रायगड वार्तापत्र

0
736

पनवेल महापालिकेसाठीचा रणसंग्राम सुरू 

पनवेल महापालिकेवर वर्चस्व प्रस्तापित करण्यासाठी भाजप विरूध्द शेकाप-राष्ट्रवादी- कॉग्रेस असा सामना रंगतो आहे.या रणसंग्रामात शिवसेना स्वतंत्र लढणार आहे की,सेनेची साथ भाजपला मिळणार आहे याचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.रायगड जिल्हयातील पहिल्याच पनवेल महापालिकेची निवडणूक पहिल्यांदाच 24 मे रोजी होत आहे.26 मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत.पनवेल महापालिका होण्यापुर्वी ती भाजपच्या ताब्यात होती.भाजपचे नेते रामशेठ ठाकूर आणि आ.प्रशांत ठाकूर या पितापुत्रांसाठी ही लढाई प्रतिष्ठेची असून दुसरीकडे माजी आमदार विवेक पाटील तसेच सुनील तटकरे आणि शेकापचे जयंत पाटील यांनीही जिल्हयातील पहिलीच महापालिका ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली आहे.रायगड जिल्हा परिषदेत सध्या शेकाप-राष्ट्रवादी आणि कॉग्रेस अशी आघाडी असून तोच फॉर्म्युला पनवेल महापालिकेसाठी वापरून निवडणूक जिंकण्याची रणनीती शेकाप मित्र पक्षांनी आखली आहे.पनवेलच्या एकूण 64 प्रभागातील 252 जागांसाठी ही निवडणूक होत असून 29 एप्रिल ते 6 मे या काळात उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत.30 तारखेला रविवार असला तरी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.मात्र एक मे रोजी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.सध्या रायगडमध्ये कडक उन्हाळा आणि लग्नसराई असल्यानं मतांचा टक्का वाढविण्याचे मोठे आव्हान निवडणूक यंत्रणेसमोर आहे.-

डॉक्टर आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या 

रायगड जिल्हयातील तीन स्थळांचा विकास होणार 

आधुनिक भारताचा पाया रचून सामाजिक,आर्थिक व राजकीय क्षेत्रात ऐतिहासिक योगदान देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त कऱण्यासाठी त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या 28 स्थळांंचा विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.त्यासाठी वीस कोटी रूपयांची तरतूद कऱण्यातआली आहे।.महाडमधील ऐतिहासिक चवदार तळ्याचे सुशोभिकरण आणि शाहू महाराज सभागृहाच्या नूतनीकरणासाठी एक कोटी रूपयांचा निधी दिला गेला आहे.त्यानुषंगानं महाड नगरपालिका आणि संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांची बैटक सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी घेतली त्या प्रसंगी त्यानी ही माहिती दिली। सामाजिक समतेच्या लढयाची सुरूवात केलेल्या चवदार तळ्याचे सुशोभीकरण,क्रांतीस्तंभ आणि सभागृहाचे नूतनीकरण,शेतकर्‍यांच्या ऐतिहासिक संप जेथे झाला ते चरी गाव,आदि रायगड जिल्हयातील तीन ऐतिहासिक स्थळांचा यामध्ये समावेश असल्याचे मंत्री महोदयांनी स्पष्ट केले.चरी परिसरातील शेतकर्‍यांनी एकत्र येत खोतांच्या विरोधात संप पुकारला.तो सहा वर्षे चालला.जगातील सर्वाधिक काळ चाललेला संप म्हणून चरीच्या शेतकरी संपाची नोंद आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी चरीला जावून शेतकर्‍यांचे नेतृत्व केले होते.

रायगडात विक्रमी तापमान 

माणगाव तालुक्यातील भिरा येथे 46.5 अंश सेल्सियश एव्हडे विक्रमी तापमान नोंदविले गेल्यानंतर त्याची चर्चा देशभर सुरू झाली.आजही रायगडमधील अनेक ठिकाणं अशी आहेत की,तेथे दुपारी 38 ते 42 अंश सेल्सियश तापमान नोंदविले जाते.एकीकडं कडक उन्हाळा आणि दुसरीकडं 22 टक्के हवेतील आर्द्रता यामुळं रायगडवासिय त्रस्त आहे.एवढया प्रचंड उन्हाची कोकणाला सवय नसल्यानं वाढललेल्या तापमानाचे कोकणातील निसर्ग आणि इथल्या समाजजीवनावर काय परिणाम होऊ शकतात याची चर्चा सुरू झाली आहे.कोकणातील वाढत्या तापमानामुळे सहयाद्रीच्या रांगातील खडकातील मूलद्रव्ये प्रसऱण पावतात,परिणामी खडक फुटतात याची प्रचिती महाड तालुक्यातील माझेरी घाटातील भूस्खलनानंतर आलेली आहे.खडका प्रमाणेच माती तिच्या उष्णता ग्रहण करण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त तापत असल्याने तिच्यातील नैसर्गिक मूलद्रव्ये र्‍हास पावतात.मातीमध्ये अनेक सुक्ष्म जिवांचा अधिवास असतो हे जीव अतिउष्णतेमुळं नष्ट होतात.तसेच वातावरणातील अनेक वायू अधिक प्रसारित होऊन त्याचा प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष प्राणिमात्रांसह भूभागावर देखील होतो.असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.शरीरालीत पाण्याच्या प्रमाणात घट होत असल्याने त्याचा परिणाम माणसाच्या शारीरिक कार्यक्षमतेवर देखील होतो असंही सांगितलं जातं.कडक उन्हामुळं रायगडमधील सर्वसामांन्य जनजीवन विस्कळीत झालेलं आहे.दुपारी बाहेर पडायलाही कोणी तयार नसते.

रायगडात 367 गावं आणि 1,109 वाडयांवर  पाणी टंचाई 

रायगडातील पाणी टंचाई ही आता अपवादात्मक बातमी राहिलेली नाही.साडेतीन हजार मिली मिटर पाऊस पडूनही दरवर्षी न चुकता कोकणातील शेकडो गावांसमोर पिण्याच्या पाण्याचं संकट हमखास उभे राहते.पाणी पुरवठ्यासाठी दरवर्षी सरकार कोटयवधी रूपये खर्च करीत असते.यंदा 367 गावं आणि 1,109 वाडयांना पाणी टंचाईचा फटका बसला आहे.यामध्ये सर्वाधिक टंचाईग्रस्त गावं पोलादपूर तालुक्यात आहेत.तेथे 48 गावं आणि 272 वाडयांना पाणी टंचाईची झळ बसली आहे.जिल्हयाची राजधानी असलेल्या अलिबाग तालुक्यात 12 गावं आणि 71 वाडयांवर पाण्याचा प्रश्‍न निर्माण झालेला आहे.पाणी टंचाई निवाऱणासाठी यंदा जिल्हा प्रशासन 6 कोटी 25 लाख 10 हजार रूपये खर्च करण्याचं नियोजन केलं आहे.त्यातून जिल्हयातील 12 गावं आणि 74 वाडयांना टँकरनं पाणी पुरविलं जात आहे.जलशिवार मधून जिल्हयात चांगली काम झालींत,पाणी साठाही चांगला झाला पण वाढत्या उन्हामुळं त्याचा उपयोग होताना दिसत नाही.दुसरीकडं जिल्हयातील 28 पाटबंधारे प्रकल्पांपैकी 8 प्रकल्पातील पाणी साठी 25 टक्क्याहून कमी झाला आहे.त्यामुळं पाणी पुरवठयात 25 ते 30 टक्के कपात करण्यात आली आहे.उर्वरित 12 धरणात 25 ते 40 टक्के पाणीसाठा असून तो केवळ 45 ते 60 दिवसच पुरेल असे सांगितले जात आहे.त्यामुळं वेळेत पाऊस सुरू झाला नाही तर या धरणांवर अवलंबून असलेल्या शहरांनाही पाणी टंचाईशी मुकाबला करावा लागू शकतो.–
शोभना देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here