मी म्हणजेच मिडिया? हा अहंकार बरा नव्हे..

भ्रष्टाचाराची एक बातमी दिली म्हणून 2008 मध्ये माझ्यावर गुन्हा दाखल झाला.. केवळ मला त्रास देण्याच्या उद्देशानं ११ वर्षांनी 2019 मध्ये ही केस उकरून काढली गेली.. प़चंड त्रास आणि तेवढाच मन:स्ताप झाला.. तो आजही संपलेला नाही.. पण मी याचं कधी भांडवल केलं नाही किंवा मला असंही कधी वाटलं नाही की माझ्यावर दाखल झालेला गुन्हा हा मिडियावरचा हल्ला आहे म्हणून..संपादक म्हणून जबाबदारी पार पाडताना असे प्रसंग अटळ आणि अपरिहार्य असतात .. हे प़त्येक संपादकांनी गृहित धरायला हवं.. भांडवल करण्यासारखं ही यात काही नसतं.. आजही ग्रामीण भागात पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना आयुष्यातून उठविण्याचा प्रयत्न होत असतो. .. पण त्यांनाही असं वाटत नाही की हे मिडियावरचे हल्ले आहेत म्हणून.. पण जेव्हा अर्णब गोस्वामी यांच्यावर हल्ला होतो, सुधीर चौधरीवर गुन्हा दाखल होतो तेव्हा तो मिडियावरचा हल्ला आहे असे गृहित धरून ढोल वाजविले जातात.. एका पत्रकारावर झालेला हल्ला मिडियावरचा हल्ला कसा होऊ शकतो? आणि केवळ मोठं बॅनर असलेल्या संस्थेतील पत्रकारावर झालेला हल्ला म्हणजे मिडियावरचा हल्ला हे कसे? मग इतरांवर झालेले हल्ले व्यक्तीगत कसे असू शकतील?
मिडियावरचा हल्ला या संज्ञेकडं मी व्यापक अर्थानं बघतो.. आणीबाणीत मिडियाची झालेली मुस्कटदाबी हा नक्कीच मिडियावरचा हल्ला होता, बिहार सरकारने 1981 मध्ये आणलेले काळे विधेयक.. मिडियावरचा हल्ला होता, लॉकडाऊन काळात पेपर छापा पण ते वितरित करू नका असा काढलेला फतवा मिडियावरचा हल्ला होता.. .मिडियावरील हल्ल्यांची अशी उदाहरणं बरीच देता येऊ शकतील..
सुधीर चौधरींवर दाखल झालेला गुन्हा हा मला मिडियावर चा हल्ला वाटत नाही.. तसं मानायचं तर मग गेल्या दीड महिन्यात महाराष्ट्रात 20 पत्रकारांवर झालेले हल्ले हे मिडियावरचेच हल्ले म्हणावे लागतील.. बडी संपादक मंडळी हे मानायला तयार नसते.. फक्त त्यांच्यावरचे हल्ले हे मिडियावर चे हल्ले आहेत असं त्यांना वाटतं.. कारण “आपण म्हणजेच मिडिया” असा अहंकार आमच्यापैकी अनेकांना असतो.. वास्तवात माध्यम स्वातंत्र्याचा विषय येतो तेव्हा बडी संपादक मंडळी मौनात असते.. पत्रकार संरक्षण कायदा व्हावा यासाठी जेव्हा महाराष्ट्रातील पत्रकार रस्त्यावर उतरले होते तेव्हा या मंडळींना देणेघेणे नव्हते.. आंदोलनाची बातमी करण्याचं सौजन्यही ही मंडळी दाखवत नाही.. कारण ही मंडळी इतरांना मिडिया मानायलाच तयार नसतात.. स्वतःला झळ पोहचली की आकाश पाताळ एक केले जाते.. मिडियावर हल्ले झाल्याचे डांगोरा पिटले जातात आणि संघटना म्हणून आम्ही त्यांच्या हो ला हो म्हणावं अशीही अपेक्षा व्यक्त केली जाते.. संघटना अश्या कोणाच्या दावणीला बांधायला आमचा विरोध आहे.. जे चळवळीबरोबर आहेत, जे सामांन्य, तळागाळातील पत्रकारांबरोबर आहेत.. फक्त त्यांच्या सोबतच चळवळ असेल.. एवढंच..
सुधीर चौधरी यांच्याविरोधात दाखल झालेला गुन्हा हा केवळ एका संपादकाला त्रास देण्याच्या उद्देशानं झालेला असल्यानं हा प्रयत्न नक्कीच निषेधार्ह आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here