चार दिवसांपुर्वी मुंबईत पावसानं रेल्वेचा पुल कोसळता..सर्वत्र हाहाकार उडाला..माध्यमांनी या घटनेचं असं कव्हरेज केलं की,ही जशी जगातली एकमेव दुर्घटना असावी..ज्या दिवशी पूल कोसळला त्या दिवशी चॅनल्सवर दुसर्‍या बातम्याच नव्हत्या..चॅनलवाले विसरले होते की,’मुंबई बाहेरचेही आपले प्रेक्षक आहेत..त्यांच्यासाठी पूल सोडून अन्य काही दिलं पाहिजे’.पुलावरून मग राजकारण सुरू झालं.आरोप-प्रत्यारोप,जबाबदारीची टोलवा-टोलवी हे सारं झालं.हे नाटय संपतंय न संपतं तोच उपराजधानीचं ‘पाणी पर्व’ सुरू झालं.मिडियाचे कॅमेेरे तिकडं वळले.मिडिया धो–धो बरसू लागला. पावसानं नागपूरला झोडपलं.पाणीच पाणी झालं.मग मुंबईवाले नागपूरकरांना वाकुल्या दाखवू लागले.आमची मुंबई आणि तुमचं नागपूर यात काही फरक नाही असं बोललं जावू लागलं.नागपूरला आलेल्या पुरानं ‘इकडच्यांना’ गुदगुदल्या होऊ लागल्या..मग ‘तिकडचे’ एकदम मौनात गेले.नागपूर पाण्यात गेलं याचं समर्थन कसं करावं याचं ‘चिंतन’ अजून नागपुरात सुरू आहे म्हणे .. 

मुद्दा तो नाही..पूर काय मुंबईत आणि नागपुरातच येतात का.?.पूर कोठेही येऊ शकतात,’तुंबई’ कोठेही होऊ शकते..पण इतरत्र कुठं असं झालं तर त्याची चिंता मिडियाला नसते..सरकारला तर नसतेच नसते.उदाहरण म्हणून रायगड जिल्हयातल्या महाडचं देतो.दोन वर्षांपूर्वी महाडच्या सावित्रीवरील पुलाच्या दुर्घटनेनं महाड चर्चेत आलं होतं.खरं पावसाळ्यात जी नैसर्गिक संकटं कोसळतात त्यामुळं त्याची  चर्चा दरवर्षी व्हायला पाहिजे असते.पण पाच-पन्नास जीव जोपर्यंत जात नाहीत तोपर्यंत अशी चर्चा करायलाच बंदी असावी असंच सारे वागतात. महाडची भौगोलिक रचना अशी आहे की,हे शहर सावित्री,गांधारी आणि काळ नदीच्या काठावर आहे.दरवर्षी या नद्यांना पूर येतात आणि पाणी महाडमध्ये न चुकता घुसतं.हे चित्र वर्षानुवर्षे असंच आहे.अपरिमित हानी होते.महाडची आख्खी बाजारपेठ जलमय होते.नद्यांना पूर आले आणि समुद्राला भरती असेल तर होणारं नुकसान किती तरी पटीनं जास्त असतं.कारण पुराचं पाणी समुद्रात जातच नाही ..ते जिकडं रस्ता मिळेल तिकडं धावत सुटतं..1989 ला जांभुळपाडा आणि नागोठण्यात आलेले पूर याच पध्दतीचे होते.2005 मध्येही पूर आणि दरडी  कोसळून जिल्हयात 300च्या वरती लोक मृत्यूमुखी पडले होते.मात्र त्यातून शहानपण कोणी शिकले  नाही.रायगड जिल्हयातील 105 गावं आजही दरडप्रवण आहेत.म्हणजे या गावांच्या डोक्यावर कधीही दरड कोसळू शकते.नदी आणि खाडीच्या काठावर असलेल्या गावांची संख्या 300च्यावरती आहे.समुद्राच्या काठावर असलेली गावंही दहशतीखाली असतात.कारण समुद्र गावांवर आक्रमण करीत निघाला आहे.अलिबाग तालुक्यातील किमान दोन गावांचं पुनर्वसन केलं गेलंय.ही स्थिती बदलावी यासाठी कोणीच प्रयत्न करताना दिसत नाही.2005 चे दरडग्रस्त होते त्याचं अजून पुनर्वसन झालेलं नाही.किंवा पूर आणि आणि दरड कोसळण्याचे धोके कमी करण्यासाठी कोणतीही उपाययोजना झालेली नाही.महाडवर जे दरवर्षी न चुकता पूर  संकट येते ते टाळण्यासाठी देखील काहीच मार्ग शोधला जात नाही.’महाडचं पुनर्वसन करावं’ अशी एक सूचना आहे,ते काम अवघड आणि खर्चीक आहे.महाडला संरक्षक भित बांधावी अशीही सूचना आहे,,सावित्री,गांधारी,काळ नदीला पूर येऊ नयेत म्हणून या नद्यांच्या उगमस्थानी किंवा ज्या छोटया छोटया नद्या या मोठ्या नद्यांना मिळतात त्या ठिकाणी धरणं बांधून हे पाणी आहे तेथेच आडवावे असंही सांगितलं जातं.सावित्री नदीचं पात्र गाळाणं भरलं आहे.ते एवढया थरापर्यंत भरलंय की,नदीचे प्रवाह बदलू लागले आहेत.हा गाळ उपसावा आणि नदीचा श्‍वास मोकळा करावा असंही लोंकांचं सांगणं आहे.ते ही होत नाही.समुद्राची भरती असेल,पाऊस कोसळत असेल,पूर आलेला असेल तर पाणी नदीतून समुद्रकडं जातच नाही.ते महाडमध्ये घुसतं.आजच्या सारखं.या सूचना आहेत .या क्षेत्रातील तज्ज्ञांनी यावर मार्ग शोधला पाहिजे.मात्र त्यासाठी सरकारची तयारी हवी.ती नाही.पूर आला की,लोकांना सावधानतेचे इशारे दिले जातात.लोकांनी सावध व्हायचे म्हणजे काय करायचं  ? हेच समजत नाही.दरड कधी कोसळेल हे सांगता येत नाही.2005 मध्ये रात्रीच होत्याचं नव्हतं झालं होतं.पूरही सांगून येत नाहीत.सावधानतेच्या इशार्‍यामागे आपली जबाबदारी झटकण्याचा प्रशासनाचा डाव असतो.उद्या काही नुकसान झालंच तर आम्ही इशारा दिला होता असं म्हणायला यंत्रणा मोकळी होते.हे इशारे देत बसण्यापेक्षा असे इशारे -धुपारे देण्याची वेळच येणार नाही याची काळजी सरकार का घेत नाही हा प्रश्‍न आहे.

रायगडची आजची स्थिती देखील दरवर्षी असते तशीच आहे.कोणीच वाली नाही.लोकप्रतिनिधी नागपुरातील पाण्याची काळजी करीत आहेत.इकडं पाणी भरलंय त्याची चिंता कोणालाच नाही.महाड जलमय झालंय आणि सार्‍या रायगडमध्ये पाणीच पाणी झालंय.सकाळी 8 पासून दुपारी 2.30 पर्यंत 205 मिली मिटर एवढा प्रचंड पाऊस झाल्यानंच हे चित्र आहे काय ?  तर तसा दावा करता येणार नाही.निसर्गाशी चालविलेली क्रूर चेष्टा हे या महापुराचं कारण आहे.नद्या प्रदूषित केल्यात,खाडया,समुद्रात भराव घातले गेले आहेत,पाण्याचा निचरा होणारे परंपरागत मार्ग बंद केले गेले आहेत.नद्यांवर देखील अतिक्रमणं झालीत.नद्या आणि खाड्या  गाळानं भरल्यानं थोडं पाणी आलं तरी ते बाहेर फेकलं जातं आणि जिकडं रस्ता मिळेल तिकडं जातं.2005 मध्ये गोरेगावला पूर आला होता.असं कधीच झालेलं नव्हतं.कारण हे गाव उंचीवर आहे.दरडी कोसळण्यामागची कारणं देखील मानव निर्मितच आहेत.मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्यान डोंगर ठिसूळ झालेत.अनेक ठिकाणी डोंगर उपसण्याचं,फोडण्याचं त्यासाठी ब्लास्टिंगचं कामं सुरू आहेत.त्यामुळं माती धरून ठेवण्याची क्षमता आता राहिलेली नाही.त्यामुळं पटापट दरडी कोसळत आहेत.मागच्याच आठवडयात महाडजवळ दरड कोसळून मुंबई-गोवा महामार्ग पाच तास ठप्प झाला होता.पावसाळ्यात हे नित्याचं झालंय.हे सारं कश्यामुळं होतंय हे काय सरकारला माहिती नाही काय ? पण उपायाच्या नावानं सारी बोंब आहे. थोडक्यात काही तरी बिघडलंय .काय बिघडलंय याचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना झाल्या पाहिजेत.ते होत नाही.अजून पाच-पन्नासवर्षे तरी होणार नाही.हा असाच हाहाकार बघत बसावा लागणार आहे.सरकार मुर्दाड आहेच.मिडिया काय करतोय ? हा प्रश्‍नय.मुंबईत एक कोटीवर लोक राहतात म्हणून जर पडलेल्या पुलाच्या बातम्या प्रामुख्यानं दिवसभर चालविल्या जात असतील तर रायगडातही 25 लाख लोक राहतात.पूल पडला त्या दिवशीच्या कव्हरेजच्या किमान 25 टक्के कव्हरेज तरी रायगडच्या या पुराला मिळायलाच हवं की… तसं होत नाही.त्याची अऩेक कारणं असतील.टीआरपी असेल,फुटेज मिळत नसेल…कारण काहीही असो आम्ही मिडिया कव्हरेजच्या बाबातीतही उपेक्षित आहोत हे रायगडकरांचं दुःख आहे.आजही तेच दिसतंय.महाड जलमय झालंय,लाखो रूपयाचं नुकसान झालंय,रस्ते पाण्याखाली आहेत.रेल्वेही सेवाही विस्कळीत आहे.जनजीवन ठप्प झालं आहे.पुराची आणि दरड कोसळण्याची दहशत लोकांच्या मनात आहे पण राजकारणी जसे मौनात आहेत तसाच मिडियाही गप्प आहे.फारसं बोलत नाही.त्यामुळं परस्परांना मदतीचा हात देत रायगडची जनता या आव्हानाचा सामना करीत आहे.

एस.एम.देशमुख

LEAVE A REPLY