शेकाप-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता येणार ?

0
845

रायगड जिल्हा परिषदेत शेकाप-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता येणार 

रायगड जिल्हयातील निवडणूक निकालांचे एका वाक्यात विश्‍लेषण करायचं म्हटलं तर ‘कही खुषी कही गम’ अशा शब्दात  करता येईल.रायगड जिल्हा परिषदेसाठी शेकाप,शिवसेना,कॉग्रेस,राष्ट्रवादी आणि भाजप हे पक्ष निवडणुकीच्या रिंगणात होते.या पक्षांनी गरज आणि सोयीनुसार युत्या आणि आघाडया केलेल्या होत्या.परंतू या तत्वशून्य युत्या आणि आघाडया मतदारांना मान्य नव्हत्या असं निवडणूक निकालावरून दिसेल.अलिबाग,पेण आणि कर्जतमध्ये शिवसेना आणि कॉग्रेस यांची आघाडी होती.मात्र ती मतदारांनी नाकारत या तीनही तालुक्यात शेकापच्या पारडयात भरभरून दान टाकलं.अलिबाग तालुक्यातील सात पैकी सहा जागा शेकापनं जिंकून शिवसेना-कॉग्रेस युतीला सणसणीत चपराक लगावली आहे. जिल्ह्यात शेकापनं 20 जागा जिंकल्या आहेत.मागच्या् वेळेस शेकापनं 19 जागा जिंकल्या होत्या म्हणजे शेकाप यावेळेस नक्कीच फायद्यात राहिला आहे.राष्ट्रवादीबरोबर युती केल्यानं हे यश मिळालं असं म्हणावं तर मग या आघाडीचा लाभ राष्ट्रवादीला मात्र झालेला दिसत नाही.नगरपालिका निवडणुकीत जसा राष्ट्रवादीला मोठा फटका बसला तसात फटका जिल्हा परिषदेतही बसलेला आहे.मागच्या वेळेस राष्ट्रवादीकडं 21 जागा होत्या मात्र यावेळेस हा पक्ष तेवढया जागा मिळवू शकला नसल्यानं पक्षाला मोठा तोटा झाल्याचं दिसेल.म्हणजे शेकापबरोबर आघाडी करण्याचा अपेक्षित लाभ राष्ट्रवादीला काही झालेला नाही.निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीमधून अनेक नेते बाहेर पडल्यानं त्याचा फटका या पक्षाला बसला असावा.राष्ट्रवादीतले नेते शिवसेनेत गेले असले तरी सेनाही फार फायद्यात असल्याचं दिसत नाही.मागच्या जिल्हा परिषदेत सेनेकडं 14 जागा होत्या यावेळस त्यामध्ये काही जागांची वाढ झाली असली तरी शिवसेनेला 24-25 जागा मिळण्याची जी अपेक्षा या पक्षाचे नेते करीत होते ती फोल ठरली आणि त्यामुळं शिवतीर्थ काबिज कऱण्याचे शिवसेनेचे स्वप्नही भंगले असं म्हणावं लागेल.जिल्हयात कधी काळी नंबर एकवर असलेल्या कॉगे्रसची मात्र मोठी हानी झाली आहे.गेल्या वेळेस या पक्षाकडं सहा जागा होत्या यावेळेस तेवढया जागाही या पक्षाला मिळाल्या नाहीत.पक्षाची धरसोडवृत्ती,काही ठिकाणी शेकापबरोबर तर काही ठिकाणी शिवसेनेबरोबरची युती मतदारांनी अमान्य केल्याचे निकालावरून दिसते. पक्षाचे नेते माजी मंत्री रवींद्र पाटील यांचे चिरंजीव वैकुंठ पाटील हे पेण-दादरमधून पराभूत झाले आहेत यावरून या पक्षाची अवस्था किती वाईट झाली आहे याचा अंदाज येऊ शकतो.भाजपनं तीन जागांवर विजय संपादन केला भाजपचा जिल्हा परिषदेतील हा चंचूप्रवेश त्या पक्षाचा आत्मविश्‍वास वाढविण्यास पुरक ठरणार आहे.रायगडमध्ये शेकाप आणि राष्ट्रवादीने एकत्र निवडणूक लढविल्याने ही आघाडी यापुढेही कायम राहिल आणि जिल्हा परिषदेत शेकाप-राष्ट्रवादीची आघाडी सत्तेवर येईल हे आता स्पष्ट झालेलं आहे.मात्र मावळत्या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा अध्यक्ष होता आणि उपाध्यक्षपद शेकापकडंं होतं.यावेळेस शेकापला जास्त जागा मिळाल्यानं अध्यक्षपद शेकापकडं जाईल असं दिसतंय..जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राख़ीव असल्यानं शेकापच्या शहापूर मतदार संघातून विजयी झालेल्या भावना पंडित पाटील या जिल्हा परिषद अध्यक्ष होतील असा अंदाज आहे.उपाध्यक्षपद राष्ट्रवादीला दिले जाण्याची शक्यता आहे–

घराणेशाहीवर पुन्हा मोहर उमटली

रायगड जिल्हा परिषद निकालाचं आणखी एक वैशिष्टय म्हणजे राजकीय पक्षांचे नातेवाईक या निवडणुकीत पुन्हा एकदा विजयी झाले आहेत.माजी मंत्री मीनाक्षी पाटील यानी आमदार जयंत पाटील यांच्या घरातील तीन उमेदवार निवडणूक रिंगणात होते.मीनाक्षी पाटील यांचे चिरंजीव आस्वाद पाटील आणि सुनबाई चित्रा पाटील हे दोघेही विजयी झाले आहेत तर भावजई भावना पाटील या देखील विजयी झाल्या आहेत.सुनील तटकरे यांच्या कन्या अदिती तटकरे रोहयातील वरसे मतदार संघातून विजयी झाल्या आहेत.तेथे त्यांना स्पर्धकच नव्हता.शेकाप आणि शिवसेनेच्या उमेदवारानं माघार घेतल्यानं त्यांचा मार्ग सोपा झाला होता.पण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होण्याचे त्यांचे स्वप्न मात्र पूर्ण होताना दिसत नाही.शिवसेनेचे नेते महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी तसेच शेकापचे आमदार धैर्यशील पाटील यांच्या पत्नी निलिमा पाटील देखील विजयी झाले असले तरी माजी मंत्री रवींद्र पाटील यांचे चिरंजीव वैकुंठ पाटील यांचा मात्र पराभव झाला आहे.

मतदानातही महिला आघाडीवर 

रायगड जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या 59 जागा आणि 15 पंचायत समितीच्या 118 जागांसाठी मंगळवारी झालेल्या मतदानाच्या वेळेस किमान सात तालुक्यात महिलांनी अधिक मतदान केल्याचं उपलब्ध आकडेवारीवरून समोर आलं आहे.रायगड जिल्हयातील महिला राजकीयदृष्टया अधिक सजग आणि आपल्या कर्तव्याबद्दल अधिक जागरूक असल्याचं यातून सिध्द झाल्याची चर्चा आहे.अनेक मतदान केंद्रांसमोर पुरूषांच्या तुलनेत महिलांचीच संख्या जास्त होती.मतदानासाठी आलेल्या महिलांमध्ये सर्व वयोगटातील महिलांचा समावेश होता. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी जिल्हयात 14 लाख 62 हजार 895 मतदार होते.त्यातील 7 लाख 25 हजार 790 पुरूष आणि 7 लाख 37हजार 104 महिला आहेत.जिल्हयात पुरूषांच्या तुलनेत महिलांची संख्या अधिक असली तरी या महिला मतदानासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्या हा कौतुकाचा विषय बनला आहे.रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव आहे तर आठ पंचायत समित्यांवर महिला सभापती विराजमान होणार आहे.नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीतही महिलानी बाजी मारलेली आहे.त्यामुळं जिल्हयातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तरी खर्‍या अर्थानं महिला राज निर्माण झालंय असं म्हणता येईल.महिलांच्या हातीच ग्रामीण रायगडच्या नाडया केंद्रीत होत असल्यानं महिलांमध्ये मोठा उत्साह होता असं म्हणता येईल.

 मतदार गरीब,उमेदवार कोटयधीश 

राजकारण हे गरिबांसाठी नाही असं नेहमी म्हटलं जातं.नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं हे पुन्हा सिध्द झालं आहे.जिल्हा परिषदेच्या 59 आणि पंचायत समितीच्या 188 जागांसाठी उभ्या असलेल्या 557 उमेदवारांमध्ये तब्बल 74 उमेदवार कोटयधीश होते.यामध्ये सर्वाधिक 30 करोडपती उमेदवार पनवेलमधील होते.ज्यांची संपत्ती काही लाखांमध्ये आहे अशा उमेदवारांची संख्या 99 एवढी प्रचंड होती.जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सर्व सामांन्य वर्गातील उमेदवारच असतात हा समजही या आकडेवारीने खोटा ठरविला आहे.गंमत म्हमजे या कोटयधीश उमेदवारांमध्ये केवळ 13 उमेदवार उच्चशिक्षित होते.उर्वरित जेमतेम शिकलेले.निवडणुकीच्या मैदानात सहा उमेदवार असेही होती की,जे अशिक्षित होते.म्हणजे त्यांनी शाळेचंच दर्शन घेतलेलं नव्हत.एक उमेदवार मात्र थेट पीएचडी झालेला होता.कोटयधीश उमेदवारांमध्ये महिलांची संख्याही मोठी होती.रायगड जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प शंभर कोटीचा आहे.अशा स्थितीत आता जिल्हा परिषदेत कुबेरांचंच राज्य येणार अशी चिन्हे आहेत.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here