नवी मुंबई येथील पत्रकार मित्र विकास महाडिक यांनी मराठी

पत्रकार परिषदेबददल व्यक्त केलेल्या भावना

———————————————————————————
एस एम सर नमस्कार
आज अधिवेशना बाबत आपल्या भावना वाचल्या। तसेच आपले अध्यक्षीय भाषणही त्याच दिवशी वाचले। असे म्हणतात माणसाचा स्वभाव त्याच्या लिखाणातून, बोलण्यातून, वागण्यातून, आणि सही वरून समजतो। तुम्ही लिहिलेली प्रामाणिक भावना त्यामुळे शंभर नंबरी खरी वाटते। मला अधिवेशनाला शनिवारी सकाळी यायचं होतं पण शुक्रवारच्या रात्रीची ट्रेन मिस झाली। त्यामुळे सकाळची गीतांजली पकडून मी दुपारी तीन वाजता अधिवेशनाला पोहचलो। का केला मी इतका आटापिटा कारण मला ओढ आहे चांगल्या पत्रकार मित्रांच्या भेटी गाठीची। तशीच ओढ प्रेम जिव्हाळा होता तेथे आलेल्या सर्व पत्रकरामध्ये। त्यामुळे हे अधिवेशन यशस्वी झाले। आपण ह्या कार्यक्रमाला अधिवेशन म्हणत असलो तरी ते एक स्नेहसंमेलन होते। एक कुंभमेळा होता। पत्रकराचा। मला तुमच्या बीडचे एक 79 वर्षाचे पत्रकार काका भेटले। सर्व मानमरातब वय विसरून ते आपल्या मुलाबरोबर खाली बसून जेवत होते। मीही त्यांच्या शेजारी बसून जेवत होतो। आमच्या चांगल्या गप्पा सुरु होत्या। अधिवेशनबाबत भरभरून बोलत होते। त्यांची तिसरी पिढी पत्रकरतेत आहे। विशेष म्हणजे त्यांचा नातू पण सोबत होता। मला वाटतं हे अधिवेशनाचे फलीत आहे। अधिवेशनाचे आयोजन आणि नियोजन उत्तमच होते। ग्रामीण पत्रकराची दिशा आणि दशा। शेतकऱ्याकडे मिडिया चा कानाडोळा होतोय का हे परिसंवाद तर कार्यक्रमाची जाण होती। प्रशांतच्या कवी टीमने तर मन जिकली। हसण्याचा प्रयोग तर अप्रतिम ।मुंबईतील हाय प्रोफाइल पत्रकारांनी हे सवांद तरी किमान ऐकायला ( बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण ऐकायला काँग्रेस वाले लपून जात होते तसे तुमच्यावर टीका करणाऱ्या पत्रकरांनी हा कार्यक्रम लपून पहिला असता तरी चालला असता) हवे होते। म्हणजे अधिवेशनात काय मिळाले ते कळले असते। तुम्हाला कदाचित माहीत असेल शेगाव देवस्थानाला जाणे येऱ्या गबल्याचे काम नाही। तिथे फक्त सच्ची माणसे जाऊ शकतात। म्हणूनच मंत्री संत्री ह्या जागृत देवस्थानचे दर्शन घेणे टाळतात। राज्यात देवस्थान असावे तर असे। ह्या अधिवेशनाच्या निमित्ताने पत्रकारांनी श्री गजानन महाराज्यांचे दर्शन पण घेतले। येण्या जाण्याचा खर्च आणि दोनशे रुपयांत भोजन व निवास व्यवस्था दर्शन शक्य न्हवती पण ती बुलढाणा पत्रकार संघा मुळे शक्य झाली। सर कसे आहे ना। करणी आणि कथनी मध्ये जमीन असमानचा फरक असलेले पत्रकार ह्या राज्यात पोत्याने आहेत। आपली परिषद म्हणजे पंढरपूरचा विठुराया आहे। त्यात सामील होणारे पत्रकार वारकऱ्यां सारखे आहेत। त्यामुळे दरवर्षी ते ह्या एकादशीला येणारच। ह्याच्या उलट काही बड्या पत्रकराचा देव तो तिरुमल्ला चा तिरुपती आहे। स्वखर्चाने किव्हा कोणीतरी काढून दिलेल्या विमान रेल्वे तिकिटावर आपले बांधव दर्शन घेत असतात। त्यामुळे आपण आपली एकादशी दरवर्षी साजरी करत राहू। राहिला विषय तुमच्या अध्यक्ष पदाच्या मुदत संपण्याच्या तर माझ्या सारख्या अनेक वार्ताहरची इच्छा आपणच त्या पदावर कायम राहा। जंतरमंतर मैदानावर आंदोलन करणारे जर राज्यपाल मुख्यमंत्री होत असतील तर तुम्ही का नाही राहू शकत तह्यात अध्यक्ष। पत्रकार जात म्हणजे सर्वात शहाणी जात समजली जाते ( स्वतःच ते तसे समजतात) त्यांना एकत्र आणण्याचे काम तुम्ही करत असाल तर हया पदाचे हकदार तुम्हीच आहात। सध्या प्रत्येक जाती पातीच्या नावाने चांगभलं सुरू आहे। पत्रकारही ह्याच समाजातील घटक आहे। त्याच्यासाठी कोणी काही करत असेल तर सकारात्मक लोकांनी त्यांच्यामागे उभे राहिलेच पाहिजे। तुम्ही ते कार्य करताय। म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोंत। तेव्हा ह्या लष्कराच्या भाकऱ्या तुम्हीच भाजाव्यात। असे वाटते। राहता राहिला प्रश्न तुमच्या टिकाकारांचा ते टीका करतायेत हीच तुमच्या कामाची पोचपावती आहे। टीका काय देवावरही होते। ती सहन करण्याची ताकद तुम्हाला गजानन महाराज्यानी परवा दिली आहे। तुमच्या चांगल्या कामाला आमची नेहेमीच साथ आहे आणि राहील। ह्या जगात दोन प्रकारची माणसे आहेत एक सकारात्मक आणि दुसरी नकारात्मक। नकारात्मक माणसे तुम्ही कितीही चांगले करा ते तुमच्या कामात खोट काढणारच। त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका। आपला कारवा पुढे नेत राहा। आणि हो तो काय फ़ंड वैगरे जमा करण्याचा विचार तुम्ही करताय। तो थोडा बाजूला ठेवा। त्यात अपेक्षा भंगाचे दुःख जास्त आहे। पत्रकारांच्या स्थानिक संस्था हा विषय चांगल्या प्रकारे हाताळतात। दुसरी गोष्ट काही पत्रकारावर तुम्ही कितीही उपकार करा ते उफरटेच असतात। काय झाले केले तर उपकार ? आम्ही पण आंदोलनात हजेरी लावली होती। कोणाकडून घेऊनच दिले ना। खिशातील दिले का अशी ह्या पत्रकारची नंतर भाषा असते। तेव्हा हा बुमरँग होणारा खेळ खेळू नका। बाकी तुमची मर्जी। मी ह्या मदतीचा अनुभव घेतला आहे तुम्ही ही घेतला असेल। शासनाकडून मदत मिळवून देण्याचे कार्य योग्य आहे। तूर्त एवढेच।
-आपला
*विकास महाडिक, नवी मुंबई*

LEAVE A REPLY