महिलांनी माध्यमांत काम करणे इस्लामविरोधी’

0
844
ढाका – इस्लामिक कायद्यामध्ये महिलांना माध्यमांमध्ये काम करण्याची अनुमती नसल्याने येथील माध्यम क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्यांनी त्यांच्या महिला कर्मचाऱ्यांना तत्काळ कामावरुन काढून टाकावे, असा आशयाचा इशारा बांगलादेशमधील बंदी घालण्यात आलेल्या एका मूलत्त्ववादी संघटनेने दिला आहे. अन्सरुल्लाह बांगला टीम असे या संघटनेचे नाव असून बांगलादेशमध्ये या वर्षी चार ब्लॉगरच्या करण्यात आलेल्या हत्यांची जबाबदारी या संघटनेने स्वीकारली होती.

गेल्या महिन्यात या संघटनेने लक्ष्य करण्यात येणाऱ्या 15 ब्लॉगर व लेखकांची यादी प्रसिद्ध केली आहे. या लेखकांवर या मूलतत्त्ववादी संघटनेने इस्लामविरोधी मोहिमेमध्ये सहभागी असल्याचा आरोप केला आहे. या यादीमधील 9 जण हे बांगलादेशबाहेर राहत आहेत. या वर्षी हत्या झालेल्या निलय नील, वशिकुर बाबु आणि अवजित रॉय या ब्लॉगर्सप्रमाणेच इस्लामविरोधी लेखन केल्यास इतरांनाही ठार करण्याचा इशारा या संघटनेने दिला आहे. दरम्यान, माध्यमांसंदर्भातील या इशाऱ्यामुळे बांगलादेशमधील महिला पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.””या इशाऱ्यामुळे सर्व पत्रकारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशा स्वरुपाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करता येणे शक्‍य नाही. माध्यमांमध्ये काम करणाऱ्या सर्व महिलांसाठी हा इशारा म्हणजे फार मोठा धक्का आहे,‘‘ असे एका महिला पत्रकाराने आपले नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. दरम्यान, अशा प्रकरणी प्रशासन व पोलिस मदत करतील असा विश्‍वास धमकी देण्यात आलेल्या बहुसंख्य ब्लॉगर्स वा लेखकांमध्ये राहिला नसल्याचे आढळून आले आहे. बांगलादेशमध्ये धार्मिक मूलतत्त्ववादाविरोधात लेखन केल्यामुळे गेल्या एका वर्षाच्या काळात पाच जणांची हत्या करण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here