हैदराबादः महाराष्ट्रात लागू करण्यात आलेला पत्रकार संरक्षण कायदा देशभर लागू करावा या एस.एम.देशमुख यांच्या मागणीस हळूहळू समर्थन मिळू लागले असून गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही एस.एम.देशमुख यांच्या भूमिकेचा पुरस्कार करीत ‘पत्रकार संरक्षण कायदा देशभर लागू करावा’ अशी सूचना केली आहे.

ऑल इंडिया वर्किंग जर्नालिस्ट असोशिएशनच्यावतीने हैदराबाद येथील इंदिरा प्रियदर्शिनी ऑडोटेरियममध्ये पत्रकार दिनाच्या निमित्तानं आयोजित पत्रकार संमेलनाचे आज रामदास आठवले यांच्या हस्ते उद्दघाटन झाले त्याप्रसंगी आठवले बोलत होते.ते म्हणाले पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकारांना विचार स्वातंत्र्य ; लेखन स्वातंत्र्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. समृद्ध लोकशाहीसाठी सरकारच्या कामाची, राजकीय सामाजिक नेत्यांच्या भूमिकांची समिक्षा करणार्‍या पत्रकारांची देशाला गरज आहे.  त्यामुळे पत्रकारांवर होणारे हल्ले हे लोकशाहीवरील हल्ले ठरतात. पत्रकारांवरील हल्ले रोखले पाहिजेत. त्यासाठी काही राज्यांनी पुढाकार घेवून पत्रकार संरक्षण कायदा केला आहे; त्याप्रमाणे देशभरातील सर्व राज्यांनी पत्रकारांवरील हल्ला रोखण्यासाठी पत्रकार संरक्षण कायदा केला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले .. 

संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या चार स्तंभापैकी  एक स्तंभ म्हणून पत्रकारितेला महत्वाचे स्थान दिले आहे. त्यामुळे लोकशाहीत पत्रकारांचे योगदान महत्त्वाचे आहे. पत्रकारांनी केलेल्या टीकेला; लिखाणाला हिंसक कारवाया करुन कोणी उत्तर देवू नये तर पत्रकारांनी केलेल्या लिखाणाला ते लिखाण न पटल्यास आपली बाजू लिखाणाद्वारेच मांडली पाहिजे. पत्रकारांच्या लिखाणामुळे दुखावणार्‍या व्यक्तीने कायदा हातात घेवून पत्रकारांवरील हल्ला करणे हे लोकशाहीवर हल्ला करण्यासारखे आहे. असे स्पष्ट मत देखील त्यांनी मांडले 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here