26 जानेवारी 1998 रोजी कोकण रेल्वे सुरू झाली . ” या कोकणात माझ्या आली आगीनगाडी”  म्हणत रायगडनं मोठ्या उत्साहानं कोकण रेल्वेचं स्वागत केलं.कालांतरानं रायगडकरांच्या ही गोष्ट लक्षात आली की,मोठा गाजावाजा करून सुरू झालेल्या कोकण रेल्वेचा रायगडला फारसा फायदाच नाही.या मार्गावरून दररोज 30-35 गाडया धावतात.तथापि धावत जाणार्‍या गाडया दुरून पहात बसणं हे रायगडकराचं प्राक्तन झालं .बहुतेक गाड्यांना रायगडमध्ये थांबाच नाही.अनेक गाडया पनवेलनंतर थेट रत्नागिरीलाच थांबतात.पनवेल ते पोलादपूर हे अंतर जवळपास दीडशे किलो मिटर आहे.दीडशे किलो मिटर अंतरात महत्वाची एकही गाडी थांबत नसेल तर या गाडया रायगडसाठी असून नसल्यासाऱख्याच आहेत ..पेण,माणगावमध्ये गाडयांना थांबा मिळावा अशी मागणी सातत्यानं केली जात होती.प्रसंगी त्यासाठी आंदोलनं देखील झाली.रेल्वेनं त्याची दखलही घेतली नाही.गाड्यांना थांबा मिळावा या मागणीसोबत आणखी दोन मागण्या होत्या.पेण-थळ या आरसीएफच्या रेल्वे मार्गावर थेट मुंबईला जोडणारी लोकल सुरू करावी आणि उरणला रेल्वे मार्गानं मुंबईला जोडलं जावं.आज या दोन्ही मागण्या अंशतः का होईना पूर्ण होत आहेत याचं रायगडवासियांना नक्कीच समाधान आहे.अलिबाग – मुंबई नसली तरी पेण-पनवेल दिवा मार्गावर मेमो रेल्वे उद्या रविवारपासून सुरू होतेय.नेरूळ -उरण रेल्वेचाही खोरकोपरपर्यंतचा पहिला टप्पा सुरू होतोय.रायगडकरांच्या या दृष्टीनं या दोन्ही मार्गाचं महत्व वेगळं सांगण्याची गरज नाही.

अलिबाग ते मुंबई हे अंतर जेमतेम शंभर किलो मिटर.हे अंतर कापण्यासाठी लागतात चार तास.यावरून आपण अंदाज करू शकतो की,रस्त्यांची अवस्था काय असेल ते..वडखळ ते अलिबाग फोरलाईनला मंजुरी मिळाली आहे.पनवेल ते पेण हा रस्ता देखील चौपदरी होत आहे.पण हे काम 2012 पासून सुरूय .ते कधी संपेल हे सांगता येत नाही.रस्ते चौपदरी झाले तरी वाहतूक आणि टॅफिक जॅमची समस्या कमी होईल हे संभवत नाही.याला पर्याय हा रेल्वे मार्गाचा होता.रायगडची जनता म्हणूनच गेली अनेक वर्षे दिवा-पनवेल-पेण या कोकण रेल्वेच्या मार्गावर लोकल सेवा सुरू करावी अशी मागणी करीत होती.ते होत नव्हतं.त्यासाठी आंदोलनं झाली,रेल्वे रोको झालं,अर्ज,निवेदनं झाली..सारं झालं. रेल्वे दाद देत नव्हती.अखेर कोकण रेल्वे मार्गाचं दुपदरीकरण आणि विद्युतीकरण करण्याचा निर्णय झाला अन पेण-लोकलची मागणी पूर्ण व्हायच्यादृष्टीपथात येऊ लागली.पेणपर्यंतचं विद्युतीकरण आता झालंय.त्यामुळं दिवा-पेण या मार्गावर उद्यापासून मेमो ट्रेन सुरू होत आहे.आता पेण आणि अलिबाग आणि परिसरातील जनतेचा मुंबई प्रवास कमी खर्चात,कमी वेळात आणि सुसहय होणार आहे..सध्या ही गाडी दिवसातून आठ फेर्‍या करेल..आठवडयातून पाच दिवस धावेल.कालांतरानं गाडी आठही दिवस धावायला लागेल हे नक्की.शिवाय पाठपुरावा केला तर थळ-पेण हा मार्गही सुरू होऊ शकतो.लोकप्रतिनिधी यासाठी काही करतील अशी अपेक्षा नाही.कारण रायगड जिल्हयात दळणवळणाची साधनं उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत ते कमालीचे उदासिन आहेत..दत्ताजी खानविलकर असताना त्यांनी पेण-थळची मागणी लावून धरली होती.पण नंतर हा विषय सारेच विसरले.दिवा-पेणसाठी एखादया राजकीय पक्षानं आग्रह धरलाय,ते रस्त्यावर उतरलेत असं झालेलं नाही.अगदी तीच स्थिती मुंबई-गोवा महामार्गाबाबतची.सतत सात वर्षे पत्रकारांनी पाठपुरावा केल्यानंतर मुंबई-गोवा महामार्गाचं काम सुरू झालं.आता श्रेय सारेच घेत असले तरी एकदाही राजकीय मंडळींनी पत्रकारांच्या समर्थनार्थ साधं पत्रकही काढलं नव्हतं हे वास्तव आहे. पेणला सुरु होत असलेल्या मेमोचं श्रेय हे द्यायचेच असेल तर ते सामांन्य पेणकरांच्या जिद्दीला,चिकाटीला द्यावं लागेल.त्यांनी हा विषय सतत लावून धरला.

उरणकरांची वीस वर्षांची प्रतिक्षा संपली

उरणला रेल्वे मार्गानं मुंबईशी जोडण्याची जुनी मागणी.उरणला रेल्वे आली तर या भागाचा झपाट्यानं विकास होईल हे या मागणीमागचं सूत्र.त्यादृष्टीन 1997 पासून चाचपणी देखील सुरू झाली.खाडी,पर्यावऱणाचे प्रश्‍न,खासगी जमिन संपादनाचा विषय यामुळं गाडी रूळावर येत नव्हती.अडथळेच अडथळे होते.निर्धारित वेळेत हा प्रकल्प मार्गी लागला असता तर तो जेमतेम साडेचारशे कोटीत पूर्ण होणार होता.वेळेत काम न झाल्यानं या प्रकल्पाची किंमत आता 1,782 कोटी झालीय.तब्बल वीस वर्षे लागली ही मागणी पूर्ण व्हायला.आता सिडको आणि मध्य रेल्वेच्या भागिदारीतून हा प्रकल्प मार्गी लागतोय.यामध्ये सिडकोचा हिस्सा 67 टक्के आहे तर रेल्वेचा 33 टक्के.नेरूळ उरण हे अंतर 27 किलो मिटरचं आहे.मात्र उद्यापासून केवळ 12 किलो मिटरचा पहिलाच टप्पा सुरू होत आहे.नेरूळ ते खारकोपर या मार्गावर ही रेल्वे धावेल.नेरूळ येथून रेल्वे हर्बल मार्गाला जोडली जाणार आहे.खारकोपर  ते बेलापूर अशीही एक लाईन असल्यानं उरणहून पनवेल आणि सीएसएमटी ला सहज जाता-येता येणार आहे.नेरूळ ते उरण मार्गाावर सीवूड,बेलापूर,तरघर,बामणडोंगरी,खारकोपर,गव्हाण,रांजनपाडा,न्हावाशेवा,द्रोणागिरी,आणि उरण अशी अकरा स्थानकं आहेत.यातील खारकोपरपर्यंतचा पहिला टप्पा रविवारपासून सुरू होत आहे.खारकोपर नेरूळ आणि खारकोपर -बेलापूर या मार्गावरून लोकल दहा फेर्‍या करणार आहेत.उद्या रेल्वे मंत्री पियूष गोयल हिरवा झेंडा दाखवून रेल्वे मार्गाचं उद्दघाटन करतील तेव्हा या परिसरातील जनतेला होणार आनंद अवर्णनीय असाच असणार आहे.उरणच्या वैभवात भर घालणारा हा प्रकल्प आहे हे नक्की.उरणमध्ये अगोदर जेएनपीटी,ओनएनजीसी,सारखे मोठे प्रकल्प आहेत.आता दुसर्‍या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम सुरू झालेलं आहे.विरार ते अलिबाग हा मल्टीमोडेल कॉरिडोर मंजूर झाला आहे.दोन्ही बाजुंनी प्रत्येकी आठ मार्गिका असणारा हा मार्ग या परिसराचा चेहरा-मोहराच बदलून टाकणारा आहे.या सार्‍या बदलाच्या पार्श्‍वभूमीवर नेरूळ – उरणचं महत्व भविष्यात काय असणार आहे याचा आपण अंदाज करू शकतो.उरण परिसरात तिसरी मुंबई विकसित होत आहे.उलवा परिसर  एवढ्या प्रचंड वेगानं विकसित होतोय की,आणखी दोन वर्षांनी सारं चित्र बदललेलं असेल.अशा स्थितीत रेल्वेची गरज होती ती पूर्ण होतेय.उर्वरित उरणपर्यंतचा टप्पा लवकर पूर्ण व्हावा अशी अपेक्षा आहे.नेरूळ-खारकोपर हा मार्ग आणि पेणला सुरू असलेली मेमो रेल्वे या दोन्ही गोष्टी म्हणजे रेल्वेनं रायगडकरांना दिलेली अनोखी अशी दिवाळी भेट आहे असंच मला वाटतं.

एस एम देशमुख 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here