मुंबई मराठी पत्रकार संघ ही मुंबईतील जुनी,प्रतिष्ठीत आणि लोकमान्य पत्रकार संघटना…किमान ती तशी पूर्वी होती.आरंभीच्या काळात मुंबईच्या जडणघडणीत ज्या व्यक्ती,संस्थांनी योगदान दिलं होतं त्यात मुंबई संघाचा वाटा वाखाणण्याजोगा होता.संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो,सीमा प्रश्‍न असो की, कामगार आणि पत्रकारांच्या हक्काचे लढे असोत मुंबई संघाच्या भूमिकेकडं सार्‍याचं लक्ष असायचं.पत्रकारितेवर जेव्हा जेव्हा राजकारण्यांनी हल्ले केले तेव्हा तेव्हा मुबई संघानं आक्रमकपणे हे हल्ले परतवून लावण्यासाठी प्रयत्न केले.आणीबाणी असेल किंवा नंतरचं बिहार प्रेस बिल असेल मुंबई संघानं त्या विरोधात रान उठविलं.सामाजिक बांधिलकी जपत मुंबई संघानं जनसामांन्यांशी निगडीत इतरही विषय हाताळल्याने सरकार दरबारी संघाचा जसा दबदबा होता तव्दतच पत्रकारांमध्येही संस्थेविषयी  आपलेपणा आणि आदरभाव होता..याचं कारण अनेक ध्येयवादी पत्रकार संघांचं नेतृत्व करीत होते.’संघ ही आपली खासगी मालमत्ता आहे’ अशी त्यांची कधीच भूमिका नव्हती.आपण या संस्थेचे विश्‍वस्त आहोत आणि संघ भक्कम करीत संघाची अप्रतिष्ठा होणार नाही याची काळजी घेणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे या जाणिवेतून ते काम करीत.कोणतेही व्यक्तीगत हितसंबंध किंवा रागलोभ संघाच्या कार्यात आणले जात नसल्यानं सर्वांना बरोबर घेऊन,पारदर्शक कारभार करीत संघाचं संचालन केलं जायचं.हा झाला इतिहास।  साधारणतः 2000च्या आसपास चुकीच्या टोळक्यानं संघावर ताबा मिळविला आणि मुंबईतील पत्रकारांची ही संस्था ‘प्रायव्हेट लिमिटेड’  करून टाकण्याचा प्रयत्न सुरू झाला.या टोळक्यानं पहिलं काम काय केलं असेल तर संघाची पत आणि प्रतिष्ठाच लयाला घातली.संघ हा गप्पांचा,कारस्थानाचा अड्डाच करून टाकल्यानं साधनशूचिता बाळगणार्‍या पत्रकारांनी संघांत येणंच बंद केलं.बिनकण्याच्या लोचट लोकांचा तिथं वावर दिसू लागला.लोकचळवळीचं हे केंद्र चळवळींपासून एवढं दूर गेलं की,आपला उद्देशच हा संघ विसरून बसला.मधल्या काळात पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली राज्यातील पत्रकारांच्या हक्काची चळवळ राज्यभर जोरात सुरू होती.प्रसाद मोकाशी अध्यक्ष असताना मुंबई संघातच समितीची स्थापना झाली होती.प्रसाद मोकाशी जोपर्यंत अध्यक्ष होते तोपर्यंत सर्व प्रकारचे सहकार्य समितीला मिळायचे.मात्र सत्तांतर झालं आणि पत्रकारांच्या हक्काच्या चळवळीशी आपला संबंधच नाही अशी भूमिका घेत ही चळवळ मोडून काढण्याचा चंगच नंतरच्या पदाधिकार्‍यांनी बांधला.एक प्रसंग तर असा आला की,पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने रितसर पैसे भरून पत्रकार परिषदेसाठी हॉल बुक केला.दोन वाजता पत्रकार परिषद होती,एक वाजता संघातून आम्हाला फोन आला आणि तुमचं बुकिंग रद्द केल्याचं आम्हाला सांगितलं गेलं.(त्याच्या पावत्या आम्ही आजही सांभाळून ठेवल्या आहेत).बुकिंग का रद्द केलंत ? हे विचारायला किरण नाईक पत्रकार संघात गेले तेव्हा अध्यक्ष देवदास मटाले यांनी सांगितलं की,’आम्हाला वरून तश्या सूचना आहेत’.देवदास मटाले अध्यक्ष असताना वरून सूचना करणारी ही शक्ती कोण होती हे सर्वांना माहिती आहे.नंतर आमची कमालीची धावपळ उडाली हा विषय नंतर भरतकुमार राऊत यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत उपस्थित करून पदाधिकार्‍यांची चांगली हजामत केली .मात्र त्यानंतरही काही फरक पडला नाही.

पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती स्थापन झाली तेव्हा मुंबई संघ या समितीत होता.राज्यातील अन्य बारा संघटनांचाही त्यात समावेश होता.असं असतानाही एका कार्यक्रमात निखिल वागळेंच्या उपस्थितीत देवदास मटाले यांनी आम्ही स्वतंत्र पत्रकार हल्ला विरोधी कृती स्थापन करणार आहोत अशी घोषणा केली होती.एखादी संस्था निर्माण करणं,ती सचोटीनं चालविणं आणि ती लोकाभिमूख करणं हे आत्मकेंद्री व्यक्तींना शक्य नसतं.त्यामुळं आणखी एक पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती स्थापण्याची मटाले यांची घोषणा कधी प्रत्यक्षात आलीच नाही.पण नंतर समितीवर बहिष्कारच टाकला गेला.बरं स्वतंत्रपणे त्यांनी काही चळवळ चालविली म्हणाव तर तेही नाही.उलट सुरू असलेल्या चळवळींबद्दल अपप्रचार करून त्या मोडीत काढण्याचं कारस्थान या मंडळींनी केलं.सुदैवानं यांची सारी कारस्थानं हाणून पाडण्यात पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती यशस्वी झाली आणि ज्या उद्देशानं चळवळ सुरू झाली होती तो उद्देशही समितीनं साध्य करून दाखविला.पत्रकार संरक्षण कायदा झाल्यानंतर श्रेय घेण्यासाठी अनेक उपटसुंभ पुढे आले पण सरकारला आणि राज्यातील पत्रकारांनाही माहिती आहे की,कायद्यासाठी कोण खपलं,कोण झिजलं आणि कोण लढलं ते…

मराठी पत्रकार परिषद हिटलिस्टवर

स्वाईन फ्ल्यू सारखं व्देष पसरवत ठेवणं हा या टोळक्याचा स्थायीभाव होता.त्यांच्या व्देषाचे अनेक विषय होते.मात्र शशिकांत सांडभोर आणि मराठी पत्रकार परिषद हे दोन  त्यांच्या हिटलिस्टवर होते.या टोळक्यानं शशिकांतला किती मानसिक त्रास दिला ते जगजाहीर आहे.माध्यमांमध्ये हल्ल्ली  जॉब असणं..नसणं हे नित्याचं झालेलं आहे.पत्रकार सिनिअर झाला की,त्याला जॉब मिळण्यात अडचणी येतात याचा अनुभव आपल्यापैकी अनेकांना आहे .पंचवीस-पंचवीस ,तीस-तीस वर्षे पत्रकार म्हणून उल्लेखनिय काम केल्यानंतर जॉब गेलेला असेल तर केवळ आज जॉब नाही म्हणून तो पत्रकारच नाही ही भूमिका पटणारी नाही.अशी भूमिका घेणं हा मस्तवालपणा आहे.शशिकांतकडं तू कुठल्या दैनिकाचा,वाहिनीचा प्रतिनिधी आहेस असं पत्र मागून त्यानं पत्रकार म्हणून केलेल्या कामावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण करून त्याचा मानसिक छळ करणं हा कृतध्नपणा आहे.गंमत अशी की,शशिकांतकडं तो पत्रकार असल्याचां पुरावा मागणारे स्वतः कोणत्या पत्राचे,वाहिनीचे प्रतिनिधी होते ?,दहा-दहा पंधरा पंधरा वर्षे ज्यांनी कधी एक ओळही लिहिली नाही अशी मंडळी शशिकांतकडं तो पत्रकार असल्याचे पुरावे  मागत होती.शशिकांतच्या जखमेवर मीठ चाळण्यासाठी या लोकांनी त्याच्या घरी दहा हजाराची मदत पाठवून दिली.शशिकांच्या वाढदिवशी मी जेव्हा त्याच्यावर लेख लिहिला तेव्हा काही हरामखोरांनी मला फोन करून ‘तुम्ही चुकीच्या माणसांना मोठं करता आहात’ असे तारे तोडले आणि शशिकांच्या मृत्यूनंतरही त्याची शोकसभा घेऊन शशिकांतवर प्रेम कऱणार्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा अमानवी उद्योग या लोकांनी केला.त्यामुळं विकास पॅनलनं ‘मानुसकीच्या शत्रूसंगे युध्द आमुचे सुरू’ ही जी टॅगलाईन वापरली होती ती योग्यच होती अस म्हणावं लागेल.शशिकांचा अमानुष मानसिक छळ करणार्‍यांना मुंबईतील पत्रकारांनी त्यांची जागा दाखविली याबद्दल सर्व मतदारांचे मनापासून आभार.

मुंबई मराठी पत्रकार संघ आणि मराठी पत्रकार परिषद या दोन संस्थांचे नाते संबंध कसे आणि काय होते हे मुंबईतील नव्याने आलेल्या अनेक सदस्यांना माहिती नाही.  मराठी पत्रकार परिषदेची स्थापना 3 डिसेंबर 1939 रोजी झाली.त्यानंतर एक वर्षाच्या आत मुंबई मराठी पत्रकार संघाची स्थापना केली गेली.मुंबई संघाचं कार्यक्षेत्र मुंबई असेल आणि मराठी पत्रकार परिषदेचं कार्यक्षेत्र महाराष्ट्र असेल, मात्र दोन्ही संस्था परस्पर पूरक काम करतील असं तेव्हा ठरलं होतं.दोन्ही संघांची स्थापना करणारे मान्यवर एकच होते.परिषदेने प्रत्येक जिल्हयात शाखा निर्माण करून त्यांना स्वतःशी जोडून घेतले होते.मुंबईसह सारे संघ परिषदेशी संलग्न होते.2000 पर्यंत ही व्यवस्था कायम होती.त्या अगोदर कुमार कदम यांनी मराठी पत्रकार परिषदेचे  दोन वेळा अध्यक्षपदही भोगले होते.ते अध्यक्ष असताना परिषदेबद्दल त्यांचे कोणतेच आक्षेप नव्हते.मात्र आज ज्या पध्दतीनं कुमार कदम यांच्या पॅनलचा धुव्वा उडाला आहे त्याच पध्दतीनं 1998 मध्ये एस.एम.देशमुख यांनी परिषदेच्या निवडणुकीत राजाराम माने यांना पराभूत करून कुमार कदम यांच्या गटाला पाणी पाजले होते.त्यानंतर परिषदेचे दरवाजे कुमार कदम यांच्यासाठी कायमचे बंद झाले आणि राज्यातील पत्रकारांची मातृसंस्था असलेली मराठी पत्रकार परिषद ही बोगस संस्था झाली. कुमार कदम मुंबई संघाचे अध्यक्ष झाले आणि त्यानी सदस्यांना विश्‍वासात न घेता मराठी पत्रकार परिषदेबरोबरची पन्नास वर्षीची संलग्नता एका फटक्यात  तोडून टाकली.हा पूर्वजांचा आणि त्यांनी तयार केलेल्या व्यवस्थेचा अवमान होता.परिषदेच्या नव्या पदाधिकार्‍यांबरोबरचे व्यक्तिगत राग-लोभ हे जसं एक कारण होतं तशीच संलग्नता तोडण्याची आणखी दोन कारणं होती.पहिलं म्हणजे नाशिकच्या पत्रकार प्रबोधिनीच्याबाबतीत परिषदेच्या वतीने तक्रार केली गेली आहे.या तक्र ारीत तिकडे अनेक गैरव्यवहार झाल्याचे नमूद केले गेलेेले आहे.1994 ला सरकारनं या संस्थेसाठी 40 लाख रूपये आणि नाशिकला रेल्वेस्टेशनजवळ साडेतीन एकरचा भूखंड दिला आहे.केवळ कारस्थानी कारभारामुलं 25 वर्षे झाले ही संस्था अस्तित्वात आलेली नाही.याची केस  आजही नाशिकच्या धर्मदाय आयुक्तांच्या कोर्टात सुरू आहे.( ज्या पत्रकारांना या केसची आणि पत्र प्रबोधिनी प्रकरणाची अधिक माहिती हवी आहे त्यांनी माझे संघर्षाची पंच्च्याहत्तरी हे पुस्तक जरूर वाचावे. ) नाशिकच्या पत्रप्रबोधिनीचा विषय मुंबईत कोणाला कळता कामा नये याची खबऱदारी कुमार कदम यांनी जाणीवपूर्वक घेतली.त्यामुळं प्रबोधिनीची भानगड नेमकी आहे काय ? हे बहुसंख्य पत्रकारांना आजही ज्ञातच नाही.हे प्रकरण जगासमोर आलं तर बढाया माऱणार्‍यांना 25 वर्षातही एक संस्था उभी का करता आली नाही याचं उत्तर द्यावं लागेल याची भिती आहे.आम्ही त्यावर बोलतो,लिहितो आणि त्यासाठी लढतो हे आमच्याबद्दलच्या रागाचं एक कारण आहे.

जागेबाबात दुहेरी भूमिका..

आणखी एक मुद्दा होता.मुबंई मराठी पत्रकार संघांची वास्तू आज ज्या जागेवर उभी आहे ती जागा मराठी पत्रकार परिषदेची होती.सरकार आणि मुंबई मराठी पत्रकार संघ तसेच मराठी पत्रकार परिषद यांच्यामध्ये झालेल्या एका करारान्वये ( त्या संबंधीच्या जीआरची प्रत आमच्याकडं उपलब्ध आहे.) ही जागा परिषदेनें संघाला द्यावी तिथं इमारत उभारल्यानंतर संघानं त्यातील काही जागा परिषदेला द्यावी असं ठरलं होतं..गंमत अशी की,ही वास्तू तयार झाली तेव्हा परिषद कुमार कदम यांच्या कंपूच्या ताब्यात होती.त्यामुळं जागा मिळालीच पाहिजे असा आग्रह तेव्हा कुमार कदम मुंबई संघाकडं धरत होते.त्यांनी संघाला पाठविलेली अनेक पत्रं परिषदेच्या कार्यालयात आहेत.मात्र परिषद ताब्यातून गेल्यानंतर त्यांची भूमिका बदलली आणि परिषदेला सुईच्या टोकावर बसेल एवढी जागाही देता कामा नये अशी भूमिका त्यांनी घेतली.म्हणजे संस्थेपेक्षा आपले राग-लोभ हेवेदावे कुमार कदम यांनी नेहमीच महत्वाचे मानले हे यावेळेसही दिसून आलं.त्यानंतर परिषदेने जागेसाठी सरकारकडं पाठपुरावा केला.सचिव सुधीर ठाकरे यांनी सुनावणी घेतली.या सुनावणीला स्वतः कुमार कदम,अजय वैद्य आदि मंडळी उपस्थित होती.सुनावणींअंती ठाकरे यांनी परिषदेला जागा देण्याबाबतचा आदेश दिला.तसे पत्र 22 जून 2008 रोजी परिषदेला मिळाले.मात्र काही मध्यस्थांच्या माध्यमातून संघातील कंपूनं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि चुकीची माहिती सांगून कलेक्टरांच्या आदेशाच्या पत्राला स्थगिती मिळविली.हे पत्र आम्हाला 24 जूनला मिळाले.ही दोन्ही पत्र आजही आमच्याकडं आहेत .’पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती’ असं या पत्रात म्हटलं आहे.आम्ही आजही कोर्टात गेलो तर न्यायालयात निकाल परिषदेच्या बाजुनं लागणार हे नक्की.परंतू दोन्ही संस्था परस्पर पूरक आहेत अशा स्थितीत कोर्ट-कचेरी करणे योग्य नाही या भूमिकेतून आम्ही न्यायालयात गेलेलो नाहीत.नवीन कार्यकारिणीला आमची विनंती आहे.केवळ व्यक्तीव्देषातून निर्माण केलेला हा वाद सोडवावा,दोन्ही बाजुंची बैठक बोलावून योग्य तोडगा काढावा आणि परिषदेला तिचा हक्क मिळवून द्यावा आणि गेली अनेक दिवस दोन्ही संस्थांमध्ये निर्माण केली गेलेली कटूत दूर करावी।  संघानं पुन्हा परिषदेबरोबरची संलग्नता पुनर्स्थापित करून संघाला मुख्य प्रवाहाबरोबर जोडून घ्यावे ही विनंती आहे.

कुमार कदम यांचे  परिषदेतून आम्ही उच्चाटन केल्याचा त्यांचा राग आजही कमी झालेला नाही.देशमुखांच्या बदनामीची त्यांची मोहिम गेली अनेक वर्षे इमाने-इतबारे सुरू आहे.काही उपटसुंभांना हाताशी धरून देशमुखांचे चारित्र्यहनन करण्याचा त्यांचा निनावी उद्योग सुरू असतोच.मात्र ‘कर नाही त्याला डर कसली’? या भूमिकेतून आम्ही अशा चिखलफेकीची दखलही घेत नाही.किरण नाईक हे माझ्याकडं कामाला होते हे त्यांनी एवढया लोकांना इतक्या वेळा  ऐकविलं आहे की,तेच ते ऐकून त्यांच्या जवळचे लोकही कंटाळले.व्यक्तीगत पातळीवर हे सारं ठीक आहे मात्र ज्या मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्षपद आपण दोन वेळा उपभोगलं त्या संस्थेच्या विरोधात कारस्थानं करतानाही या माणसानं मागं-पुढं पाहिलं नाही.एकच उदाहरण देतो.6 जानेवारी 2016ला ज्येष्ठ ,वयोवृध्द पत्रकार दिनू रणदिवे यांना जीवन गौरव पुरस्कार देण्याचा निर्णय परिषदेने घेतला  त्यासाठी उध्दव ठाकरे यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आलं होतं.मात्र उध्दव ठाकरे यांनी या कार्यक्रमास जावू नये म्हणून संघातील एक टोळकं मातोश्रीवर  जावून बसलं होतं.मात्र या टोळक्याचं चरित्र  उध्दव ठाकरे यांनाही माहिती असल्यानं त्यांच्या विनंतीला ठाकरे यांनी भिक घातली नाही अन त्यांच्या नाकावर टिच्चून ते परिषदेच्या कार्यक्रमास आले.’मी या कार्यक्रमास येऊ नये म्हणून कसे प्रयत्न झाले,काही मंडळी माझ्याकडं येऊन कशी ठाण मांडून बसली होती’ याचा किस्सा उध्दवजींनी आपल्या भाषणात जाहीरपणे सांगितला.उध्दव ठाकरे तेवढ्यावरच थांबले नाहीत तर ‘एस.एम.देशमुखांना दिनू रणदिवेचा सत्कार करावा वाटला ,या कार्यक्रमास विरोध करणारांना हे का सूचले नाही’? अशी कोपरखिळी उध्दव ठाकरे यांनी जाहीर कार्यक्रमात मारून विरोध कऱणारांची औकातच काढली होती.ही मंडळी कोणत्या थराला जावू शकते हेच यातून दिसून आले.या कार्यक्रमात दिनू रणदिवे यांना  92 हजारांची थैली अर्पण करण्याचा निर्णय आम्ही घेतला होता.दिनू रणदिवे यांच्या भूमिकेबद्दल,स्वभावाबद्दल मतभेद असू शकतात.मात्र संयुक्त महाराष्ट्र लढयात त्यांनी पत्रकार म्हणून बजावलेली भूमिका विसऱणं हा कृतघ्नपणा आहे.93 वर्षांच्या दिनू रणदिवे यांच्या कार्याबद्दल कतज्ञता व्यक्त करण्याचा भाग म्हणून आम्ही 92 हजारांची थैली अर्पण करून त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय  घेतला तेव्हा या कंपूच्यावतीने काहींनी आम्हाला एवढी सारी रक्कम कश्याला देताय वगैरे सांगून त्याला विरोध केला होता.मात्र आमचा हेतू शुध्द होता,आणि चांगुलपणाला बळ मिळाले पाहिजे ही आमची भूमिका असल्यानं आम्हीही विरोध करणाराांना भिक न घालता दणदणीत कार्यक्रम केला.पदाधिकार्‍यांच्या अमानवीपणाचे,कृतध्नपणाचे असे अनेक किस्से आहेत.मुंबईतील अनेकांना हेच अनुभव आलेले आहेत.मात्र आता हे सारं इतिहास जमा झालेलं आहे असं आम्हाला वाटतं.एस.एम.देशमुख,किरण नाईक यांना मुंबई संघात येऊ देता कामा नये अशी मस्तवाल भााषा वापरणार्‍यांना नियतीनंच चले जाव केलं आहे,नियती सूड घेते म्हणतात तो असा.असो.

मुंबई संघात परिवर्तन झाले आहे.नरेंद्र वाबळे यांच्या नेतृत्वाखाली नवी टीम सत्तेवर आली आहे.मुंबई संघात मधल्या काळात जे आर्थिक व्यवहार झाले त्याची चौकशी तर नवी समिती करीलच त्याचबरोबर अन्य संघटनांशी संबंध तोडून जी एककल्ली भूमिका संघानं घेतली होती तिचाही पुनर्विचार केला जाईल याची आम्हाला खात्री आहे.आज माध्यमांसमोर अनेक प्रश्‍न आहेत.मजिठियाच्या अंमलबजावणीचा जसा विषय आहे तव्दतच छोटया आणि मध्यम वृत्तपत्रांच्या अस्तित्वाचाही प्रश्‍न आहे.सारा मिडिया ठराविक भांडवलदारी माध्यम समुहाच्या हाती देण्याचे खटाटोप सुरू असताना पत्रकार संघटनांना  एकजूट होत या आव्हानाचा सामना करावा लागेल.समोरची संघटना कोणा व्यक्तीच्या ताब्यात आहे हे पाहून भूमिका ठरता कामा नये तर व्यापक पत्रकारितेच्या हिताचा विचार प्राधान्यानं झाला पाहिजे असे आम्हाला वाटते.नवे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांच्यासह त्यांच्या टीममधील बहुतेकजण आमचे व्यक्तीगत स्नेही आहेत.व्यापक माध्यमकर्मींच्या हिताचा विचार करून सकारात्मक भूमिका घेणारी ही मंडळी आहे.त्यामुळं मुंबई संघात केवळ सत्तांतर झालं असं नाही तर खर्‍या अर्थानं परिवर्तन झाल्याचं चित्र नजिकच्या काळात दिसेल असा आम्हाला विश्‍वास आहे.नव्या टीमचं अभिनंदन करून त्यांना  शूभेच्छा देत असताना त्यांना सर्वप्रकारचे सहकार्य कऱण्याचीं ग्वाही आम्ही देत आहोत.

एस.एम.देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here