संरक्षण कायद्याची अंमलबजावणी होत नसल्यानं राज्यात पत्रकारांवरचे हल्ले वाढले

राज्यात सहा वर्षात 420 पत्रकारांवर हल्ले,ग्रामीण भागातील पत्रकार टार्गेट

2017 च्या तुलनेत 2018 मध्ये पत्रकारांवरील हल्ल्यांच्या संख्येत मोठी वाढ 

पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मार्चमध्ये पत्रकारांचे चलो वर्षा 

मुंबई दिनांक 14 ( प्रतिनिधी ) पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यास  सरकार टाळाटाळ करीत असल्यानं गतवर्षीच्या तुलनेत यंदा पत्रकारांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं चित्र उपलब्ध आकडेवारीवरून समोर आलं आहे.2017 मध्ये 39 पत्रकारांवर हल्ले झाले होते,यंदा त्यामध्ये वाढ झाली असून 2018 च्या 12 डिसेंबरपर्यंत 48 पत्रकारांवर हल्ले झाल्याचं पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीकडील आकडेवारीवरून दिसून येत आहे.2012 ते 2018 या सहा वर्षात राज्यात तब्बल 420 पत्रकारांवर राज्यात हल्ले झाले असून त्याची नावं आणि घटनांसह माहिती पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीकडं उपलब्ध आहे.पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करणे,पत्रकारांना धमक्या देणे या घटना देखील वाढल्या आहेत.त्यामुळं राज्यातील पत्रकारांमध्ये चिंतेची आणि भितीचं वातावरण आहे.हल्ल्यांना प्रतिबंध घालायचा असेल तर मंजूर झालेल्या पत्रकार संरक्षण कायद्याची तातडीने अंमलबजावणी झाली पाहिजे अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी केली आहे.

पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली मराठी पत्रकार परिषद आणि राज्यातील अन्य संघटनांनी सतत 12 वर्षे पाठपुरावा केल्यानंतर 7 एप्रिल 2017 रोजी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात पत्रकार संरक्षण कायदा एकमताने संमत झाला.पत्रकारांवरील हल्ला हा अजामिनपात्र गुन्हा ठरविला गेला आणि हा गुन्हा सिध्द झाल्यास तीन वर्षाच्या सश्रम कारावासाच्या शिक्षेची तरतूद आणि मोठ्या रक्कमेच्या दंडाची तरतूद केली गेल्यानं हितसंबंधियांमध्ये भिती निर्माण झाली.परिणामतः एप्रिल 2017 नंतर पत्रकारांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये घट झाली.2013 मध्ये 65 पत्रकारांवर हल्ले झाले होते,2014 मध्ये हा आकडा 66 एवढा होता,2015 मध्ये 80 पत्रकारांवर राज्यात हल्ले झाले होते.मात्र 2017 मध्ये पत्रकारांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आणि ही संख्या 39 पर्यंत खाली आली. कायदा मंजूर झाला मात्र त्याची अंमलबजावणी करण्याची सरकारची मानसिकता नाही हे वास्तव समोर आल्यानंतर पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ झाली असून 2018 मध्ये तब्बल 48 पत्रकारांवर हल्ले झाले आहेत.यामध्ये स्थानिक माफिया,गावगुंड,स्थानिक राजकारणी आणि पोलिसांकडून होणार्‍या हल्ल्यांची संख्या सर्वाधिक असल्याचं चित्र आहे.शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील पत्रकारांवर जास्त हल्ले झाले आहेत हे दिसून आलं आहे.ग्रामीण भागातील पत्रकारांवर हल्ले झाल्यानंतर मुंबईस्थित पत्रकार संघटनांनी त्याची फारशी दखल घेतली नसल्याचं वास्तव देखील समोर आलं आहे.

पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार आणखी एक वास्तव समोर आलंय. पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल कऱण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.यावर्षी 21 पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल झाल्याची माहिती समितीला मिळालेली आहे.प्रत्यक्षात हा आकडा अधिक असण्याची शक्यता आहे.पत्रकारांना धमक्या मिळणे आता ही नित्याची बाब झाली आहे.पत्रकारांवरील हल्ले किंवा धमक्या हे गुन्हे जामीनपात्र असल्यानं पत्रकारांवर हल्ले केल्यानंतरही एकाही आरोपीला 2018 मध्येही शिक्षा झालेली नाही किंवा त्याला कोठडीत काही रात्री काढाव्या लागल्यात असं झालेलं नाही.त्यामुळं पत्रकारांमध्ये भितीबरोबरच तीव्र संतापाची भावना आहे.

2012 ते 2018 या काळात पत्रकारांवर  झालेले हल्ले

2012 ः 45

2013 ः 65

2014 ः 66

2015 ः 77

2016 ः 80

2017 ः 39

2018 ः 48

पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावी करावी यामागणीसाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तसेच मराठी पत्रकार परिषदेने वर्षभरात विविध आंदोलनं केली,मेळावे घेतले,नेत्यांच्या भेटी घेतल्या पण सरकारला घाम फुटला नाही.19 जून रोजी पाटण येथे राज्यातील तालुका अध्यक्षांचा मेळावा घेऊन त्यात कायदा करावा हा ठराव संमत केला गेला,औढा नागनाथ येथे 1 सप्टेंबर रोजी छोटया वृत्तपत्रांच्या संपादकांचा मेळावा घेऊन छोटया पत्रांचे प्रश्‍न तसेच कायदा,पेन्शन संबंधी सरकारला जागं कऱण्याचा प्रयत्न केला गेला,20 सप्टेंबर रोजी अंबाजोगाईतही जिल्हास्तरीय अधिवेशनात कायद्याच्या मागणीचा जोरदार आग्रह धरला गेला,17 नोव्हेंबरच्या राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या सरकारी कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचं आंदोलन केलं गेल्यानं राज्यभर सरकारी कार्यक्रमाचा फज्जा उडाला,26 नोव्हेंबर रोजी राज्यभर धऱणे आंदोलन केलं गेलं.राज्यातील 34 जिल्हयांमध्ये हे आंदोलन यशस्वी झालं.त्यानंतरही सरकारी पातळीवर कायद्याच्या अंमलबजावणीबाबत सरकार ढिम्म आहे.

मार्चमध्ये ‘चलो वर्षा ‘

पत्रकारांच्या बुनियादी प्रश्‍नांकडं सरकार सातत्यानं दुर्लक्ष करीत आहे याचा निषेध करण्यासाठी मार्चमध्ये चलो वर्षा चा नारा देत राज्यातील पाच हजार पत्रकार मुंबईत दाखल होणार आहेत..हे आंदोलन निर्णायक असणार असेल राज्यातील बहुतेक पत्रकार संघटना या आंदोलनात सहभागी होतील असा विश्‍वास एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केला आहे.माध्यमांचं स्वतंत्र अस्तित्व कायम राहिलं पाहिजे आणि चौथ्या स्तंभानं निर्भयपणे आपली भूमिका बजावली पाहिजे अशी भूमिका मांडणार्‍या राज्यातील सामाजिक संघटनांचा देखील आंदोलनास पाठिंबा घेतला जाणार आहे.देशभरात असंख्य पत्रकारांवर हल्ले झाले,खोटे गुन्हे दाखल झाले त्याची आकडेवारी मात्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीकडे उपलब्ध नाही.

देशभरात 7 पत्रकारांच्या हत्त्या

पत्रकारांवरील हल्ले आणि हत्त्यांच्या बाबतीत महाराष्ट्रातच चिंताजनक परिस्थिती आहे असं नाही तर संपूर्ण देशातही पत्रकारांवरील हल्ले आणि हत्याच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसते आहे.गेल्या वर्षी देशात सहा पत्रकारांच्या हत्त्या झाल्या होत्या.2018 मध्ये 7 पत्रकारांच्या हत्त्या झालेल्या आहेत.त्यांची नावे अशी

नवीन निश्‍चल भोजपूर बिहार ( 25 मार्च)

विजय सिंह भोजपूर बिहार    ( 25 मार्च )

संदीप शर्मा,भिंड ,मध्यप्रदेश ( 26 माच4)

रसिकन राजेश ( तिरूअनंतपूरम केरळ 27 मार्च )

शुजात बुखारी 14 जून संपादक रायझिंग कश्मीर श्रीनगर)

अच्यूतानंद दास साहू ( दूरदर्शन 30 ऑक्टोबर छत्तीसगढ )

चंदन तिवारी ( 30 ऑक्टोबर झारखंड ) 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here