रायगड वार्तापत्र

0
808
????????????????????????????????????

* रायगड किल्ल्याला गत वैभवप्राप्त होणार

* रायगडातील पत्रकार रस्त्यावर

* 250 अंगणवाडया स्वतःच्या घरात जाणार

* ग्रंथोत्सवाला अलिबागकरांचा जोरदार प्रतिसाद

रायगड किल्ल्याला गत वैभवप्राप्त होणार 

शिवरायांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या संवर्धनाच्या कामास 15 डिसेंबरपासून सुरूवात होतेय.त्यासाठी विभागीय आयुक्त जगदीश कदम आणि जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी गडाची नुकतीच पाहणी करून 19 कामांसाठीचा कालबध्द कार्यक्रम तयार केलाय.रायगडच्या संवर्धनासाठी आणि सुशोभिकरणासाठी सरकारनं सहाशे कोटींचा आराखडयास यापुर्वीच मंजुरी दिलीय.पहिल्या टप्प्यातील कामांसाठीचा 59 कोटींचा निधी जिल्हा प्रशासनास प्राप्त झालाय.या कामाची निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झाली असून 15 डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामाला सुरूवात होतेय.रायगड किल्ल्याभोवती 13 किलो मिटरचा परिक्रमा मार्ग तयार केला जातोय.यामध्ये दगडी पायवाट,लाईट बोर्ड,माहिती फलकांचा समावेश असेल.तसेच जगदीश्‍वर मंदिर,राजवाडा,नगारखाना,छत्रपती शिवाजी महाराज समाधी स्थळ,जिजाऊ समाधी स्थळ,याच्या संवर्धनाची कामे केली जाणार आहेत.केंद्रीय पुरातत्व विभागानं मान्यता दिल्यानं लाईट अ‍ॅन्ड साऊंड शो गडावरच केला जाणार आहे.त्यासाठीचा सुधारित 34 कोटींचा आराखडा मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडं पाठविला गेला आहे.मार्च 2018 पर्यंत ही कामे पूर्ण करून लगेच दुसर्‍या टप्प्यातील कामं सुरू केली जातील अशी माहिती जगदीश पाटील यांनी दिली.

रायगडातील पत्रकार रस्त्यावर

पत्रकार संरक्षण कायद्याची त्वरित अंमलबजावणी करावी,वयोवृध्द पत्रकारांना पेन्शन योजना सुरू करावी,छोटया वृत्तपत्रांना दिल्या जाणार्‍या जाहिरात दरात वाढ करावी,श्रमिक पत्रकारांसाठी नेमलेल्या मजिठिया आयोगाच्या शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करावी या मागण्यांसाठी 16 नोव्हेंबर रोजी मराठी पत्रकार परिषदेच्या सूचनेनुसार पत्रकारांनी राज्यभर आंदोलन केलं.रायगड जिल्हयातील पत्रकारांनीही  रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि रायगड प्रेस क्लबच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला. .उपजिल्ङाधिकारी श्रोधर बोधे यांना पत्रकारांनी मागण्यांचे निवेदन दिले.राम नारायण पत्रकार भवनापासून मोर्चाला सुरूवात झाली.मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ गेल्यानंतर तेथे जोरदार निदर्शने कऱण्यात आली.यावेळी पत्रकारांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.मोर्चाचे नेतृत्व रायगड जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी,रायगड प्रेस क्लबचे विजय मोकल यांनी केले.जिल्हयातील पत्रकार या मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

250 अंगणवाडया स्वतःच्या घरात जाणार

शिक्षणाचा पाया मजबूत करण्याच्या प्रक्रियेतील महत्वाचा घटक म्हणून अंगणवाडयांक़डं पाहिलं जातं.रायगड जिल्हयात 2 हजार 679 अंगणवाडया असल्या तरी त्यातील 420 अंगणवाडया भाडयाच्या घरातच भरत आहेत.ही अडचण लक्षात घेऊन आता सरकारनं 250 अंगणवाडयांसाठी स्वतःच्या खोल्या बांधण्याचा निर्णय घेतला असल्यानं या अंगणवाडया देखील लवकरच स्वतःच्या मालकीच्या घरात जातील अशी शक्यता आहे.मनरेगा योजनेंतर्गत हे काम होणार असल्याचं सांगण्यात आलं.सरकारच्या या निर्णयाचं स्वागत होत आहे.सहा वर्षांपर्यंतच्या बालकांच्या आरोग्य तपासणीबरोबरच रोगप्रतिबंधक लसीकरण,संदर्भसेवा,पूरक आहार,पूर्व शालेय शाळाबाहय शिक्षण,आणि आहार,आरोग्य,शिक्षण देण्यासाठी अंगणवाड्या महत्वाची भूमिका पार पाडत असतात.

ग्रंथोत्सवाला अलिबागकरांचा जोरदार प्रतिसाद 

रायगड जिल्हयात अवघे 75 सार्वजनिक वाचनालय आहेत.जिल्हयातील गावांच्या संख्येच्या तुलनेत ही संख्या फारच नगण्य आहे.ग्रंथोत्सवाच्या निमित्तानं जिल्हयातील प्रत्येक गावात ग्रंथालय उभारण्याचा संकल्प आपण करू यात असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.अलिबाग येथे 22 आणि 23 असे दोन दिवस आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथोत्सवाच्या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलताना त्यांनी हे आवाहन केले.ग्रंथोत्सवाचं उद्घघाटन कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते करण्यात आलं.अशोक नायगावकर यांनी आपल्या भाषणात जगण्यासाठी जे जे महत्वाचे असते ते ते युवकांनी वाचावे असे आवाहन केले.सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या समाधीस्थळापासून ग्रंथ दिंडीला सुरूवात झाली.अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते ग्रंथ पूजन करून ग्रंथ दिंडीचा शुभारंभ करण्यात आला.शहरातील प्रमुख मार्गावरून ही ग्रंथ दिंडी जेएसएम कॉलेजमध्ये गेली.तेथे ग्रंथोत्सव 2017 या महोत्सवाचे उद्घघाटन कऱण्यात आले.ग्रंथोत्सवाच्या निमित्तानं ‘ग्रंथांनी आम्हाला काय दिले’? या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये जिल्हयातील सर्व वरिष्ठ प्रसासकीय अधिकार्‍यांनी आपले अनुभव कथन केले.दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात जिल्हयातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला.मात्र राज्य सरकारच्यावतीनं आयोजित या कार्यक्रमात स्थानिक साहित्यिकांना डावलले गेल्याबद्दल जिल्हयातील साहित्यिकांनी खंत व्यक्त केली.

शोभना देशमुख 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here