मराठी पत्रकार परिषदेची आणखी एक भरारी

0
680

मराठी पत्रकार परिषदेची आणखी एक भरारी,

ऑनलाईन निवडणूक प्रक्रियेला शिरूरपासून सुरूवात 

मराठी पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या आणि 77 वर्षाची देदीप्यमान परंपरा लाभलेल्या मराठी पत्रकार परिषदेने स्वतःमध्ये नेहमीच काळानुरूप बदल केलेले आहेत.आज पर्यन्त परिषदेच्या निवडणुका परंपरागत पध्दतीने पोस्टाने बॅलेटपेपर पाठवून होत असत.ही प्रक्रिया दीर्घकालीन ,खर्चिक तर होतीच त्याचबरोबर ती पूर्णपणे पारदर्शक होतीच असा दावा कऱण्यासारखी स्थिती  नव्हती.अनेकजण या मतदान प्रक्रियेबद्दल नाराजी व्यक्त करीत असत.ही पध्दत बदलली पाहिजे असा आग्रह सातत्यानं धरला जात होता.त्यानुसार एस.एम.देशमुख यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ऑनलाईन पध्दतीने निवडणूक प्रक्रिया राबविण्याची घोषणा केली होती.त्यादृष्टीने नंतर प्रयत्न सुरू झाले.आज ऑनालाईन पध्दतीची चाचणी पुण्यात घेतली गेली.ती यशस्वी झाली.यावेळी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे पंचवीसच्यावरती पदाधिकारी,सदस्य उपस्थित होते. पुढील महिन्यात मराठी पत्रकार परिषद आणि पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाशी संलग्न असलेल्या  शिरूर तालुका पत्रकार संघाची निवडणूक होत आहे.या निवडणुकीत ऑनलाईन मतदानाची प्रक्रिया राबविली जाणार आहे.महाराष्ट्रात ऑनलाईन मतदान घेण्याचा पहिला मान शिरूर तालुक्यास मिळत आहे.ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्यानंतर  टप्प्याटप्प्याने संपूर्ण महाराष्ट्रात ती राबविली जाणार आहे.2017 मध्ये मराठी पत्रकार परिषदेच्या निवडणुका होत आहेत.त्यासाठी देखील ही पध्दत वापरली जाणार आहे.परिषदेचे महाराष्ट्रात आठ हजार सदस्य आहेत.आणि संपूर्ण महाराष्ट्र हा परिषदेचा मतदार संघ आहे.या मतदार संघातून कार्याध्यक्ष आणि सरचिटणीसपदासाठी मतदान घेतले जाते.पुढील वर्षी परिषदेच्या इतिहासात प्रथमच निवडणूक प्रक्रियेत बदल होऊन ती अधिक सुलभ,अधिक पारदर्शक,कमीत कमी कालावधीत,आणि कमीत खर्चात निवडणूक होणार आहे.या अगोदरच्या पध्दतीत परिषदेच्या निवडणुकांसाठी किमान चार  लाख रूपये खर्च येत होता.यावेळी  पंधरा ते वीस हजारात ही निवडणूक होणार असल्याने परिषदेचे किमान साडेतीन  ते पावणेचार  लाख रूपये वाचणार आहेत.परिषदेने अगोदर आपला मासिक जमाखर्च ऑनलाईन टाकायला सुरूवात केली आणि आता निवडणूक प्रक्रिया ऑनलाईन करून परिषदेने पारदर्शकतेच्यादृष्टीने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.आपला हिशोब ऑनलाईन टाकणारी आणि निवडणुका ऑनलाईन घेणारी मराठी पत्रकार परिषद ही देशातील एकमेव पत्रकार संघटना आहे.परिषदेच्या प्रत्येक सदस्यांसाठी ही अभिमानाची बाब आहे.इतर अनेक पत्रकार संघटनांमध्ये उमेदवारांना साधे सदस्यांचे इ मेल किंवा फोन नंबर्सही उपलब्ध करून न देणे,त्यांचे पत्ते न देणे असे प्रयत्न करून निवडणुकांचा फार्स रंगविला जात असताना मराठी पत्रकार परिषदेने संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याच्यादृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे.याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे. ( एस.एम.)

मराठी पत्रकार परिषदेतर्फे प्रकाशित –

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here