरकारी कार्यक्रमाचा राज्यभर फज्जा..

मुंबई,दिनांक 16 ( प्रतिनिधी) माहिती आणि जनसंपर्क विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाचा आज राज्यभर फज्जा उडाला.राज्यातील पत्रकारांनी पत्रकार दिनाच्या सरकारी कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याने बहुतेक जिल्हयात एकही पत्रकार जिल्हा माहिती कार्यालयाकडं फिरकलाच नाही.त्यामुळं आपल्या कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुप्पहार घालून राष्ट्रीय पत्रकार दिनाचा उपचार पार पाडला गेला.बहिष्कार आंदोलन यशस्वी केल्याबदद्ल पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी राज्यातील पत्रकारांचे आभार मानले आहेत.

16 नोव्हेंबर रोजी दरवर्षी राष्ट्रीय पत्रकार दिन देशभर साजरा केला जातो.महाराष्ट्रातही सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाच्यावतीने हा दिवस साजरा केला जातो.प्रेस कौन्सिल एक विषय कळविते आणि त्या विषयावर राज्यभर जिल्हा माहिती कार्यालय आणि पत्रकार संघाच्यावतीने संयुक्तरित्या कार्यक्रमाचे आयोजन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.यावर्षी डिजिटल युगातील पत्रकारिता आणि आचारनीती आणि आव्हानं हा विषय चर्चासत्रासाठी दिला गेला होता.माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयानं 10 सप्टेंबर रोजीच प्रत्येक जिल्हा माहिती अधिकार्‍यांना पत्र पाठवून तसे कळविले होते.या कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सन्मान करावा अशा सूचनाही दिल्या गेल्या होत्या.मात्र पत्रकारांच्या मागण्यांसंदर्भात केवळ घोषणा करून प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जात नसल्यानं राज्यातील पत्रकार संतापलेले आहेत.त्यामुळं पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती,मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकारांच्या अन्य संघटनांनी आजच्या राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते.त्यानुसार राज्यातील बहुतेक जिल्हयात पत्रकार जिल्हा माहिती कार्यालयाकडं फिरकलेच नाहीत.परिणामतः  कर्मचार्‍यांच्या अथवा दोन-चार पत्रकारांच्या उपस्थितीत जिल्हा माहिती अधिकार्‍यांना या कार्यक्रमाचा उपचार उरकावा लागला.जिल्हा माहिती अधिकार्‍यांच्या दालनात कार्यालयातील कर्मचार्‍यांनी  बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा झाल्याच्या प्रेस नोट जिल्हा माहिती कार्यालयानं प्रसिध्दीस दिल्या.चर्चासत्र वगैरे कोठेही झाले नाही.

पत्रकार संरक्षण कायदा विधिमंडळानं मंजूर केलाय पण त्याची अंमलबजावणी होत नाही,मजिठिया लागू कऱण्याचे आदेश सुप्रिम कोर्टानं देऊनही सरकार या आदेशाची अंमलबजावणी करीत नाही,मागच्या अधिवेशनात राज्य सरकारनं पत्रकारांसाठीच्या निवृत्ती वेतनाची घोषणा केली पण त्याचीही अजून अंमलबजावणी होत नाही,अधिस्वीकृती समितीचे नियम जाचक करून ग्रामीण भागातील पत्रकारांना त्यापासून वंचित ठेवण्याचा खटाटोप होत आहे शिवाय नवे जाहिरात धोरण आणून छोटया आणि जिल्हास्तरीय वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न होतो आहे.या सर्वाबद्दल राज्यातील पत्रकारांमध्ये मोठाच असंतोष आहे.त्याचं प्रतिबिंब आजच्या आंदोलनात उमटलं आणि सर्वत्र बहिष्कार आंदोलन यशस्वी झालं.आंदोलन यशस्वी केल्याबद्दल एस.एम.देशमुख,किरण नाईक,सिध्दार्थ शर्मा,गजानन नाईक,अनिल महाजन,शरद पाबळे यांनी राज्यातील पत्रकारांना मनःपूर्वक धन्यवाद दिले आहेत.सरकारनं या बहिष्कार आंदोलनापासून बोध घ्यावा आणि 26 तारखेपुर्वी पत्रकारांच्या मागण्यांची अंमलबजावणी करावी अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने केली आहे.26 नोव्हेंबर रोजी राज्यातील पत्रकार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन कऱणार आहेत.

छायाचित्र ः पाटण येथील पत्रकारांनी तहसिलदाराना निवेदन दिऊन आपला संताप व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here