भयइथलंसंपत_नाही….
कोविद-19 च्या संसर्गाने सबंध भारतात अक्षरशः मृत्यूचे तांडव मांडले आहे. गेल्या महिन्यात फक्त महाराष्ट्रात थैमान घालताना दिसणारा कोरोनाचा महाजंतू आता सबंध देशावर नैराश्य, भीती आणि नकारात्मक विचारांची कृष्णछाया पसरवतोय…
म्हणून आपण सर्वांनी मिळून सावध झालं पाहिजे. सर्वप्रथम आपण स्वतः सकारात्मक पध्दतीने कोविद-19 हा संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी रूग्णांना धीर दिला पाहिजे. सोबत वैद्यकीय मार्गदर्शन, रूग्णालय, बेड, इंजेक्शन, ऑक्सिजन, प्लास्मा आदी विविध टप्प्यांवर शब्द आणि कृती ने साथ दिली पाहिजे. डाॅक्टर, नर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील सर्व मंडळी आपलं प्राणपणाला लावून लोकांना बरे करताहेत. पोलीस आणि इतर शासकीय यंत्रणेतील लोकांप्रमाणेच आमचे पत्रकार बांधवही जीवावर उदार होऊन लढताना दिसताहेत. या सर्व फ्रंटलाईन वर्कर्स सोबत, आपण सर्वांनी एकजूट दाखवली तर आणि तरच आपण या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखू शकतो… सरकार नामक यंत्रणा काय करतेय, असा प्रश्न विचारणे सोपे असते, ते टाळून सध्याच्या स्थितीमध्ये आपण आम्ही काय करू शकतो यावर कृती करणे महत्वाचे आहे, असे मला वाटते…
कोविद-19 च्या संसर्गाने आजवर अनेक डाॅक्टर, नर्स आणि आरोग्य सेवकांचे मरण ओढवले आहे. एका मुंबई महानगरात 102 पोलीस मृत्यूमुखी पडलेत, राज्यातील हा आकडा फार मोठा आहे. आरोग्य सेवा किंवा पोलीस दलातील बहुतांश कोविद-शहिदांना वेळीच अर्थ सहाय्य आणि अनुकंपा तत्वावर नोकरी मिळाल्याने त्यांना या जीवावरच्या दुखण्याचा सामना करणे शक्य झाले. पण दुर्दैवाने या कोरोना साथीत सगळ्यात जास्त भरडला गेला पत्रकार वर्ग. विशेषतः जिल्ह्यातील, गावखेड्यातील बातमीदारी करणारे पत्रकार हे असंघटीत कामगारांसारखे असंरक्षित असतात. अल्पवेतन आणि जादा काम करणारे राज्यातील असंख्य बातमीदार आणि त्यांचे कुटुंबीय या संसर्गजन्य आजाराने शब्दशः जीवनातून उठलेले दिसताहेत. मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एस एम देशमुख, किरण नाईक आणि त्यांचे सारे सहकारी गेल्या वर्षभरात या बातमीदारांना, पत्रकारितेतील शिलेदारांना मदत करण्यासाठी झटताहेत. मंगेश चिवटे, संतोष आंधळे आदी मंडळी आरोग्यदायी सेवा पुरवताना जीवापाड कष्ट घेत आहेत. काही जिल्ह्यातील पत्रकार संघटना अन्नधान्याची, औषधोपचाराची मदत करण्यासाठी धडपडताहेत. एस एम देशमुख यांनी आजवर कोविद-19 च्या संसर्गामुळे मरण पावलेल्या महाराष्ट्रातील 95 पत्रकारांची यादी फोटो आणि माहितीसह प्रसिद्ध केली आहे. या सर्व पत्रकारांना “फ्रंटलाईन वर्कर्स” म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने अर्थ सहाय्य द्यावे अशी मराठी पत्रकार परिषदेची मागणी आहे. त्याला महाराष्ट्रातील सर्वपक्षीय आमदार-खासदारांनी पाठिंबा दिला पाहिजे. या मागणी सोबत पत्रकारांना कोविद-19 ची लस देणं, गरज लागलीच तर वैद्यकीय मदतीची हमी देणं आणि सोबत आर्थिक सहाय्य मिळालं, तर राज्यातील पत्रकार या साथीच्या आजाराचा चांगल्या पध्दतीने मुकाबला करू शकतील यात शंका नाही… याचा फक्त सरकारने नाही तर सर्व नागरिकांनी देखील सहानुभूतीने विचार केला पाहिजे.
गेल्या काही वर्षात, विशेषतः, सोशल मिडियाच्या उदयानंतर लोकशाहीतील चारही खांब चर्चेचा आणि चिकित्सेचा विषय बनले. त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त टीकेचा विषय बनला पत्रकारितेचा चौथा स्तंभ. काही अपवाद वगळता हे क्षेत्र सर्वाधिक असंरक्षित, असंघटीत आणि अस्थिर असल्याने कोणीही यावे आणि पत्रकारांना टपली मारून जावे हा जणू पायंडा बनला. गल्ली आणि दिल्लीतील काही सोईची, सवयीची नावे उगाळत हळूहळू ही टीका गलिच्छ टिंगलीच्या पातळीवर गेली… आणि स्वातंत्र्य पूर्वकाळात लोकांना जागं करणारी आणि त्या नंतर प्रत्येक आणीबाणीच्या प्रसंगी जीवावर उदार होऊन लढणारी पत्रकारिता लोक सहजपणे विसरून गेले. जर तुम्ही वृत्तपत्र वाचत असाल, वृत्त वाहिनी किंवा वेबसाईट घरात बसून पहात असाल तर तुम्ही पत्रकारितेचे तुमच्या जीवनात योगदान नाही, असे कसे म्हणता?
दंगल असो वा दुष्काळ, मोर्चा असो वा महापूर , लाठीमार असो वा अश्रुधूर…
रस्त्यावर उभा असतो पत्रकार…
कोणत्याही संरक्षणाशिवाय, आयुधाशिवाय…
जर लोकांना हे रस्त्यावर लढणारे आणि लढता लढता मरणारे पत्रकार नकोसे झाले असतील, तर सरकार तरी पत्रकारांचा आक्रोश का ऐकेल… हा आजचा महत्वाचा प्रश्न आहे. सरकारवरचा अंकुश हतबल, दुबळा होणं हे शासकीय व्यवस्थेसाठी लाभदायक असतं. आम्हा जनतेसाठी नाही… हे त्रिकालाबाधित सत्य विसरून कसं चालेल?
काल असंख्य बातम्यांच्या गदारोळात “होम क्वारंटाइन असलेल्या सोलापुरातील तरुण पत्रकाराची आत्महत्या” ही मन अस्वस्थ करणारी बातमी वाचली आणि गेल्या वर्षात कोरोनामुळे निधन पावलेले माथेरानचे संतोष पवार, पुण्यातील पांडुरंग रायकर अशी अनेक नावं डोळ्यासमोर उभी राहिली. मग अगदी नराहवुन हे सगळं लिहावंसं वाटलं… पत्रकार हे सुद्धा तुमच्या-आमच्या सारखेच असतात, खरंतर तुमच्या- आमच्यातलेच असतात, हे सांगावंसं वाटलं…
अवघ्या पस्तीशीचा प्रकाश जाधव हा तरुण पत्रकार होता. ज्या वयात आपल्या भविष्याचा विचार करावा, स्वप्ने पहावी, त्या वयात तो निराश , हताश झाला होता. प्रकाशने हाताची नस कापून आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली . प्रकाश हा सोलापूर शहरातील सुशीलनगरमध्ये राहत होता. पत्रकारितेचा कोर्स पूर्ण केल्यानंतर त्याने काही नामवंत दैनिकात काम केले होते. सध्या तो घरीच होता. दोन दिवसांपूर्वी वडील करोनाचे बळी ठरले. पोलीस असलेला भाऊ करोना पॉझिटिव्ह आला. आई करोनावर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे…स्वत: प्रकाशने रेमडेसिविर इंजेक्शन मिळण्यासाठी अनेक फेऱ्या मारल्या होत्या. मात्र, हे इंजेक्शन त्याला मिळाले नव्हते… एकुणच सगळी परिस्थिती गर्द काळोखी. मन अस्वस्थ करणारी, भितीदायक बनली होती … पण म्हणून काय तिने प्रकाश गिळून टाकावा? आणि तुम्ही आम्ही ते मुकाट्याने पहात बसायचे की परिस्थितीवर मात करायची ? संत तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचं तर, “भयाचिया पोटी, दुःखाचिया रासी “, म्हणून भीतीची नकारात्मक धास्ती दूर करून आपल्याला हे दुःख संकट दूर करायचं आहे…

  • #महेश_म्हात्रे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here