माहिती विभागाची टूर निघाली इस्त्रायलला..22 लाखांची उधळपट्टी होणार 

हाराष्ट्र सरकारचे माहिती आणि जनसंपर्क खाते आहे हे किती लोकांना आठवत असेल माहिती नाही.जिल्हा माहिती कार्यालयांच्यानिमित्तानं जिल्हा पातळीवर या विभागाची पूर्वी थोडी तरी ओळख होती मात्र आता ना पत्रकारांना या कार्यालयाची गरज पडते ना जनतेला.व्हीव्हीआयपींच्या दौर्‍यांच्या वेळेसचे पासेस आणि अधिस्वीकृती पत्रिकेसाठीचे अर्ज स्वीकराण्यापुरतेच या खात्याचे महत्व आता शिल्लक आहे.खरं म्हणजे सरकारी योजना जनतेपर्यंत पोहचविणे,सरकारची उत्तम प्रतिमा निर्माण करण्यासाठीचं महत्वाचं व्यासपीठ अशी या विभागाची ओळख होती.ती आता इतिहास जमा झाली आहे.फडणवीस सरकारच्या पतनामागे या विभागाचा आणि त्यातील काही ‘बाहयशक्तींचा’ मोठाच वाटा आहे.नावात जरी जनसंपर्क असले तरी जनतेशी पूर्णपणे नाळ तुटलेला हा विभाग आहे.विभागात असंख्य जागा रिक्त आहेत.( राज्यभर किती माहिती अधिकार्‍यांच्या,उपसंचालकांच्या,संचालकांच्या जागा रिक्त आहेत याची माहिती माहितीच्या अधिकारात मागितली होती पण उर्मटपणा आणि अधिकार्‍यांची मग्रुरी अशी की, या अर्जाला केराची टोपली दाखविली गेली.तीन महिने झाले तरी अजूनही या अर्जाचे उत्तर मिळालेले नाही ) त्याकडं कोणाचं लक्ष नाही.मोठी परंपरा असलेल्या पत्रकार संघटनांचं खच्चीकरण करणं,पत्रकारांमध्ये भांडणं लावणं,सरकारनं घेतलेल्या निर्णयाचं आपल्याच चमच्यांना श्रेय मिळेल अशी कारस्थानं करणं,अधिस्वीकृतीसमितीमध्ये राजकारण करणं यामध्ये मात्र हा विभाग पारंगत आहे.एवढंच कश्याला राज्यात किती ज्येष्ठ पत्रकारांना बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेचा लाभ मिळाला ? ,ते भाग्यवान पत्रकार कोण आहेत? ,300 अर्ज आले होते त्यातील किती लोकांना पेन्शन मिळाली? ही सारी माहिती एवढी गोपनीय ठेवली गेलेली आहे की,ती बाहेर आली तर ‘मोठी दुर्घटना’ होईल असं या विभागाला वाटतं.माहितीच्या अधिकारात देखील या विषयाची माहिती दिली जात नाही ही गंमत आहे.खरं म्हणजे पत्रकारांना पेन्शन देऊन सरकारनं एक ऐतिहासिक निर्णय घेतला होता.निवडणुकीच्या काळात या विभागाला हा विषय चांगल्या पध्दतीनं लोकांसमोरम मांडता आला असता परंतू या विभागातील अधिकार्‍यांनी ही संधी सोडली त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागले हे वेगळे सांगण्याची गरज नाही.जनमत तयार करण्यात मोठा वाटा असलेल्या पत्रकारांची नाराजी सरकारला भोवली.यात माहिती आणि जनसंपर्कचा मोठा हिस्सा आहे.

केवळ नावातच ‘जनसंपर्क’ शिल्लक असलेल्या या विभागातील काही वरिष्ठ अधिकार्‍यांचं शिष्टमंडळ आता ‘शासकीय जनसंपर्क व्यवस्थेतील नव्या बदलांचा’ अभ्यास करण्यासाठी इस्त्रायलला निघाले आहे.15 ते 25 नोव्हेंबर या काळात माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या पाच अधिकार्‍यांची टूर इस्त्रायलला जात आहे.जनसंपर्क बरोबरच ‘सोशल वेब मिडियाचाही’ म्हणे हे अधिकारी अभ्यास करणार आहेत.जे अधिकारी इस्त्रायलच्या टूरवर जात आहेत त्यामध्ये संचालक अजय अंबेकर,संचालक हेमराज बागुल,सह संचालक किशोर गांगुर्डे,सह संचालक वर्षा आंधळे,आणि अजय जाधव यांचा समावेश आहे.यातील काहीजणांच्या विरोधात न्यायालयात दावे प्रलंबित आहेत,काहीजण अजून प्रोबेशनवर आहेत असं असतानाही नियम धाब्यावर बसवून निवडी केल्या गेलेल्या आहेत.या दौरयावर तब्बल 22 लाख रूपयांची उधळपट्टी केली जाणार आहे.गंमत अशी की,परदेश दौरयासाठी 12 क्रमांकाचं हेड असताना कार्यालयीन खर्चातून ही रक्कम काढली जाणार असल्याने दैनंदिन खर्चांना मोठीच कात्री लावली जाणार हे उघड आहे.एकीकडं राज्यात सरकार स्थापन होत नसल्याने कमालीची अस्थिरता आहे,असा वातावरणात माहिती विभागातील दोन संचालकांसह महत्वाचे अधिकारी परदेशवारीवर निघाले असल्याने विभागतच मोठी नाराजी आहे.

2 COMMENTS

  1. बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेसाठी शासकीय फॉर्म भरून १० महिने झाले. अद्याप काहीही कळवलं नाही. अतिशय बेदरकारपणे कारभार चालला आहे. यांच्या या कारभाराविरोधात संघटीत आवाज उठविण्याची गरज आहे.
    सुरेश कराळे, मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here