महाराष्ट्राचा कंठमणी… डॉ.सी.डी.देशमुख

0
1620

संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्य़ांनी आपल्या अर्थमंत्रीपदाचा राजीनामा पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या तोंडावर फेकून त्यांना चार खडेबोल सुनावले त्या सीडीदेशमुखांची आज जयंती आहे.14 जानेवारी 1896 रोजी रायगड जिल्हयातील नाते या गावी सी डी देशमुखांचा जन्म झाला.आपल्या अलौकिक बुध्दीमत्तेनं आणि अफाट कर्तृत्वानं रायगडचं आणि रोहयाचं नाव जगभर दुमदुमत ठेवणाऱ्या सी डी देशमुखांची नंतरच्या काळात मात्र घोर उपेक्षा झाली.हैदराबादेत अत्यंत एकाकीपणे त्याचं निधन झालं.रायगडात सीडींचं भव्य स्मारक व्हायला हवं ते ही झालेलं नाही.भारतमातेच्या या सुपुत्राला अभिवादन करणारा विशेष मजक ूर 

                                                ——————————————

 महाराष्ट्राचा कंठमणी
 डॉ.सी.डी.देशमुख 

   एका बाजुला कळसगिरीचा डोंगर,त्याच्या मागं उभा असलेला घोसाळगड आणि पायथ्याला वर्षभर  झुळझुळ वाहणारी कुंडलिका न दी,आणि चोहोबाजुंनी घनदाट वनराई अशा निसर्गाच्या सान्निध्यात रोहा गाव वसलेलं आहे.मुंबई-गोवा या सतरा क्रमांकाच्या महामार्गावर कोलाडपासून पश्चिमेला वीस किलो मीटर आणि मुंबईपासून बरोबर शंभर किलो मीटर अंतरावर असलेल्या रोह्याला निसर्गाचा वरद्‌हस्त बुद्दीमत्तेचं वरदाऩ लाभलेलं आहे.आपल्या अलौकीक र्कृत्वानं आकाशाला गवसणी घालणारी अनेक व्यक्तीमंत्वं रोह्याच्या मातीत जन्माला आली.चिंतामणराव देशमुख,पांडूरंगशास्त्री आठवले,मामा क्षीरसागर यांच्या सारख्या काही रोहेकर सुपूत्रांचा इ थं उल्लेख करता येईल.या सर्वांनी रोहा गावाचं नाव सातासमुद्रापल्याड नेले.त्यामुळंच सी.डी.देशमुखांचं किंवा पाडुरंगशास्त्री आठवलेंचं रोहा ही रोह्याची ओळख झाली. – सी.डी.देशमुखांना सहा  भाऊ होते.त्या सर्वांनी आपआपल्या क्षेत्रात रोह्याचा नावलौकिक वाढविला.एक बंधू एम.डी.देशमुख हे जागतिक कीर्तीचे क्षयरोग तज्ज्ञ होते.रोह्यातच राहणारे यशवंतराव उर्फ वाय.डी.देशमुख हे सलग 28 वर्षे रोहा नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते.एक निष्णात वकिल म्हणून त्यांचा गावात दबदबा होता.तिसरे भाऊ पंढरीनाथ उर्फ पी.डी.देशमुख हे डॉ.राजेंद्रप्रसादांचे काही वर्षे सेक्रेटरी होते.चौथे भाऊ भालचंद्र देशमुख हे सेंट्रल एक्साईजमध्ये उच्च अधिकारी होते.पाचवे भाऊ अंबरनाथच्या विमको कंपनीत मॅनेजर होते आणि सहावे  बंधू रिझर्व बॅंकेत एक्झिक्युटिव्ह गव्हर्नर होते.एकाच कुटुबातील सातही भावांनी आपआपल्या क्षेत्रात सर्वोच्च पदं प्राप्त केल्याचं आणि आपल्या कुटुबाचं आणि गावाचं नाव त्रिखंडात दुमदुमत ठेवल्याचं  हे अभावानचं दिसणारं उदाहरण होतं.चिंतामणरावांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वापुढं अन्य सहा भावंडाचं कर्तृत्व काही प्रमाणात झाकोळलं असलं तरी रोहेकरांना मात्र या सातही भावांचा सार्थ अभिमान वाटतो.रोह्याला ओळख देणारे  सी.डी.देशमुख असोत  किंवा पांडुरंगशास्त्रींच्या आठवले असोत यांच्या  स्मृती जनत करण्यासाठी रोह्यात काही प्रयत्न झालेत असं मात्र  दिसत नाही.सी.डी.देशमुखांच्या स्मारकाच्या संदर्भात जिल्हयातील पत्रकारांनी सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर चिंताणरावांच्या स्मारकासाठी सरकारनं दोन कोटी रूपयांची अर्थसंकल्पात तरतूद तर केली पण पुढं स्मारकाचा पाळणा हलला नाही. – सी.डीं.चा जन्म ज्या महाड तालुक्यातील नाते गावात झाला ति थं करायचं,त्यांच्या गावात म्हणजे तळ्यात करायचं की,त्याचं बालपण ज्या रोह्यात गेलं त्या रोहा इ थं करायचं यावरूनही वाद झाले.सामांन्य रायगडवासियांना या वादात किंव त्याअनुषंगानं खेळल्या जाणाऱ्या राजकारणात रस नव्हता.स्मारक व्हावं ही त्याची इच्छा होती.ती अजून तरी फलद्रुप झालेली नाही.स्मारक झालेलं नसलं तरी रोहा तालुका पत्रकार संघानं सी.डी.देशमुखांच्या स्मृती जतन करण्यासाठी त्यांच्या नावानं पत्रकारांना पुरस्कार देण्याची योजना सुरू केली.दरवर्षी 14 जानेवारीला म्हणजे सी.डी.देशमुखांच्या जन्मदिनी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होतो.सी.डी.देशमुखांच्या नावानं रोह्यात एक विद्यालय आहे,एक कॉलेज आहे.भारत सरकारनं त्यांच्यावर पोस्टाचं पाच रूपयांचं तिकीट काढलेलं आहे.सी.डी.देशमुखांच्या नावानं रिझर्व्ह बॅंक एका अर्थतज्ज्ञाला पुरस्कार देते.

– सी.डी.देशमुख याचं घराणं मुळचं तळा येथील.वडिल द्वारकानाथ देशमुख पेशानं वकिल.ते महाड इ थं वकिली करायचं.त्यांनी महाड परिसरात चांगलंच नाव कमावलं होतं.महाडपासून सहा किलो मीटर अंतरावर असलेलं नाते ही द्वारकानाथ देशमुखांची सासरवाडी.बळवंतराव महागावकर यांची मुलगी वेणू ( लग्नानंतरचं नाव भागिरथी ) हिच्याबरोबर व्दारकानाथ यांचा विवाह झालेला होता.बिऱ्हाड करून व्दारकानाथ महाडलाच राहात.तळे – महाड असा त्यांचा प्रवास सातत्यानं व्हायचा.तत्कालिन रिवाजा प्रमाणं मुलीचं पहिलं बाळंतपण माहेरी व्हायचं.तेथेच चिंतामणराव देशमुखांचा जन्म 14 जानेवारी 1896 रोजी झाला.त्या दिवशी संक्रांत होती,पण संक्रांतीच्या दिवशीच अमावास्याही होती.बाळाला पुढच्या आयुष्यात त्रास होऊ नये म्हणून नाते आणि तळे इ थं शांतीपाठ झाले होते.महाडला आल्यावर वयाच्या चौथ्या वर्षीच चिंतामणीला प्राथमिक शाळेत घालण्यात आलं.त्यानंतर चिंतामणीला तळ्याच्या शाळेत घालण्यात आलं.त्याकाळी अलिबाग नंतर महाडलाच न्यायालय असायचं.त्यामुळं मधल्या पट्टयातील लोकांना त्रास व्हायचा.रोहा इ थं न्यायालय व्हावं ही मागणी तेव्हा केली जायची.अखंर मागणी मंजूर झाली आणि 1904 मध्ये रोहा इ थं दिवाणी न्यायालय सुरू झालं.तळा ते महाड हा त्रासदायक प्रवास करून थकलेले द्वारकानाथ महाड सोडून मग रोह्याला आले.रोह्यात वकिली करू लागले.मग चिंतामणलाही रोह्याला आणलं गेलं.चिंतामणीनं रोह्याच्या शाळेत पाचवी ते सातवी असे तीन वर्ग दोन वर्षातच पार केले.शिष्यवृत्तीही मिळविली.रोह्यात त्याकाळी हायस्कूल नव्हते.त्यामुळं पुढील शिक्षणासाठी त्यांना मुंबईला जावं लागलं.तिथं आर्यन हायस्कूलमध्ये त्याचं आठवीनंतरचं शिक्षण झालं.अत्यंत कुशाग्र बुध्दी लाभलेल्या चिंतामणीनं 1912 मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली.ते प्रथम श्रेणीत प्रथम आले.त्यांना संस्कृतची जगन्नाथ शंकरशेठ शिष्य़वृत्ती मिळाली.या देदीप्यमान यशाबद्दल चिंतामणीचा रोहा नगरपालिकेच्यावतीनं नागरी सत्कार केला गेला.पुढील शिक्षणासाठी विलायतेला जायचं ठरलं.आर्थिक अडचण होतीच.वडिलांनी दहा हजार रूपये उभे केले.हिंदू एज्युकेशन सोसायटीकडून दहा हजाराचं कर्ज घेतलं गेलं.सारी तयारी झाल्यानंतर चिंतामणराव देशमुखांनी15 मज 1915 रोजी लंडनला जाणाऱ्या बोटीत पाऊल ठेवले.तिथं कें ब्रिजच्या जीझस कॉलेजातून ते बी.ए.ची परीक्षा ते उत्तीर्ण  झाले.त्यानंतर ते इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षेला बसले.यातही ते पहिले आले. ( 1919) असं सांगतात की,या परीक्षेत त्यांनी जे गुण मिळविले तेवढे गुण पुढील काळात एकाही भारतीय विद्यार्थ्याला मिळवता आले नाहीत.त्यानंतर लोकमान्य टिळकांच्या सूचनेनुसार त्यांनी सनदी नोकरी स्वीकारण्याचा नि र्णय़ घेतला.चिंतामणराव लंडनमध्ये असतानाच रोझिना सिल्कॉक्स या आंग्ल तरूणीशी विवाह झाला.  इंग्लंडहून परतल्यानंतर रोझिनाला घेऊन ते जेव्हा रोह्यास गेले तेव्हा देशमुखांकडं  परधर्मीय सून आल्यानं गावात मोठीच खळबळ उडाली.आजुबाजुचे वातावरण पाहून मग रोझिनाला गोफण येथील नातेवाईकांच्या बंगल्यावर नेण्यात आलं.या पहिल्याच अनुभवानंतर रोझिना  नंतरच्या काळात रोह्यास कधीच गेली  नाही.भारतात परतल्यानंतर चिंतामणरावांनी सरकारी नोकरीत प्रवेश केला. ब्रिटिश काळातील जुन्या सेंट्रल प्रॉव्हिन्स व बेरर प्रांतात त्यांची उपायुक्त,अप्पर सचिव.आणि सचिव अशा विविध पदांवर त्यांनी काम केलं.या पदांवर काम करताना एक प्रामाणिक,कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम प्रशासक असा नावलौकिक त्यांनी मिळविला.त्यांची बुध्दिमत्ता,कार्यक्षमता पाहून दुसऱ्या गोलमेज परिषदेला एक सचिव म्हणून उपस्थित राहण्याची संधी त्यांना मिळाली.तेथील कामगिरीबद्दल इंग्लंडच्या राणीनं त्यांना सर हा किताब दिला.गोलमेज परिषदेच्या निमित्तानं त्यांचा महात्मा गांधी,पंडित मदनमोहन मालवीय,लालबहादूर शास्त्री,तेजबहादूर सप्रू,बॅ.जयकर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर या नेत्यांशी त्यंाचा संबंध आला.देशमुखांची कुशाग्र बुध्दीमत्ता आणि उद्योगशिलतेनं हे नेते प्रभावित झाले नसते तरच नवल.त्यानंतर त्यांनी विविध प्रशासकीय पदांवर काम केलं.महसूल आणि वित्त विभागाचे सचिव,शिक्षण विभागाचे संयुक्त सचिव (1931-39) याच काळात शत्रूराष्ट्रांच्या मालमत्तेचे अभिरक्षक,भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या मध्यवर्ती मंडळाचे सचिव,डेप्युटी गव्हर्नर म्हणूनही त्यांनी काम पाहिले.याच काळात रिझर्व्ह बॅेकचे गव्हर्नर टेलर याचं अचानक निधन झाले.दुसऱ्या महायुध्दाचा हा कालखंड होता.गव्हर्नरपदी हिंदी माणसाची निवड कऱणे बब्रिटिशांना धोक्याचं वाटत होतं.काही पर्याय चाचपडून पाहिले गेले.मात्र अंतिमतः ॠी.डी.देशमुख यांचीच गव्हर्नर म्हणून निवड केली गेली.13 ऑगस्ट 1943 रोजी सी.डी.देशमुख यांनी रिझर्व्ह बॅंकेचे पहिले गव्हर्नर म्हणून सूत्रे हाती घेतली.गव्हर्नर झाल्यावर भाई आपल्या आईचे आशीर्वाद घेण्यासाठी रोह्याला आले होते.रोह्याच्या शाळेत शिकलेल्या एका मुलाची भारताच्या नोंटावर स्वाक्षरी छापली जात होती.हा केवळ रोह्याचाच नव्हे तर मराठी माणसाचा गौरव होता.त्यानंतर आंतरराष्ट्रीय नाणे नि धी आणि जागतिक बॅेकेवर भारताचे प्रतिनिधी आणि त्याचे अध्यक्ष म्हणूनही चिंतामणी देशमुखांनी काम केलं होंत.नियोजन आयोगाचे अध्यक्ष,विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष,नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष ,दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू,तसेच अन्य अनेक महत्वाच्या पदांवर त्यांनी काम केले.रिझर्व्ह बॅंकेतील निवृत्तीनंतर रोझिनासोबत सुखासमाधानानं राहण्याची स्वप्न ते बघत असतानाच रोझिना गंभीर आजारी असल्याची तार त्यांना आली.सी.डी,लंडनला जाण्यापुर्वीच ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यानं रोझिना सर्वांना सोडून गेली होती.ऑगस्ट 1949मधील ही घटना.प्रिमरोझ ही त्यांची मुलगी नंतर लंडनमध्येच राहिली.29 वर्षांचा हा संसार अशा प्रकारे आकस्मिक आणि अनपेक्षितपणे संपला होता.सी.डी.एकटे पडले होते.आपण आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकलो नाही याची खंत त्यांना वाटत होती.

 स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री 

– सी.डी.देशमुख अ र्थ सचिव असताना त्याचं काम वल्लभभाई पटेल यांनी पाहिलं होतं.त्यामुळं त्यांनीच 1946मध्ये व्हाईसरॉय लॉर्डवेव्हल सी.डी.केंर्दीय कायदेमंडळात वित्तमंत्री म्हणून यावयास तयार आहेत का याची विचारणा कऱण्यास सांगितले होते.मात्र तेव्हा सी.डीं.नी नम्रपणे नकार दिला होता.त्यानंतर वल्लभभाईंनी पुन्हा नेहरूंकडं त्यांच्या नावाची शिफारस केली.त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आग्रह केल्यामुळं सी.डीं.नी देशाचे पहिले अर्थमंत्रीपद स्वीकारण्याची तयारी दर्शविली.13 मे 1950 रोजी त्यांनी अर्थमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला.सी.डी.अर्थमत्री झाले तेव्हा खासदार नव्हते.सहा महिन्यात त्यांना राज्यसभा किंवा लोकसभेचा सदस्य होणं आवश्यक होतं.त्यांना पंजाब प्रांतातून राज्यसभेवर एकमतानं निवडून दिलं गेलं. असं सांगतात की,आमच्याकडं पुष्कळ इच्छूक आहेत असं कारण सांगत तेव्हा महाराष्ट्रानं मात्र त्यंान राज्यसभेवर पाठवायला नकार दिला होता.मराठी माणसाची खेकडावृत्ती तेव्हापासून सुरू होती.सी.डी.देशमुख राज्यसभेवर गेले होते तरी आपल्या मंत्रीमंडळातील सर्व मंत्री लोकामंधून निवडून आलेले असावेत असं नेहरूंना वाटत होतं.त्यामुळं लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा नेहरूंनी कुलाब्यातून सी.डी.ंना उमेदवारी दिली.सी.डी.कॉग्रेसचे उमेदवार होते तरी ते कॉग्रेसचे सदस्य मात्र नव्हते.या निवडणुकीत भाऊसाहेब राऊतांच्या विरोधात सी.डी.देशमुख दणदणीत मतांनी विजयी झाले.गंमत अशी की,निवडणूक काळात मत दार संघात आपल्या प्रचारासाठी फारशे फिरलेच नाहीत.स्वतंः-र पंडित जवाहरलाल नेहरू सी.डीं.च्या प्रचारासाठी आले होते.नेहरूंच्या नव्या मंत्रिमंडळात अपेक्षेप्रमाणं पुनश्च सी.डी.देशमुख अर्थमंत्री झाले.देशाचे पहिले अर्थमंत्री म्हणून चिंतामणरावांनी आपली जबाबदारी अत्यंत समर्थपणे पार पाडली.भारताच्या हिताचे अनेक नि र्णय त्यांनी घेतले.इंपीरियल बॅंकेचे राष्ट्रीयीकरण,राष्ट्रीय विकास परिषद ( नॅशनल डेव्हलमेंड कौन्सिल) ची स्थापना,आयुर्विमा उद्योगाचं राष्ट्रीयीकऱण असे मुलगामी आणि दीर्घकालिन परिणाम करणारे महत्वाचे नि र्णय त्यांनी घेतले.अर्थमंत्री म्हणून काम करताना ते नेहरूचे विश्वासू सहकारी म्हणूनच ओळखले जात.दोघांमध्ये आपलेपणाचे संबंध होते.त्यामुळंच 22 जानेवारी 1953 रोजी जेव्हा सी.डी.देशमुखांनी जेव्हा दुसऱ्यांदा संसार थाटण्याचं ठरविलं तेव्हा नेहरू स्वतः उपस्थित होते.दुर्गाबाईंसी सी.डी.चा दुसरा विवाह नोंदणी पध्दतीनं झाला.त्यावेळी सी.डी.सत्तावन्न वर्षांचे आणि दुर्गाबाई त्रेचाळीस वर्षांच्या होत्या.दुर्गाबाई अतिशय साध्या आणि गृहकृत्यदक्ष असल्यानं त्यांनी सी.डींच्या घराला शिस्त लावली.त्या जुन्या परंपरेतील खऱ्या खुऱ्या हिंदू पत्नी बनल्या. – लग्नानंतर सी.डी.ना थोडे  कौटुंबिकदृष्टया स्थैर्य मि ळाले असतानाच संयुक्त महाराष्ट्राचा लढा त्यांच्या जीवनात नव्या पर्वाची  सुरूवात करणारा ठरला.महाराष्ट्रासाठी त्यांना अर्थमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.महाराष्ट्र निर्मितीचा इतिहास म्हणजे गंभीर तत्वनिष्ठ लढ्याचं आणि अनेक हर्ष विषादाच्या घटनांनी भरलेले एक महाभारतच आहे.या महाभारतातील सी.डी.देशमुखांचा राजीनामा हा कळस आहे.महाराष्ट्राचे अनेक पुढारी सत्तेला चिकटून बसलेले असताना देशमुखांनी अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देऊन जो बाणेदारपणा दाखविला त्याला देशाच्या इतिहासात तोड नाही.105 हुतात्मे झाल्यानं महाराष्ट्र निर्माण होणार होताच पण त्याला सी.डीं.चा राजीनामा देखील एक कारण ठरले.सी.डी.ंचा हा त्याग महाराष्ट्र कधी विसरला नाही.विसऱणारही नाही.अर्थमंत्रीपदाचा राजीनामा हे पर्व सी.डी.च्या आय़ुष्यातील महत्वाचं असल्यानं त्याची पार्श्वभूमी आणि नंतरच्या घटनाचा संक्षिप्त आढावा इ थं घेणं आवश्यक आहे.

आंध्रप्रदेशचे सर्वोदयी नेते  पोट्टी श्री रामल्लु यांनी आमरांत उपोषण केल्यानं सरकारला आंध्र प्रदेशचं पहिलं भाषिक राज्य निर्माण करावं लागलं होतं.( 1 ऑक्टोबर 1953) आंध्रची निर्मिती झाल्यानंतर देशभर भाषावार प्रांतरचेनेची मागणी जोर धरू लागली.महाराष्ट्रातही या मागणीचा जोर वाढला होता.मात्र तत्कालिन सरकारची महाराष्ट्राबाबतची भूमिका आकसाची असावी.मुंबई महाराष्ट्राकडं जाताच कामानये असेच महाराष्ट्रव्देष्टयांना वाटत होते.त्यासाठी अनेक खटाटोप केले गेले.सरकारनं प्रारंभी दार कमिशन नेमलं होतं.या कमिशनचा अहवाल डिसेंबर 1948 मध्ये प्रसिध्द झाला.तो किती प्रतिमामी होता याबाबतचं एकच मासलेवाईक उदाहरण इ थं देता येईल. अहवालात म्हटलं होतं ङ्गभाषिक राज्यांची मागणी  संकुचित,प्रादेशिकतावादी,असून तिच्यामुळं लोकवस्तीचं मोठ्या प्रमाणात स्थलांतर होईल व रक्तपात आणि अत्याचार माजतीलङ्घदार यांच्या अहवालावर कॉंग्रेसच्या जयपूर इ थं झालेल्या अधिवेशनात हा अहवाल फेकून देण्यात आला.त्यावर फेरविचार करण्यासाठी मग  जयरामदास दौलतराव,वल्लभभाई आणि अधिवेशनाचे अध्यक्ष पट्टाभी सीतारामय्या यांची एक त्रिसदस्य समिती नेमली गेली.या समितीला जे.व्ही.पी.समिती म्हणून संबोधलं जाई.या समितीनं काय केलं ?ेदार यांच्यापेक्षा थोडी सौम्य त थापि महाराष्ट्राच्या मागणीला हरताळ फासणारीच भूमिका घेतली. ङ्गभाषावर प्रांत तुर्तास बनवू नयेत,पण ती  बनवायचीच असल्यास मुंबई शहर वगळून संयुक्त महाराष्ट्र द्यावाङ्घ  अशी शिफारस जेव्हीपीनेही केली होती.दार आणि जेव्हीपीच्या शिफारशींच्या विरोधात सेनापती बापटांनी 1 जुलै1949 रोजी  संयुक्त महाराष्ट्रासाठी सत्यागृहाची हाक दिली होती.त्यामुळं महाराष्ट्रभर वातावरण तापले होते. आंध्रची निर्मिती झाल्यानं आग अधिकच भडकली होती.अशा स्थितीत सरकारला काही तरी ठोस भूमिका घेणं अनिवार्य होतं म्हणून  डिसेंबर 1953 मध्ये राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली गेली.दोन वर्षे अभ्यासकरून आयोगानं 10 ऑक्टोबर 1955 रोजी आपला अहवाल प्रसिध्द केला.तो महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ रगडणारा होता.फाजल अली कमिशननं आपल्या अहवालात अशी काही मेख मारलेली होती की,काहीही केले तरी त्यात महाराष्ट्राचं नुकसानच होतं.आपल्या अहवालात फालजअलींनी म्हटलं होतं. – विदर्भ वगळून मराठवाडय़ासह  महाराष्ट्र- गुजरात द्वैभाषिक स्वीकारा,किंवा मुंबई शहराचं स्वतंत्र राज्य करून गुजरात-मुंबई- महाराष्ट्र अशी त्रिराज्य योजना पत्करा  असा कोलदांडा घातला होता.दोन्ही पर्याय महाराष्ट्रला मान्य होण्यासारखे नव्हते.विदर्भ बाजुला काढणं आणि द्वैभाषिकचं जोखड अंगावर घेणं असा दुहेरी अन्याय त्यात होता.गुजरात्यांचा डोळा मुंबईवर होता.स.का.पाटीलही त्यात तेल ओतत होते.त्यामुळं त्रिराज्य निर्मितीची योजना मुंबई शहर आणि गुजरात कॉंग्रेसनं मान्य केली.नंतर संयुक्त महाराष्ट्राचा कलस घेऊन येणा़ऱ्या यशवंतराव चव्हाण यांनी फलटण येथील राजवाड्यात झालेल्या बैठकीत पंडित नेहरू आणि संयुक्त महाराष्ट्र असा जर प्रश्न निर्माण झाला तर पंडित नेहरूंचं नेर्तृत्व मी डोळे झाकून स्वीकारीन असं वक्तव्य केल्यानं वातावऱण अधिकच तप्त झालं.18 नोव्हेंबर  1955 रोजी  संयुक्त महाराष्ट्र समितीतर्फे एक मोर्चा विधानसभेवर नेण्यात आला.बंदी हुकूम मोडून लोक पुढं घुसले.नंतर झालेल्या सभेत 21 नोव्हेंबर 1955 रोजी बंद पाळण्याचा नि र्णय घेण्यात आला.त्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे 20 तारखेला मोरारजी देसाई आणि स.का.पाटील यांची जाहीर सभा झाली.या सभेत दोन्ही नेत्यांनी बलगाम वक्तव्ये केली. – यावच्चंद्र दिवाकरो मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही ही स.का.पाटलांची कुप्रसिध्द घोषणा याच सभेतली.स्वाभाविकपणे जमाव संतप्त झाला.चप्पलांचा मारा केला गेला.ठरल्याप्रमाणं 21 नोव्हेंबरला मोर्चा निघाला.पण हा मोर्चा चिरडून टाकायचा असा निर्धारच मोरारजींनी केलेला असल्यानं लाठीमार,अश्रूधूर,गोळाबार केला गेला.त्यात पहिल्याच दिवशी पंधरा जणांच्या आहुत्या पडल्या.असं सांगतात की,ठार करण्यासाठीच गोळ्या घाला असा आदेश त्या दिवशी मोरारजींनी दिला होता.केवळ पंधरा बळी घेऊन मोरारजी थांबले नाहीत,नंतरच्या  दोन आठवड्याच्या काळात 105 जणांचे बळी घेतले गेले. – यात मुंबईतील गिरणी कामगार आणि सामांन्य माणस होती.या घटनेचे पडसाद देशभर उमटले.या गोळीबाराची आणि अत्याचाराची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणीही पंडित नेहरूंनी मान्य केली नाही.उलटपक्षी मुंबई केंद्रशासित करण्याचा प्रश्न लोकसभेच्या चिकित्सासमितीसमोर असतानाच पंडित नेहरूंनी मुंबई केंद्रशासित होणार असे रेडिओवरून 16 जानेवारी 1956 रोजी जाहीर केले.नेहरूंच्या या घोषणेनं सी.डी.देशमुख अस्वस्थ झाले.सरकारच्या या निर्णयामुळं कुलाबा या आपल्या मत दार संघाच्या एकूणच महाराष्ट्राच्या नुकसानीत आपला सहभाग नसावा म्हणून सी.डी.देशमुख यांनी आपल्या अर्थमंत्रीपदाचा राजीनामा पंतप्रधानांकडं पाठवून दिला.इतर आमदारांनीही आपले राजीनामे मुख्यमंत्र्यांकडं पाठविले पण हे राजीनामे स्वीकारू नयेत अशा सूचना अ.भा.कॉग्रेस समितीचे अध्यक्ष ढेबर यांनी दिल्या होत्या.त्यामुळं ते राजीनामे स्वीकारले नाहीत ( राजीनामे स्वीकारावेत असा आग्रह कोणी धरला नाही) सी.डी.देशमुख कॉंग्रेसचे सदस्य नव्हते.त्यामुळं ढेबर यांचा आदेश त्यांना लागू होत नसल्यानं त्यांनी राजीनामा पाठविला.नेहरूंनी तो लगेच स्वीकारला नाही.प्रत्यक्ष भेटीत समजूनत काढता येईल म्हणून तो तसाच ठेऊन दिला.नंतर नेहरू परदेशात गेले.ते परतल्यानंतर संसदीय कॉग्रेसची बैठक बालावली गेली.त्यात सी.डी.नी आपलं म्हणणं मांडलं.त्यावर नेहरूंनी ,देशमुख म्हणतात त्यात तथ्य आहे परंतू आजच्या परिस्थितीत तडजोडीला जागा नाही असं स्पष्ट केलं.नंतर 22 जुलै 1956 रोजी सी.डी.देशमुखांचा राजीनामा स्वीकारण्यात आल्याचं राष्ट्रपती भवनातून जाहीर करण्यात आलं.कॉग्रेसमधील भांडवलदारांच्या एका गटाच्या दबावाखाली देशमुखांचा राजीनामा स्वीकारला गेला असं सागण्यात येतं.त्यानंतर मुंबई,महाराष्ट आणि गुजरातचे एक व्दैभाषिक राज्य निर्मित करून या व्दैभाषिक मुंबईचे मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी 1 नोव्हेंबर 1956 रोजी शपथ घेतली.ही तडजोड महाराष्ट्रात मान्य नव्हती.त्याचा परिणाम कॉग्रेसला भोगावे लागले.1957 च्या निवडणुकीत मुंबई आणि कोकणात कॉग्रेसचं पानिपत झालं.

 सी.डी.देशमुखांनी राजीनामा दिल्यानंतर 25 जुलै – रोजी े ते संसंदेत निवेदन करणार होते.त्या दिवशी संयुक्त महाराष्ट्र समितीनं संसदेवर मोर्चा नेण्याचं ठरविलं होतं.त्याचं नेतृत्व एस.एम.जोशी ,आचार्य अत्रे करणार होेते.दिल्लीत जोशी,अत्रेंनी देशमुखांची भेट घेतली.तेव्हा देशमुखांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्याचा वृत्तांत मराठानं असा दिला होता,ङ्घ आतापर्यत महाराष्ट्रातील कित्येक लोक वीरश्रींच्या मोठमोठ्या वल्गना करीत होते.आम्ही राजीनामे देतो,आम्ही लढतो,आम्ही असे करतो,आम्ही तसे करतो,पण प्रत्यक्षात रणांगणात उतरण्याची मात्र कोणाचीच तयारी नाही.या संग्रामाचा पहिला बळी पडण्याची संधी मला मिळाली.हे मी माझं भाग्य समजतो.हा लढा प्रांतीय नाही.ही फक्त  महाराष्ट्राची सेवा नसून भारताची सेवा आहे.असे मी मानतो.ङ्घ ठरल्या प्रमाणं 25 जुलै – रोजी देशमुखांनी लोकसभेत आपल्या राजीनाम्याबाबत निवेदन केले.ते म्हणाले, ङ्गमुंबई शहराला स्वतंत्र राज्याचा द र्जा देण्याची कल्पना सर्वच दृष्टीनं असमर्थनिय आणि अन्याय्य आहे.शिवाय हे घोषणा जाहीर करताना पंडित नेहरू हे लोकशाहीची पायमल्ली करूनच वागले आहेत.ही घोषणा करताना त्यांनी मंत्रिमडळाला विचारलेले नाही.मंत्रिमंडळाच्या सामुहिक जबाबदारीचे स्पष्टपणे त्यांनी उल्लंघन केलं.त्यांना नसलेले अधिकार त्यांनी बळकावून घटनाबाह्य वर्तन केलेले आहे.त्याचं हे वर्तन त्यांच्या हट्टीपणाचं आणि हुकूमशाही प्रवृत्तीचंच दर्शन आहे.मुंबईमध्ये शासनानं गोळीबार करून जे बळी घेतले त्याची चौकशी नाकारणं हे ही लोकशाही विरोधी कृत्य आहे.या सर्वांचा मी माझ्या राजीनाम्याव्दारे निषेध नोंदवत आहेङ्घ.हे निवेदन देशभर गाजले.महाराष्ट्रात त्याचं प्रचंड स्वागत झालं.आचार्य अत्रे यांनी सी.डी.देशमुखांचा उल्लेख महाराष्ट्राचे कंठमणी असा करून त्यांचा गौरव केला.नेहरूचं व्यक्तीमत्व आणि त्यांचा एकूणच दबदबा लक्षात घेता त्यांच्या तोडावर एवढ्या कडक भाषेत निषेध नोंदविणं ही साधी गोष्ट नव्हती.सी.डी.ंनी कसलीही भिडमिर्वत न ठेवता महाराष्ट्राच्या हितासाठी हे केलं होतं.महाराष्ट्राच्या निर्मितीत त्याचा राजीनामा ही घटना फार मोलाची आहे हे विसरता येणार नाही.देशमुखांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रात अधिकच संताप पसरला.त्याचे परिणाम 1957 च्या निवडणुकात कॉग्रेसला भोगावे लागले.कॉग्रेसची पडझड झाली.त्याची कारणं कॉग्रेसवाल्यांनी दिल्लीच्या न जरेस आणून दिल्यानंतर किमान स्वार्थासाठी का होईना कॉग्रेसला द्वैभाषिकचा पुनर्विचार करावा लागला.4 डिसेंबर 1960 रोजी व्दैभाषिकाचे विभाजन करण्याचा ठराव संमत केला.अंतिमतः 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्राची स्थापना झाली.महाराष्ट्र स्थापन झाला होता सीमा प्रश्न अनिर्णित राहिला होता.त्याची बोच एस .एम.जोशी यांनी आपल्या आत्मचरित्रात व्यक्त केलेली आहे.हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही.

अर्थमंत्रीपद सोडल्यानंतर त्यानी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम केले.1961 पर्यत ते या पदावर होते.याच वेळेस दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू,भारताच्या केंद्रीय संस्कृत मंडळाचे अध्यक्ष,भारतीय आर्थिक विकास संस्था,सामाजिक विकास परिषद,भारतीय लोकसंख्या परिषद,यासारख्या अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या.राष्ट्रपीत झाकीर हुसेन याचं 1969मध्ये निधन झालं.तेव्हा सी.डी.देशमुख यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविली होती.मात्र ते राजकारणी नसल्यानं त्यात त्यांचा पराभव झाला.मात्र देशमुखांसारखी चारित्र्यसंपन्न,कतृत्ववान,बुध्दीवान आणि सुसंस्कृत व्यक्ती राष्ट्रपती झाली असती तर या पदाची गरिमा आणखीनच वाढली असती हे नक्की.पण निवडणुकीतल्या डावपेचात ते कमी पडले.आयुष्यभर यशाची चढती कमान पाहिलेल्या सी.डी.चा उत्तर आयुष्यात झालेला हा पराभव त्यांच्या मनाला जखम करणारा होता.अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच त्याचं लेखनही सुरूच होतं.त्यांनी कालिदासाच्या मेघदूतचा मराठीमध्ये श्लोकबध्द अनुवाद केलाय.मद्रास विद्यापीठात दिलेल्या व्याख्यानाचे  सिटीझन ऑफ नो मीन कंट्री  आणि दीक्षांत समारंभात दिलेल्या व्याख्यानाचे इन दी पोर्टल्स ऑफ इंडियन युनिर्व्हसिटी  आणि ऑन द थ्रेशोल्ड ऑफ इंडियाज सिटीझनहुड ही पुस्तकं प्रसिध्द झाली.महात्मा गांधी यांच्या शंभर वचनांचा संस्कृत श्लोकात  अनुवाद त्यांनी केला आणि तो गांधी सुक्तीमुक्तावली या शिर्षकाखाली प्रसिध्द झाला.1974 मध्ये त्यांनी लिहिलेले  द कोर्स ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र प्रसिध्द झाले आहे. त्यांंच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरीबद्दल त्यांचा विविध पुरस्कार देऊन वेगवेगळ्या पातळ्यांवर सन्मान करण्यात आला.1959मध्ये त्यांना रेमन मॅगासेसे पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं.लेस्टर (इंग्लंड) प्रिन्स्टन ( अमेरिका) म्हैसूर,उस्मानिया विद्यापीठांनी एलएलडी ही सन्मान्य पदवी देऊन,कलकत्ता विद्यापीठानं डी.एससी.या पदवीनं त्यांना सन्मानित केलं.अन्नमलई,नागपूर,अलाहाबाद,पुणे आणि पंजाब विद्यापीठांनी त्याना डी,लिट ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला.भारत सरकारला मात्र त्यांचं जर उशिराच स्मरण झालं.त्यांना पद्मविभूषण हा नागरी पुरस्कार 1975 मध्ये मृत्यूच्या पाच-सात वर्षे अगोदर दिला गेला.

दिल्ली विद्यापीठाच्या कुलगुरू पदावरून निवृत्त झाल्यावर पुढील वास्तव्य पुण्यात कऱण्याचा त्यांचा बेत होता.पण ते शक्य झालं नाही.नंतर दुर्गाबाईंना सुप्रिम कोर्टात वकिली करता यावी यासाठी दिल्लीत राहण्याचाही नि र्णय त्यांनी घेतला होता.त्यांनाही वकिली करता यावी यासाठी राहिलेली बॅरिस्टरची पदवीही त्यांनी इंग्लंडला जाऊन आणली होती,मात्र ही योजनाही य़शस्वी झाली नाही.त्यामुळं त्यांनी नंतर हैदराबादला स्थायिक व्हायचं ठरवलं.हैदराबाद हे दुर्गाबाईचं माहेर होतं आणि ति थं त्यांचे अनेक नातेवाईक होते.त्यामुळं देशमुख दाम्पत्य हैदराबादला गेले.तेथे 9 मे 1981 रोजी दुर्गाबाईंचं निधन झाले.सी.डी.ची काठी गेली होती.ते एकाकी झाले.देशात अनेक पदं भूषविणाऱ्या सी.डी.चे नंतर जेवणासाठी देखील हाल व्हायला लागले.त्यांनी आपलं घर आंध्र महिला सभेला दिलं.ते तीन खोल्यात राहात होते.दुर्गाबाईंच्या जाण्यानं सी.डी.कोसळून पडले होते.त्यातच शरीरानेही असहकार केल्यानं त्याचं 2 ऑक्टोबर 1982 साली निधन झालं.दुर्गाबाईंच्या नंतर एक-दीड वर्षातच त्यांचंही निधन झालं.सतत लोकांमध्ये राहणाऱ्या सी.डी.च्या अंत्ययात्रेलाही फारशे लोक नव्हते.अगदी अल्पावधीतच ते लोकांच्या विस्मृतीआड गेले होते.त्यांना पद्मविभूषण मिळालेलं असल्यानं त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणं अपेक्षित होतं.ते ही झालं नाही.शेवटचे काही दिवस सी.डी.ंसाठी अत्यंत क्लेशदायक गेले.एक तत्वनिष्ठ,आणि दुसऱ्यासाठी आयुष्य जगणा़ऱ्या व्यक्तीवर अशी वेळ यावी हे निश्चितच  भारत सरकारसाठी  भूषणावह नव्हते.

(सागरमोती या माझ्या आगामी पुस्तकातून )

– संदर्भ- विश्वकोश खंड-7

– मराठी विश्व चरित्रकोश

– रायगड गॅझेट

– महाराष्ट्रातील समाजसुधारक ( के.सागर )

– आधुनिक महाराष्ट्राचं राजकारण ( व.मं.सिरसीकर)

– मी एस एम.( एस.एम.जोशी यांचं आत्मचरित्र)

– चिंतामणराव देशमुख  ( डॉ.श्रीनिवास वेदक )

– निसर्ग सुंदर रोहा  ( श्रीनिवास गडकरी )

– द कोर्स ऑफ माय लाईफ ( सी.डी.देशमुखाचं आत्मचरित्र)

– सी.डीं.ची रोजनिशी- गोविंद तळवळकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here