मुंबई – गोवा महामार्गाला बाळशास्त्री जांभेकर याचंच दिलं जावं
पत्रकार, साहित्यिक, कलावंतांचं वावडं का?

मुंबई : राजकारण्यांना पत्रकार, साहित्यिक, कलावंतांचं का वावडं असतं माहिती नाही पण या वर्गातील कोणाचं एखाद्या महामार्गाला नाव देण्याची मागणी झाली की, अन्य एखादे नाव पुढे करून मूळ मागणीला मोडता घालण्याचा प्रयत्न होताना दिसतो.. मुंबई – पुणे महामार्गाच्या वेळेस एका महान साहित्यिकाला डावलले गेले आता मुंबई – गोवा महामार्गाच्या नावावरून असेच डावपेच सुरू आहेत..
सारया जगाला माहिती आहे की, मुंबई – गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी कोकणच्या तीनही जिल्हयातील पत्रकारांनी सतत सहा वर्षे आंदोलनं केली होती.. अटका झाल्या, दिल्ली पर्यंत पाठपुरावा केला गेला.. पत्रकार लढत होते तेव्हा एकजात सारे राजकीय पक्ष मख्खपणे बसले होते.. पत्रकार एकाकी लढले, या लढयात सातत्य ठेवले आणि यश मिळविले.. 2012 मध्ये रस्त्याचं काम सुरू झालं.. पत्रकारांचा हा मोठाच विजय होता.. काम सुरू झालं तेव्हाच मुंबई गोवा महामार्गाला आद्य मराठी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव द्यावे अशी मागणी करण्यात आली होती.. त्यानंतर २२ जानेवारी रोजी सावंतवाडीत झालेल्या राज्यातील पत्रकारांच्या मेळाव्यात ही मागणी आग्रहपूर्वक आणि एकमुखाने करण्यात आली.. त्यानंतर एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखीलील मराठी पत्रकार परिषदेच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन मुंबई गोवा महामार्गाला बाळशास्त्री जांभेकर यांचं नाव द्यावं अशी मागणी केली आहे.. बाळशास्त्रीं जांभेकर हे प्रकांड पंडित तर होतेच त्याचबरोबर ते भाषाप्रभू होते.. नऊ देशी विदेशी भाषांवर त्याचं प्रभुत्व होतं.. जीवनाच्या विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा त्यांनी उमटविला होता.. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोंभुर्ले सारख्या दुर्गम भागातून मुंबईत येऊन जांभेकरांनी 6 जानेवारी 1832 मध्ये दर्पण हे नियतकालिक सुरू केले.. मराठीतलं हे पहिलं वृत्तपत्र..या दिनाची आठवण म्हणून राज्यातील पत्रकार 6 जानेवारी हा दिवस दर्पण दिन म्हणून साजरा करतात..
कोकणातील पत्रकारांच्या लढयातून महामार्गाचं चौपदरीकरण होत असल्यानं आणि बाळशास्त्रीं हे कोकणातीलच असल्याने या महामार्गाला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव देणे उचित आणि योग्य ठरणार आहे.. अन राज्यातील पत्रकार त्यासाठी आग्रही असणार आहेत..
आद्य मराठी पत्रकारांचं नावं महामार्गाला द्यावं अशी मागणी जोर धरत असतानाच आता सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांचं नाव महामार्गाला देण्याची मागणी रेटली जात आहे.. सरखेल कान्होजी आंग्रे याचं कार्य अफाट आहे.. त्यांच्याबद्दल महाराष्ट्राला मोठाच आदर आहे.. अरबी समुद्रावर वर्चस्व गाजवून स्वराज्याच्या विरोधकांना सळो की पळो करून सोडणारया कान्होजींचं नाव पूर्ण होत आलेल्या रेवस – रेडी या सागरी महामार्गाला देण्यात यावं.. कान्होजीं राजे आंग्रे याचं ते उचित आणि भव्य स्मारक होईल..
महाराष्ट्रात रस्ते, उड्डाणपूल, इमारतींना पत्रकार, साहित्यिक, कलावंतांची नावं अभावानेच दिसतात.. समाजाच्या जडणघडणीत राजकीय मंडळी एवढंच किंबहुना जास्तच योगदान पत्रकार, साहित्यिक, कलावंतांचं असतं.. त्यांच्या कार्याची दखल समाजानं घेऊन त्यांचीही स्मारकं ऊभारली पाहिजेत, त्यांच्याही स्मृती जतन करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत अशी आग्रही मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी केली आहे..
मुंबई – गोवा महामार्गाला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचेच नाव द्यावे अशी मागणी एस.एम.देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडं आज पाठविलेल्या निवेदनात परत एकदा केली आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here