रायगडात उड्या मारणारे  मासे 

उरण,अलिबाग,मुरूडसह रायगडातील अनेक समुद्र किनार्‍यांवर पडलेला माशांचा खच आणि दिघी बंदरात उडया मारणार्‍या माशांचं झालेलं दर्शन या दोन घटना गेल्या आठवडयात रायगडात कुतूहलाचा विषय ठरल्या.ऐन दिवाळीत अलिबाग,मांडवा,नवगाव,सासवणे,आवास आदि किनार्‍यांवर लाखो मासे अर्धमेल्या अवस्थेत सापडले.यामध्ये कोलंबी,वाकटी,चिवणी,जवळा आदि जातीच्या माशांचा समावेश होता.मुरूडला कोळंबीचा तर पूर आला होता तर उरणला सहजा सहजी ना सापडणारा पाकट जातीच्या माशांचे थवे मच्छिमारांना किनार्‍यांवर भेटल्याने त्यांची दिवाळी झाली.अचानक असं काय घडलं की,एवढे प्रचंड मासे रायगडच्या किनार्‍यांवर आले ? हा प्रश्‍न मत्स अधिकार्‍यांना विचारला तर त्यांनी सांगितलं की,’हवामानातील बदलांमुळं हे घडलं’.मच्छिमारांना मात्र हे मान्य नाही.’हवामानात बदल तर नेहमीच होत असतात पण असं पूर्वी घडलंं नव्हतं’ असं त्यांचं म्हणणं आहे.

या माशाचं कोडं उलगडलेलं नसतानाच दिघी बंदरात ‘उडया मारणार्‍या माशांच  स्थानिकांना दर्शन झालं.स्थानिकांनी ‘फीश फीश’चा गलका करीत हे मासे अक्षरशः हाताने ‘वेचले’.उंच उडी घेऊन खोल  समुद्रात डुबकी लगावणारे डॉल्फीन अधुनमधुन रायगडच्या समुद्रात दिसतात.मात्र उडया मारणारे मासे आणि किनार्‍यावर मोठ्या संख्येनं दिसल्यानं उडया मारणारे मासे हा जिल्ह्यात  चर्चेचा विषय झाला होता.जिल्ह्यात प्रथमच  उडया मारणारे मासे दिसल्याचं स्थानिक मच्छिमार सांगतात.गेल्या वर्षी गुहागरमध्ये असे मासे दिसले होते.दिघी बंदरातच  हे मासे का ?आणि कसे आले ? याचं कुतूहल मात्र अजूनही कायम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here