परभणीत माध्यमांवर दहशत निर्माण कऱण्याचा प्रयत्न,
पेपर फुटीची बातमी छापली म्हणून दोन पत्रकारांवर गुन्हे
परभणी ः माध्यमांचा आवाज बंद करण्याचा कसा पध्दतशीर आणि प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहे याच्या गेल्या दोन दिवसात घडलेल्या दोन घटनांबद्दल मी आपणासर्वांना अवगत करणार आहे.पहिली घटना आहे परभणीची.दहावी-बारावीच्या परीक्षेतली पेपरफुटी ही खरं तर आता बातमी राहिलेली नाही.ती नित्याची गोष्ट आहे.त्यामुळं ‘कॉपीचा सुळसुळाट’ अशा अर्थाच्या बातमीनं कुणाचा माथेशूळ उठण्याचं खरं तर कारण नाही.पण तो उठतो आहे यामागे समाजात ज्या वाईट घटना घडताहेत त्याची नोंंद माध्यमांनी घेऊ नये त्याकडं दुर्लक्ष करावं नाहीतर तुमचा बंदोबस्त असा इशारा देण्याचा प्रयत्न असतो.
14 मार्च रोजी दहावीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाचा पेपर होता.पेपर सुरू होण्यापुर्वीच तो व्हायरल झाला.त्याबाबतची माहिती पत्रकारांनी शिक्षणाधिकार्यांना दिली,दुसर्या दिवशी त्याची बातमीही दिली.मात्र बातमी प्रसिध्द झाल्यानंतर परभणीच्या दोन पत्रकारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे.समाजातील अपप्रवृत्तीच्या विरोधात सत्य बातमी दिल्याची शिक्षा पेपर व्हायरल कऱणार्यांना नव्हे तर पत्रकारांना देण्याचा प्रयत्न होतो आहे.
15 मार्चच्या लोकमतमध्ये आणि पुण्यनगरीमध्ये बातमी प्रसिध्द झाली.यामुळं स्वाभाविकपणे शिक्षण विभागाचं पितळ उघडं पडलं.त्यातून शिक्षण विभागानं लोकमतचे अभिमन्यू कांबळे आणि पुण्यनगरीचे दत्ता लाड यांच्यावरोधात 15 मार्च रोजी नवा मोढा पोलिसात तक्रार दिली.त्या तक्रारीवरून दोन्ही पत्रकारांच्या विरोधात कलम 5(1) ,5 (2) म.वि.गैर.प्र.कायदा 1982 व कलम 72 नुसार शहानिशा न करता बातमी छापल्याबद्दल गुन्हा दाखल केला गेला.वास्तविक जे वृत्त प्रसिध्द झाले होते ते पूर्णपणे शहानिशा करून,सत्यता पडताळून पाहूनच प्रसिध्द केले गेले होते.तरीही माध्यमांनी जे काही गैरकृत्य चालू आहेत त्याकडं दुर्लक्ष करावे या जाणिवेतून हे गुन्हे दाखल केले गेले आहेत.वास्तविक पेपर व्हायरल कोणी केला याची चौकशी करून त्याच्याविरोधात गुन्हे दाखल होऊन त्याना अटक करणे अपेक्षित असताना चोर सोडून पत्रकारांना अडविण्याचा प्रयत्न होत असेल तर ते निषेधार्थ आणि संतापजनक आहे.राज्यातील पत्रकार ही दादागिरी सहन करणार नाहीत हे संबंधितांनी लक्षात ठेवावे.
पत्रकार गुन्हे दाखल झाले याचा प्रथमतः निषेध करतो.