नवी दिल्लीः मिडियाच्या एकाधिकारशाहीला सरकारनं गती दिली,छोटया छोटया वृत्तपत्रांचा गळा आवळून सारा मिडिया ठराविक भांडवलदारी मिडिया घराण्याच्या ताब्यात देण्याच्या प्रक्रिया वेगाने सुरु राहिली  आणि आज त्याचे दुष्परिणाम दिसायला लागले .देशातील पाच-पंचवीस मिडिया घराण्यांच्या ताब्यात सारा मिडिया केंद्रीत झाल्यानं आणि ते पैश्यासाठी वाट्टेल तो अजिंडा वाचकांच्या माथी मारायला सिध्द झाल्यानं लोकशाही आणि समाजव्यवस्थेलाच कसा धोका निर्माण झालाय याचं प्रत्यंतर कोबरा पोस्टच्या एका स्टिंग ऑपरेशननं आलं आहे.सामान्य माणूस समोर किंवा पडद्यावर दिसणार्‍या पत्रकाराना शिव्या घालत असतो मात्र पत्रकारांच्या हाती काहीच राहिलं नाही.मोठ मोठ्या रक्कमा घेणारे मालक ठरवतात की,कोणती बातमी चालवायची किंवा नाही ते..या संबंधीचे डिल पत्रकार किंवा संपादक करीत नाहीत तर थेट मालक किंवा त्यांचे सीइओच ही चर्चा करतात हे कोबरा पोस्टच्या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलंय.कोबरा पोस्टच्या स्टिंगमुळं मोठ मोठ्या परंपरांचे दावे कऱणार्‍या बड्या घराण्याचं पितळ उघडं झालंय हे नक्की.

कोबरा पोस्ट हे न्यूज पोर्टल आहे.शोध पत्रकारितेसाठी हे न्यूज पोर्टल ओळखले जाते.विविध व्यवसायातील लब्ध प्रतिष्ठितांना नागडं करण्याचं काम कोबरा पोस्टनं केलंय.आता बारी मिडियाची आली.एका स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून कोबरा पोस्टनं मोठमोठया मिडिया हाऊसेसचं अंतरंग बाहेर आणलं आहे.आपल्या लाभासाठी काही मिडिया घराणी जातीयवादाला प्रोत्साहन देणार्‍या आणि विरोधकांना बदनाम करणारे रिपोर्ट कसे देत आहेत याचे किस्से कोबरानं प्रसिद्ध केेले आहेत.एवढंच नव्हे तर एका पाठोपाठ एक स्टींगच्या अनेक व्हिडिओ ही कोबरानं पोस्ट केले आहेत.देशात जे मोठी मिडिया घराणी आहेत त्यांच्या अधिकार्‍यांबरोबरच्या चर्चा या व्हिडिओत रेकॉर्ड झाल्या आहेत आणि संस्थात्मक लाभासाठी हे मिडिया हाऊसेस कोणत्या तडजोडींना तयार झालेत हे त्यात दिसतं आहे.रोख रक्कम किंवा  अन्य लाभासाठी कोणताही अजेंडा आपल्या चॅनलवरून,वृत्तपत्रातून अथवा अन्य व्यासपीठावरून पुढे रेटण्यासाठी हे अधिकारी तयार झाल्याचे दिसते आहे.वरिष्ठ अधिकारीच नाही तर या मिडिया घरण्याचे मालकच या तडजोडी करायला तयार झाल्याचे दिसते आहे.

कोबरा पोस्टनं कशी पोलखोल केली या बडया मालकांची ? पत्रकार पुप्प शर्मा स्वतःला संघाचे प्रचारक असल्याचे भासवत मिडिया हाऊसेसच्या बड्या अधिकार्‍यांना अथवा मालकांना भेटले.आपण श्रीमत भागवत गीता प्रचार समितीचे प्रतिनिधी असल्याचे सांगत शर्मा यानी जातीयवादाला खतपाणी घालण्यासाठी एकतर्फा प्रसिध्दीची चर्चा या मालकांबरोबर करीत होते.विरोधी पक्षातल्या काही नेत्यांना बदनाम करण्यासाठी विशेष मोहिम चालविण्याचा आग्रहही हे कथित प्रचारक धरीत होते.त्यासाठी आर्थिक लाभ मिळवून देण्याच्या गोष्टी करणयात आल्याचं कोबराच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटलँ आहे.एका मोठ्या ग्रुपचे मालक पेड न्यूजसाठी एक हजार कोटी रूपये मागतानाचे दृश्य व्हिडिओत कैद झाल्याचा कोबराचा दावा आहे.

 कोबरा पोस्टनं काही दिवसापुर्वी आपल्या वेबसाईटवरून मोठा धमाका करण्याची घोषणा केली आणि त्यासाठी 2५ मे रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आल्याचं निवेदन जारी केलं तेव्हा हे सारे मालक खडबडून जागे झाले..त्यातील एक मालक तर थेट कोर्टात गेले आणि त्यांनी थेट कोबरा पोस्टच्या प्रेस कॉन्फरन्सलाच मनाई हुकूम कोर्टातून मिळविला. कोर्टाची नोटीस मिळाल्यानंतर कोबरा पोस्टचे सर्वेसर्वा अनिरूध्द बहलने पत्रकार परिषद तर रद्द केली पण भास्कर सोडून अन्य दैनिकांच्या मालकांना नागडं करणारे व्हिडिओ आपल्या वेबसाईटवर अपलोड केले.त्यानं देशभर खळबळ उडाली आहे.

पेडन्यूज हे दुखणं पत्रकारांच्या ‘गले की हड्डी’ बनलेलं आहे.वास्तवात पेड न्यूज आणि पत्रकारांचा काही संबंध नाही.पेड न्यूज बाबतची डील व्यवस्थापनामार्फतच होते.बदनाम पत्रकार होतात.कोबरा पोस्टच्या स्टिंग ऑपरेशनमधून हे पुन्हा समोर आलंय.जे व्हिडिओ समोर आलेत त्यात बहुतेक ठिकाणी मालक किंवा पत्रकारेतर वरिष्ठ अधिकारी सीइओच शर्मा यांच्याबरोबर डील करताना दिसत आहेत.वाचकांनी आणि पत्रकारांना टार्गेट कऱणार्‍यांनी कृपया हे वास्तव ध्यानात ठेवावं.नोकरदार पत्रकाराना मान्य असो -नसो मालकांनी सांगितलेला अजिंडा पुढे चालवावा लागतो.पडद्यावर पत्रकार दिसतात त्यामुळं टीव्ही पाहणारे सारा दोष पत्रकारांच्या माथी मारून मोकळे होतात.कोबरा पोस्टनं या समजाला धक्का नक्की दिला आहे.अर्थात कोबराच्या या स्टिंगनंतरही होणार काहीच नाही.दोन दिवस चर्चा होईल मग सारं थंडा थंडा कुल कुल अशी स्थिती आहे.कारण हे सारे मिडिया घराणे सरकारला फेवर करण्याच्या गोष्टी करीत होते.विरोधक यावर बोलणार काहीच नाहीत.ते या मालकांना घाबरून किंवा सांभाळून असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here