युट्यूब चॅनल्स आणि पोर्टलच्या पत्रकारांना हक्काचं व्यासपीठ मिळणार
पुणे दिनांक 3 फेब्रुवारी ( प्रतिनिधी ) यु ट्यूब चॅनल्स आणि पोर्टलचा होत असलेला विस्तार आणि त्याचं महत्व लक्षात घेऊन पोर्टल आणि युट्यूब चॅनल्सच्या पत्रकारांना आपल्या हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा निर्णय मराठी पत्रकार परिषदेने घेतला असून युट्यूब आणि पोर्टलचे चालक आणि पत्रकारांचा समावेश असलेला स्वतंत्र सोशल मिडिया सेल निर्माण करण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे.या सेलमध्ये युट्यूब आणि पोर्टलच्या चालकांना, पत्रकारांना सदस्य करून घेण्यात येणार असल्याची माहिती परिषदेचे विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी एका पत्रकाव्दारे दिली आहे.मराठी पत्रकार परिषदेच्या विस्तारित कार्यकारिणीची सभा आज पिंपरी-चिंचवड येथे संपन्न झाली.या सभेच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा होते.यावेळी परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक,कार्याध्यक्ष गजानन नाईक,सरचिटणीस अनिल महाजन,कोषाध्यक्ष शरद पाबळे उपस्थित होते.विभागीय सचिव बापूसाहेब गोरे यांनी बैठकीचे नियोजन केले होते,बैठकीस परिषदेचे विभागीय सचिव,जिल्हा अध्यक्ष,कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते.बैठकीला मार्गदर्शन करताना एस.एम.देशमुख यांनी सोशल मिडियाचे महत्व विषद करून पोर्टल आणि युट्यूब चालकाच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची गरज विस्ताराने कथन केली.त्यावर सखोल चर्चा होऊन परिषदेच्या नियंंत्रणाखालीच परिषदेचा सोशल मिडिया सेल स्थापन करण्यास कार्यकारिणीने संमती दिली.कार्यकारिणीच्या बैठकीनंतर राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या शंभरावर पोर्टल आणि युट्यूब चॅनल्स चालकांशी देशमुख यांनी संवाद साधला.तसेच त्यांच्या भावना समजावून घेतल्या.सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या जाहिरात धोरणात पोर्टलला जाहिराती देण्याचा निर्णय घेतला आहे,तसेच सरकारनं पोर्टलसाठी पुरस्कारही देण्याची योजना सुरू केलेली आहे.पोर्टल चालकांना अधिस्वीकृती देण्याबाबतही विचार सुरू असल्याने पत्रकारितेतील बदल सरकारनं स्वीकारले असून समाजानेही ते बदल स्वीकारावेत असे आवाहन देशमुख यांनी केले.पुढील काळ हा सोशल मिडियाचा आहे.भविष्याची गरज ओळखूनच बडया चॅनल्सनी आणि मोठ्या वृत्तपत्रांनी देखील आपले पोर्टल सुरू केलेले आहेत.त्यामुळं या बडयांशी स्पर्धा करताना आपल्याला आपली मजकुराची गुणवत्ता,आणि तांत्रिक बाबींची पूर्तता करावी लागणार असल्याचे मत देशमुख यांनी व्यक्त केले.येत्या एक महिन्यात पुण्यात विस्तारित बैठक घेऊन संघटनेचा ढाचा निश्‍चित केला जाईल अशी माहिती देशमुख यांनी यावेळी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here