प्रथमच झाला..सन्मान जिल्हा दैनिकांचा .. 

कृषीवल,प्रजावाणी,संचार,ललकार,हिंदुस्थान

गावकरी,शिवनेर,चंपावतीपत्र,लहुतरंग सन्मानित 

उत्कृष्ठ कार्याबद्दल पत्रकारांचे सन्मान होतात,त्यांना पुरस्कार दिले जातात.दैनिकांचं मात्र असं कौतूक कोणी करीत नाहीत.महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात गेली पन्नास पन्नास वर्षे काम करणारे आणि आपल्या भागाच्या विकासात,जडणघडणीत मोलाचा सहभाग नोंदविणारी अनेक जिल्हा आणि छोटी दैनिकं आहेत.त्यांनी आपल्या तुटपुंज्या साधनांच्या बळावर लोकांचे प्रश्‍न वेशिवर टांगले,अन्यायअत्याचारांच्या विरोधात आवाज उठविला,आणि सामाजिक प्रश्‍नांवर लोकचळवळी उभ्या करून त्याचं नेतृत्वही केलं.तथापि त्यांच्या या कार्याची नोंद कोणी घेतली नाही.आजही घेतली जात  नाही.मराठी पत्रकार परिषदेनं मात्र छोटया आणि मध्यम तसेच जिल्हा पत्रांच्या उल्लेखनिय कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित करण्याचा अनोखा कार्यक्रम नुकताच घेतला.प्रत्येक विभागातून एक अशा प्रकारे नऊ महसूल विभागातून नऊ दैनिकांची नावे सर्वांशी चर्चा करून नक्की केली.1 सप्टेंबर 18 रोजी त्यांच्या मालक किंवा संपादकांचा औढा नागनाथ येथील मेळाव्यात सन्मान केला गेला.महाराष्ट्रात दैनिकाच्या सन्मानाचा कार्यक्रम प्रथमच घेतला  जात असल्यानं माध्यमातील सर्वाचं लक्ष या अनोख्या कार्यक्रमाकडं होतं.कार्यक्रमासाठी बहुतेक दैनिकांचे मालक-संपादक उपस्थित होते.पन्नास-साठ वर्षांच्या सेवेनंतर राज्यातील 80 वर्षांची जुनी पत्रकार संघटना आपली दखल घेतेय याचा आनंद संपादक-मालकांच्या चेहर्‍यांवर नक्कीच दिसत होता.त्यांच्या कार्याला साजेसा सन्मान केला गेला.हा उपक्रम आता प्रत्येक वर्षी चालू ठेवला जाणार असून दैनिकांप्रमाणेच जुन्या आणि प्रतिष्ठीत साप्ताहिकांच्या मालक – संपादकांचा सन्मान करण्याचा निर्णय मराठी पत्रकार परिषदेने घेतला आहे.कोणी तरी आपल्या कार्याची दखल घेतंय आणि आपल्या पाठीवर शाबासकीची थाप मारतंय ही जाणीव नक्कीच लाख मोलाची आहे.छोटी आणि मध्यम वृत्तपत्रे बंद करण्याचा अट्टाहास सरकार करीत असताना मराठी पत्रकार परिषदेच्या या उपक्रमामुळं छोटया आणि मध्यम वृत्तपत्रांना बळ मिळणार आहे.ते सरकारी नीतीच्या विरोधात पुन्हा एकदा खंबीरपणे उभे राहण्यास सज्ज होणार आहेत.

ज्या नऊ दैनिकांचा सन्मान केला गेला त्यांची नावे.

कोकण विभाग ः कृषीवल

1933 मध्ये रायगड जिल्हयातील चरी येथे शेतकर्‍यांचा संप सुरू झाला.कृषीवल हे या संपाचं अपत्य.शेती मालकांच्या ताब्यातील दैनिकातून शेतकर्‍यांच्या संपाच्या विरोधात आग ओकली जात असल्यानं त्याला पृत्यूत्तर देण्यासाठी नारायण नागू पाटील यांनी 7 जून 1937 रोजी कृषीवल सुरू केले.आज हे दैनिक 82 वर्षांचे झाले आहे.चळवळीतून जन्माला  आलेल्या कृषीवलनं लोकहिताच्या अनेक चळवळी लढल्या..प्रसंगी त्याचं नेतृत्व केलं.अलिकडं सेझ विरोधी लढा,रेवस-मांडवा विमानतळ विरोधी लढा तसचे मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी पत्रकारांनी उभ्या केलेल्या चळवळीत मोठं योगदान कृषीवलनं दिलं आहे.या कार्याचं स्मरण ठेवत परिषदेनं कृषीवलचा सन्मान केला.कृषीवलचे विद्यमान संपादक प्रसाद केरकर यांनी हा सन्मान स्वीकारला.कृषीवलच्या संचालिका सौ.सुप्रिया पाटील यांनी मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्षपदही भूषविलेले आहे.

मराठवाडा विभागः प्रजावाणी 

अनंत भालेराव यांच्या दैनिक मराठवाडा आणि सुधाकरराव डोईफोडे यांचा प्रजावाणी ही दोन दैनिकं मराठवाड्यातील चळवळीचा हिस्सा बनलेली आहेत.पैकी मराठवाडा आज बंद पडले असले तरी प्रजावाणी मात्र त्याच तडफेनं चळवळीचं नेतृत्व करताना दिसतो आहे.1 जून 1962 रोजी प्रजावाणी सुरू झालं.आरंभी साप्ताहिक,अर्धसाप्ताहिक आणि आता पूर्ण आकारातील दैनिक असा प्रजावाणीचा प्रवास झाला.मराठवाड्यातील रेल्वेचा प्रश्‍न,भाडेवाढ,मराठवाडा विकास आंदोलन,भूमीमुक्ती,आदि प्रश्‍नावर प्रजावाणीनं आवाज उठविला.संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातही प्रजावाणी सहभागी झाले होते.नांदेडच्या जडणघडणीत प्रजावाणीचा मोठा वाटा आहे.विद्यमान संपादक शंतनू डोईफोडे यांनी प्रजावाणीचा सन्मान स्वीकारला.

पुणे विभाग  ः संचार

दैनिक संचार आणि रंगाअण्णा वैद्य हे सोलापूरकरांच्या अस्मितेचा विषय आहेत.संचारनं सोलापूर जिल्हयातील अनेक प्रश्‍नांना वाचा फोडली.कॅपिटेशन फी विरोधी लढा असो,मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरचा प्रश्‍न असो भीमा पाणी पुरवठ्याचा विषय असो,कोरडवाहू शेती विकासाचा प्रश्‍न असो ,सोलापुरातील विडी कामगारांचे प्रश्‍न असोत की,सोलापूरच्या विकासाकडं राज्यकर्ते करीत असलेल्या दुर्लक्षाचा विषय असो.. संचारनं नेहमीच आक्रमक भूमिका घेत हे प्रश्‍न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला.बिहार प्रेस बिलाच्या विरोधात रंगाअण्णा वैद्य यांची भूमिका आणि त्यांनी केलेलं या आंदोलनाचं नेतृत्व हे राज्यातील पत्रकार कधीच विसरू शकणार नाहीत.रमण गांधी आणि आप्पासाहेब काडादी यांच्या मदतीनं रंगाअण्णा वैद्य यांनी 13 ऑक्टोबर 1961 रोजी संचार सुरू केले.

कोल्हापूर विभागः ललकार

नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं.स्वातंत्र्य संग्रामात देशभक्तीचं वारं अंगात संचारलेली तरूणाई स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपल्या आशा-आकांक्षा विविध माध्यमातून पूर्ण करायला संज्ज झाली होती.बापूराव खराडे हे त्यापैकीच एक.लोकांना न्याय मिळवून द्यायचं एक माध्यम म्हणून बापूसाहेब द.खराडे यांनी 22 मार्च 1954 रोजी ललकार सुरू केले.सांगली परिसरातील जनतेच्या अनेक प्रश्‍नांना ललकारने वाचा फोडली.अन्यायाविरूध्द ओढलेल्या आसूडांनी अनेकजण घायाळ झाले.अनेकांची झोप उडाली.त्यातूनच 9 जानेवारी 1974 रोजी बापूसाहेब खराडे यांच्यावर अ‍ॅसिड हल्ला केला.त्यानंतरही ललकार थांबला नाही.अनेक संकटावर माती करीत,आधुनिकतेची कास धरत ललकारनं लोकांच्या प्रश्‍नांशी भिडण्याचा आपला वसा चालूच ठेवला.विद्यमान संपादक सुभाष खराडे यांनी ललकारच्यावतीने सन्मान स्वीकारला.

अमरावती विभागः दैनिक हिंदुस्थान

मोठ्या कष्टानं मिळविलेल्या स्वातंत्र्याचं सुराज्य करावं अशा भावनेनं समाजमन घडविण्यासाठी बा.वि.तथा बाळासाहेब मराठे यांनी 15 ऑगस्ट 1950रोजी अमरावती येथून साप्ताहिक हिंदुस्थान सुरू केलं.त्यानंतर गेली 65-70 वर्षे हिंदुस्थान अमरावती परिसरातील विविध प्रश्‍ना भिडत राहिले.अनेक जनआंदोलनात हिंदुस्थाननं बिनीचा शिलेदार म्हणून काम केले.कृषी विद्यापीठाच्या निर्मितीसाठीचे आंदोलन असो,अमरावती विद्यापीठासाठीचा लढा असो किंवा अप्पर वर्धा धरणातून अमरावतीला पाणी पुरवठा करण्याचा प्रश्‍न असो हिंदुस्थानने याबाबत निर्णायक भूमिका बजावली.शिवाजीराव पटवर्धन यांच्या कुष्ठरोगी पुनवर्सन चळवळीस हिंदुस्थानचा पाठिंबाच होता असं नाही तर या चळवळीस होईल तेवढी मदत हिंदुस्थाननं केली आहे.हिंदुस्थानवर अनेक संकंटं आली.एकदा हिंदुस्थानच्या प्रेसला आगही लागली.हिंदुस्थान प्रत्येक अग्निदिव्यातून तावून सुलाखून निघाले.नाशिक विभाग ः गावकरी

लोकशिक्षण,समाजाची सर्वांगिण प्रगती,गांधीजींच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार आणि सामाजिक कार्याच्या प्रसारासाठी दत्तात्रय तथा दादासाहेब पोतनीस यांनी 1 जानेवारी 1938 रोजी मालेगाव येथून साप्ताहिक गावकरी सुरू केले.1947 मघ्ये गावकरी दैनिक झाले.त्यानंतर अमृत आणि रसरंग ही गावकरीची भावंडंही सुरू झाली.मराठवाड्यातून 3 डिसेंबर 1958 मध्ये अजिंठा सुरू झाले.संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत गावकरीची भूमिका महत्वाची ठरली.नाशिकच्या विकासाच्या प्रश्‍नांवर गावकरीनं निर्णायक भूमिका घेतली.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ निर्मितीसाठी गावकरीनं सातत्यानं पाठपुरावा केला.नाशिक सहकारी साखर कारखाना देखील गावकरीच्या पाठपुराव्याचं फळ आहे.मराठी पत्रकार परिषदेच्या चळवळीत गावकरीचं मोठं योगदान आहे.दादासाहेब पोतनीस हे मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्षही होते.

मुंबई विभाग ः शिवनेर

मुंबईत भांडवलदारी वृत्तपत्रांच्या भाऊगर्दीत जी हाताच्या बोटावर मराठी माणसांनी सुरू केलेली वृत्तपत्रे आपलं अस्तित्व आणि तेज टिकवून आहेत त्यात शिवनेरचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल.सर्वसामांन्यांचा बुलंद आवाज असं ब्रिदवाक्य घेऊन चालणार्‍या शिवनेरनं खरोखरचं सामांन्यांच्या अनेक प्रश्‍नांना वाचा फोडली.कामगारांचे लढे,स्थानिक भूमीपूत्रांच्या हक्काचे लढे,संयुक्त महाराष्ट्रचा लढा, असो नाहीतर वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठीची चळवळ असो शिवनेरनं हे सारे विषय हाती घेऊन ते निर्धाराने सोडविण्याचा प्रयत्न केला.विश्‍वनाथराव वाबळे यांनी 1955 ला शिवनेरला जन्म दिला तेव्हा पासून आजपर्यंत शिवनेर सामांन्यांचे हत्यार बनून लढत राहिले.त्यामुळंच स्वतः यशवंतराव चव्हाण यांनी शिवनेरचा गौरव करताना मला टाइम्स ऑफ इंडिया काय म्हणतोय यापेक्षा शिवनेर काय बोलतंय हे तपासणे महत्वाचे वाटते असे उद्दगार काढले होते. संपादक नरेंद्र वाबळे हे मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष असून वृत्तपत्रीय चळवळीत त्यांचा मोलाचा सहभाग असतो.

औरंगाबाद विभागः चंपावतीपत्र

मराठवाड्यातील सर्वात मागास जिल्हा अशी बीडची ओळख.ऊस तोडणी कामगारांचा जिल्हा म्हणूनही बीड ओळखला जातो.सारा जिल्हाच मागास असल्यानं प्रश्‍नांची व्याप्ती देखील तेवढीच मोठी.चंपावतीपत्रं हे सारे प्रश्‍न आपले समजून सामांन्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न केले.स्वभाव सौम्य असला तरी चंपावतीपत्रंनं जिल्हयातील अनेक प्रश्‍न हाताळले.ते वेशिवर टांगले.नामदेवराव क्षीरसागर यांनी 26 जानेवारी 1966 रोजी चंपावतीपत्र सुरू केलं. चंपावतीपत्रंनं बीड जिल्हयाचं मुखपत्र असा नावलौकिक प्राप्त करीत भांडवलदारी वृत्तपत्रांच्या आक्रमणाला निर्धारानं तोंड देत आपलं अस्तित्व आणि प्रभाव टिकवून ठेवला आहे.स्वतः नामदेवराव क्षीरसागर यांनी औढा नागनाथ येथे उपस्थित राहून हा पुरस्कार स्वीकारला.

नागपूर विभाग ः लहू तरंग

नागपूर परिसरातील जुने दैनिक आहे.चळवळीशी नातं सांगणारं हे दैनिक सतत जनसामांन्यांचे प्रश्‍न घेऊन लढताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here