कटाक्ष ःः एस.एम.देशमुख

सुशीलकुमार शिंदे यांनी शरद पवार यांचा पुण्यातील एका कार्यक्रमात भावी राष्ट्रपती असा उल्लेख केला.हातानंच नकार देत त्याला शरद पवार यांनी विरोध केला.नंतर आपल्या भाषणात त्यांनी सविस्तर खुलासा करताना ‘राष्ट्रपती झालेली व्यक्ती सार्वजनिक जीवनातून निवृत्त होते,हा रस्ता माझ्यासाठी नाही कारण मला लोकांत राहायला आवडते’ असे म्हटले”.  या अगोदर प्रफुल्ल पटेल यांनी कर्जतमधील पक्षाच्या बैठकीत 2018 हे साल शरद पवारांचे असेल,त्यांचे पंतप्रधान होण्याचं स्वप्नही यावर्षात पूर्ण होईल असं भाकित वर्तविलं होतं.त्यालाही विरोध करीत शरद पवार यांनी ‘पाच-सहा खासदार असलेल्या पक्षाचा नेता पंतप्रधान कसा होईल’? असा प्रश्‍न उपस्थित करून हा विषय टाळला होता.मुद्दा असा आहे की,शरद पवारांच्या नावामागे कधी भावी पंतप्रधान तर कधी भावी राष्ट्रपती अशी बिरुदे का लावली जातात याचा.ही दोन्ही पदं आज रिक्त नाहीत.राष्ट्रपतीपदाची निवडणूक होऊन सहा महिनेही झालेले नाहीत.नवीन पंतप्रधान होण्यासाठी आणखी किमान दोन वर्षे प्रतिक्षा करावी लागणार आहे.अशा स्थितीत सुशीलकुमार असोत ,प्रफुल्लभाई असोत की अन्य पवार समर्थक असं का बोलत असतील ? याचंही विश्लेषण  होणं आवश्यक आहे.आपल्या नेत्यानं किंवा आपण ज्यांच्यावर प्रेम करतो अशा व्यक्तीनं मोठं व्हावं असं वाटणं स्वाभाविक आहे.मात्र या वाटण्याला वास्तवाचीही आधार  असला  पाहिजे.तो  नसतानाही जेव्हा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते तेव्हा यामागचा हेतूही समजून घेणे आवश्यक असते।  .भावी असा उल्लेख करताना सुशीलकुमार यांना माहिती नव्हते का की,राष्ट्रपतीपदाची निवडणूक आणखी पाच वर्षे दूर आहे ? शिवाय राष्ट्रपती व्हायचं तर किमान सत्ताधारी पक्षाचं समर्थन हवं.नरेंद्र मोदी भलेही आपण शरद पवार याचं बोट धऱून राजकारणात आलो असं म्हणत असले तरी जेव्हा राष्ट्रपतीपदाचा विषय येईल तेव्हा शरद पवार यांच्या सारख्या चाणाक्ष नेत्याला ते राष्ट्रपती होऊ देणार नाहीत हे नक्कीच .कोणत्याही पंतप्रधानाला राष्ट्रपती हा आपल्या मर्जीतला हवा असतो.तसे नसेल तर बुटासिंग असतील किंवा अन्य काही राष्ट्रपती असतील त्यांनी तेव्हा तेव्हाच्या सरकारला कसे जेरीस आणले होते याचे किस्से सर्वज्ञात आहेत.तशी चूक नरेंद्र मोदी किंवा भाजप नक्कीच करणार नाही। सुशीलकुमार भलेही कॉग्रेसचे नेते असतील आणि त्यांना शरद पवारांवर खरोखरच प्रेमही असले तरी सोनिया गांधी किंवा राहूल गांधी हे शरद पवार यांना पुरेपूर ओळखून आहेत.त्यामुळं ते देखील पवारांना ऱाष्ट्रपती करण्याचा ‘धोका’ विकत घेणार नाहीत.समजा कॉग्रेसमधील पवार समर्थक गटाच्या दबावामुळं कॉग्रेस त्याला तयार झाली तरी देशातील कॉग्रेस समर्थक  खासदार आणि आमदारांची संख्या लक्षात घेता शरद पवार राष्ट्रपती म्हणून निवडून येतील अशी शक्यता नाही.देशातील नितीशकुमार,लालूप्रसाद,ममता बॅनर्जी,चंद्रबाबू नायडू आणि डावे देखील पवारांच्या पाठिशी उभे राहतीलच याची खात्री कोणीच देऊ शकत नाही.पवारांच्या नावावर सर्वसहमती देखील अशक्य आहे.हे सर्व वास्तव स्वतः शरद पवार यांना माहिती असल्यानंच त्यांना  हात हालवून ‘नको नको’ म्हणताना आपण पाहिले.

प्रश्‍न आवडी-निवडीचा नाही..गरजेचा आहे..
शरद पवार सक्रीय राजकारणात राहू इच्छितात.कोणत्याही लोकनेत्याला राष्ट्रपती भवनात किंवा राज्यपाल होण्यात स्वारस्य असत नाही वसंत दादांना जेव्हा राजस्थानचे राज्यपाल केले गेले तेव्हा त्यांच्या मनाची घालमेल त्या काळात सर्वांनी अनुभवली होती..शरद पवार यांनाही तसंंच वाटतं.ते त्यानी  बोलूनही दाखविलं. सक्रीय राजकारणात राहणं ही पवार यांची आवड असली तरी आज प्रश्‍न आवडी-निवडीचा नाहीच.तो गरजेचा आहे.पवार यांनी सक्रीय राहणं ही त्यांची मजबुरी देखील आहे.ते सक्रीय राजकारणातून बाजुला गेले तर त्यांच्या पक्षाची होणारी वाताहत त्याना दिसते आहे.राष्ट्रवादी हा शरद पवार यांच्या नावावर चालणारा पक्ष आहे.अशा स्थितीत ते जर राष्ट्रपती किंवा तत्सम पदावर गेले तर पक्ष आणि कार्यकर्ते पोरके होतील. आजच पक्षांची स्थिती फार चांगली आहे असं नाही.देशाचं सोडाच राज्यातही पक्षाचे अनेक बुरूज ढासळले आहेत.जे शाबूत आहेत त्यातील बहुतेकजण कोर्ट कचेर्‍यांच्या फेर्‍यात असे अडकले आहेत की,त्यांचा कधीही भुजबळ होऊ शकतो अशी शक्यता आहे.या नेत्यांना तशी भितीही आहे.त्यामुळंचं नागपुरात सिंचन भ्रष्टाचार प्रकऱणी गुन्हे दाखल होताच हल्लाबोल मागं घ्यावं लागलं होतं.सत्ताधार्‍यांची अरेरावी कमालीची वाढलेली असताना राष्ट्रवादीला बोटचेपे धोरण स्वीकारावे लागते ते याचमुळं.सत्ताधार्‍यांशी उघड पंगा घ्यायला ही मंडळी धजावत नाही याचं कारणही मागील सरकारच्या काळात झालेल्या अनेक घोटाळे हेच आहे.भवितव्याच्या भितीनंच अनेक नेते त्रस्त असल्यानं पक्ष वाढीकडंही कुणाचं लक्ष नाही.पक्षाची वाढ खुंटलीच आहे असं नाही तर पक्ष कुरतडलाही जातोय.अशा स्थितीत शरद पवारांचं राष्टपती होणं पक्षाला परवडणारंही नाही.राजकीय चाणक्य असलेल्या शरद पवार यांनाही आजच्या स्थितीतून पक्षाला बाहेर कसं काढायचं याचं गणित सुटत नाही.एक आशा होती की,शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल आणि अदृश्य हाताच्या रूपानं आपण भाजला पाठिंबा देऊन सत्तेतील भागिदार होऊन पक्षाला जीवदान देऊ.मात्र शिवसेनेने राष्ट्रवादीची ही खेळी ओळखलेली असल्यानं सेना पुढील दीड वर्षे तरी सत्ता सोडत नाही हे नक्की आहे.निवडणुकांना चार-दोन महिने शिल्लक असताना शिवसेना बाहेर पडेल पण तेव्हा स्थिती अशी असेल की,शरद पवार भाजपला पाठिंबा देऊ शकणार नाहीत.तसं केलंच तर ती पक्षासाठी आत्महत्या ठरेल.त्यामुळं ‘धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय’ अशी राष्ट्रवादीची स्थिती आहे.

कॉग्रेसचा ‘हात’ हातात घ्यावाच लागेल..
राष्ट्रवादीला ही कोंडी फोडण्याचा एक मार्ग आहे तो कॉग्रेसशी पुन्हा घरोबा कऱण्याचा. राष्ट्रवादीन हा पर्याय चाचपायला सुरूवातही केली आहे.गुजरातमध्ये कॉग्रेसनं आपली शक्ती वाढविली आहे.भाजपला फेस आणला.त्याचा आनंद राष्ट्रवादीनेही साजरा केला.एवढे दिवस राहूल गांधी यांच  नेतृत्व मान्य नाही असं बोलणारे राष्ट्रवादीचे नेते राहूल गांधींवर अभिनंदनाचा वर्षाव करीत होते.अध्यक्षपदाची सूत्रे राहूल गांधी यांनी स्वीकारल्यानंतरही त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.याचा अर्थच असा की,’कॉग्रेसची साथ घेतल्याशिवाय आता तरणोपाय नाही’ ही खुणगाठ राष्ट्रवादीच्या नेतृत्वानं मनाशी बांधली आहे असा लावता येऊ शकतो.आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी जर एकटी लढली तर या पक्षाची खैर नाही.राष्ट्रवादीला कॉग्रेसबरोबर लढावे लागेलच.असं केलं तरच पक्षाचा निभाव लागेल.अन्यथा या पक्षाची अवस्थाही शेकाप किंवा तत्सम पक्षांसारखी होईल.राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते आणि राजकीय पंडितांचंही असं मत आहे की,आता फार विलंब न करता राष्ट्रवादीनं सरळ ‘पुन्हा एकदा’ कॉग्रेसमध्ये विलीन व्हावं आणि भाजपविरोधी शक्ती अधिक प्रबळ होतील याची काळजी घ्यावी.राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेस आता कात टाकताना दिसतो आहे.पप्पू आता पप्पू राहिला नसून तो परिपक्व राजकीय नेता झाला आहे असं देशातील राजकीय विश्‍लेषक सांगत आहेत.त्यामुळं भाजपचा सुसाट सुटलेला वारू आवरायचा असेल तर सर्व समविचारी विरोधकांनी राहूल गांधींच्या नेतृत्वाखाली एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही.असं झालं नाही तर प्रादेशिक पक्षांची खैर नाही.कॉग्रेसमध्ये राष्ट्रवादी विलीन झाला तर भलेही शरद पवारांना पंतप्रधानपद मिळणार नसले तरी त्यांना दिल्लीत त्या तोडीचे पद नक्कीच मिळेल.वेळ आलीच तर राष्ट्रपती भवनातही शरद पवार विराजमान होऊ शकतील.आज पक्ष आहे त्या अवस्थेतच राहिला तर पवारांचे पंतप्रधानपद आणि राष्ट्रपतीपद हे केवळ स्वप्नरंजन ठरणार आहे.याचा विचार शरद पवार यांना नक्कीच करावा लागणार आह

दुसर्‍या फळीबद्दलची चिंता
पवारांच्या आसपास जावू शकेल एवढं तुल्यबळ नेतृत्व पक्षात दुसरं नाही.दुसर्‍या फळीतील नेते आप-आपल्या विभागात भलेही प्रभावी असतील पण एकूण राज्याचा विचार केला तर राज्यव्यापी मान्य होईल असं दुसरं नेतृत्व पक्षाजवळ नाही.झटपट निर्णय घेण्याची क्षमता,स्पष्ट,रोखठोक भूमिका यामुळं काही काळ अजित पवार थोरल्या साहेबांची जागा घेऊ शकतील असं वाटत होतं पण सिंचन घोटाळ्यात सातत्यानं येणारं त्यांचं नाव आणि पक्षातंर्गत त्यांच्या नावाला असलेला विरोध लक्षात घेता पवार राष्ट्रपती भवनात गेले तर अजित पवार पक्ष एकहाती सांभाळू शकतील असं कोणालाच वाटत नाही.सुप्रिया सुळे असतील किंवा सुनील तटकरे असतील हे देखील पक्ष सांभाळू शकत नाहीत.दिलीप वळसे पाटील,किंवा जयंत पाटील यांची नक्कीच जनमानसावर पकड आहे,चारित्र्याच्यादृष्टीनेही त्यांच्यावर आरोप झालेले नाहीत हे जरी खरं असलं तरी अतंर्गत गटबाजीमुळं त्यांना पुढं चाल मिळण्याची शक्यता नाही.प्रफुल्ल पटेल हे दरबारी राजकारणी आहेत,त्यांचा महाराष्ट्रात उपयोग नाही दिल्लीतच कॉर्पोरेट संबंध सांभाळण्यापुरतीच त्यांची उपयुक्तता असल्यानं त्यांचाही काही उपयोग होणार नाही.हे सारं पवारांना दिसतंय,प्रत्येकांच्या मर्यादाही त्यांना माहिती आहेत म्हणूनच त्यांना आज पंच्च्याहत्तरीतही म्हणावं लागतंय की,’मला लोकांतच राहायला आवडतं.राष्ट्रपती भवन हा माझा मार्ग नाही’.हे सारं खरं असलं तरी यापेक्षा जास्त त्यांना पक्षाची काळजी असल्यानंच ते राष्ट्रपती होणे नको म्हणत आहेत.अलिकडं त्यांनी दिल्लीतील लक्ष कमी करून राज्यात पुन्हा लक्ष धातलंय,नागपूर मोर्चाचं नेतृत्वही त्यांनी केलं ते याचमुळं..आपण महाराष्ट्रात नसू तर पक्षाची मुळी विस्कटायला वेळ लागणार नाही हे पवारांनी केव्हाच हेरलं असल्यानं त्यांची इच्छा असो नसो त्यांना महाराष्ट्रातच थांबावे लागत आहे किंवा थांबावे लागणार आहे.

राजकारणात काहीही घडू शकतं हा भ्रम दूर करावा लागेल..
शरद पवारांची मनोवस्था आणि वास्तवाची जाणीव झाल्यानंतरही पवार भक्तांचा एक लाडका सिध्दांत असतो की,’राजकारणात काहीच अशक्य नाही’ हा..हे खरंच आहे.शरद पवारांनी ज्या पध्दतीनं वसंत दादांना धोबीपछाड दिली होती ते बघता राजकारणात काहीच अशक्य नाही हे वेगळं सांगण्याची गरज नाही.परंतू हे परिस्थितीवरही बरंच अवलंबून असतं.जेव्हा शऱद पवारांनी दादांच्या विरोधात बंड केलं तेव्हा ते तरूण होते.फुले.शाहू,आंबेडकरांचं मंत्र उच्चारल्यामुळं त्यांच्याबद्दल डावे आणि समाजवादी मंडळीत एक प्रकारची आपुलकी होती.त्यातून त्याचं बंड यशस्वी झालं.आज तशी कोणतीच स्थिती नाही.पवारांचं वय आणि शरीर साथ देत नसल्याची खरी अडचण आहे.त्यामुळं काहीच अशक्य नाही हे सूत्र येथे पटत नाही.’पाच खासदारही ज्यांच्याकडं नाहीत अशा पक्षाचा नेता पंतप्रधान होऊ शकत नाही’ हे त्यांनीच मान्य केलंय.राष्ट्रपती व्हायचं तर त्याला आणखी पाच वर्षे प्रतिक्षा करावी लागेल आणि तोपर्यंत पवारांनी वयाची 80 पार केलेली असेल.त्यामुळं निवडणुकीला सामोरं जाणं,निवडणूक पेलणं हे सारं पवारांना शक्य होईलच असं नाही.म्हणून च  काहीही होऊ शकतं हा आशावाद इथं प्रत्यक्षात येण्याची शक्यता दिसत नाही.काहीही होऊ शकतं म्हणजे पवार पंतप्रधान किंवा राष्ट्रपती जसे होऊ शकतील असं समर्थकांना वाटतं तसंच ते होऊही शकणार नाहीत असाही ‘काहीही’ चा एक अर्थ निघूच शकतो की..त्यामुळं या जर तर ला अर्थ नाही.उलट अशी चर्चा करून आपण शरद पवार यांना मानसिक क्लेश देत असतो किंवा त्यांच्या जखमेवरील खपल्या काढत असतो.दुःख याचं वाटतंय की,हे सारं पवारांच्या जवळची मंडळीच करीत असते.ते त्यानी थांबविलं पाहिजे असं आमचं प्रांजळ मत आहे.प्रत्येक मराठी माणसांप्रमाणंच आम्हालाही शरद पवार यांनी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण केलेलं पाहायला जसं आवडेल तसं राष्टपती भवनात त्यांना पाहणंही आवडेल.तशी आमचीही इच्छा आहेच पण इच्छा,आणि आवड आणि वास्तव यात मोठं अंतर असतं हे तमाम पवार समर्थकांनी लक्षात ठेवलं पाहिजे.

नव्या वर्षांच्या सर्वांना शुभेच्छा

 एस.एम.देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here