पुष्प शर्मा  हे नाव कालपर्यंत कोणाला माहिती असण्याचं कारण नव्हतं.ते कोब्रापोस्ट या वेबसाईटसाठी काम करतात.शोध पत्रकार म्हणून त्यांचा नावलौकिक आहे.विविध विषयांवरची स्टिंग करून अनेकांना त्यांनी नागडं केलेलं आहे.अलिकडंच त्यांनी ‘आली रं आली आता तुझी बारी आली’ म्हणत मिडिया हाऊसेसलाच नागडं केलं.खरा चेहरा जगासमोर आणला.पुप्प शर्मा यांच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये भारतातील अनेक माध्यम समुहाच्या उच्चपदस्थ अधिकार्‍यांनी वृत्तवाहिनी किंवा वृत्तपत्रातून पैसे घेऊन हिंदुत्व अजेंडा मांडण्याचे आश्‍वासन दिल्याचे समोर आले.

या स्टिंग ऑपरेशनमुळं माध्यमांची नाचक्की झाली.मात्र नेटकर्‍यांनी पुष्प शर्मा यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला.त्याचं तोंडभरून कौतूक केलं.त्यांना मिळत असलेली देशव्यापी प्रसिध्दी पाहून त्यांचे विरोधक आणि त्यांच्यामुळं ज्यांचे हितसंबंध दुखावले अशी मंडळी देखील सक्रीय झाली.या स्टींग नंतर त्यांचा इतिहास खोदून काढला जात आहे.त्यांना बदमाश,खंडणीखोर ठरवून या स्टिंगमधील हवाच काढून घेण्याचा यामागे प्रयत्न असू शकतो.2009 मध्ये पुप्प शर्मा यांनी एका पोलिस अधिकार्‍याचे स्टिंग केले होते.त्या पोलीस अधिकार्‍याकडे त्यानी खंडणी मागितल्याचा आरोप केला गेला होता.या आरोपावरून त्यांना 17 नोव्हेंबर 2009 रोजी अटक केली गेली होती.2016 मध्येही त्यांच्यावर माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीत फेरफार केल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.एखादी बातमी प्रसिध्द केली किंवा त्याची माहिती जमा केली की,अशा पत्रकाराच्या विरोधात खंडणी,विनयभंग,शासकीय कामात अडथळे किंवा अ‍ॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्याची गेली काही वर्षे प्रथा झालेली आङे.महाराष्ट्रात गेल्या वर्षी अशा 29 पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल केले गेले होते.यावर्षी ही संख्या 9 एवढी आहे.पुप्प शर्मा यांच्यावरही अशाच स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत.

या आरोपांबाबत स्वतः पुष्प शर्मा यांनी तर काही प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र कोब्रापोस्टचे संपादक अनिरूध्द बहल यानी शर्मा यांची प्रतिमा मलिन करम्यासाठी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले गेले होते असा दावा केला आहे.2009 नंतर त्यानी विविध माध्यम समुहात काम केले होते.मात्र त्यांच्या पत्रकारितेत त्यांना शंकास्पद असे काहीही आढळले नसल्याचे बहल याचं म्हणणं आङे.

माध्यमांच्या विरोधात स्टिंग झाल्यामुळं माध्यम समुहांची प्रतिमा अधिकच मलिन झाली आहे.माध्यमांकडं बघण्याचा समाजाचा दृष्टीकोण आता बदलला आहे.सुदैव एवढेच की,या स्टिंगमध्ये एकही पत्रकार सापडलेला नाही.सारे मालक किंवा कंपनीचे वरिष्ठ अधिकारीच शर्मा यांच्या कॅमेर्‍यात कैद झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here