पन’वेल’ नॉट ‘वेल’

0
1015

161 उमेदवार करोडपती,

59 उमेदवारांची पार्श्‍वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची ,

पुढार्‍यांची अनेक पोरं मैदानात 

पनवेल महापालिकेची पहिली निवडणूक होतेय.पनवेल मनपाची सध्याची उलाढाल एक हजार कोटींच्यावरती आहे.पनवेल परिसरात येऊ घातलेल्या विविध नवीन प्रकल्पामुळे भविष्यात पनवेल मनपा सर्वात श्रीमंत मनपा असणार आहे.त्यामुळे सोन्याचे अंडे देणारी ही कोंबडी आपल्या हाती राहावी यासाठी पनवेल परिसरातील ‘सर्व प्रकारच्या’ मंडळीनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.78 जागांसाठी मतदान होत आहे,418 उमेदवार नगरसेवक होण्यासाठी मैदानात उतरले आहेत.यातील 227 जण व्यावसायिक आहेत.म्हणजे उद्या मनपाची ठेके घेण्यासाठी हेच दावेदार ठरू शकतात.तीस वयोगटातील 66 उमेदवार आहेत.एवढेच नव्हे तर उमेदवारांकडची संपत्तीचे आकडे पाहिले तर निवडणूक लढविणे आता सामांन्यांचे काम राहिले नाही याची प्रचिती येते.एकूण उमेदावारांपैकी तब्बल 161 उमेदवारांची संपत्ती कोटींमध्ये आहे.भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांचे बंधू परेश ठाकूर यांची सपत्ती 95 कोटी 47 लाख रूपये आहे.किशोर काशीनाथ म्हात्रे या उमेदवाराची संपत्ती 37 कोटी रूपये आहे.अन्य उमेदवार याच पट्टीतले आहेत.90 टक्के उमेदवार हे लखपती आहेत.

पनवेलमध्येही घराणेशाही दिसते आहे.बहुतेक नेत्यांची मुलं निवडणूक रिंगणात आहेत.पनवेलचा पहिला महापौर हा अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव असल्याने पुढार्‍यांची पोरं महपौर होणार नसली तरी अप्रत्यक्षपणे ते सत्ता हातात ठेऊ शकतात.रामशेठ ठाकूर यांचे एक चिरंजीव आमदार आहेत.दुसरे परेश ठाकूर हे आता निवडणूक रिंगणात आहेत.माजी नगराध्यक्षा अनुराधा ठोकळ यांची मुलगी शेकापकडून निवडणूक लढवत आहे.शेकापचे जे.एम.म्हात्रे यांचे चिरंजीव प्रितम म्हात्रे रिंगणात आहेत.भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील यांचा मुलगा विक्रांतही निवडणूक लढवतोय.राष्ट्रवादीचे नेते सुनील घरत यांची मुलगी शिवानी रिंगणात आहे.याच बरोबर जिल्हा परिषद,आणि अन्य पदे भोगलेल्या नेत्यांची पोरं,मुली,सुना निवडणूक रिंगणात आहेत.म्हणजे मतदारांनी कोणालाही मतदान केले तरी ते मतदान घराणेशाहीलाच आहे.ठराविक लोकांच्या हातीच पनवेल मनपा येणार हे उघड आहे.

या सर्वांपेक्षा गंभीर गोष्ट म्हणजे एकूण उमेदवारांपैकी 59 उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी आहे.त्यामध्ये भाजपच्या 78 उमेदवारांपैकी 22 ( 28 टक्के ) शिवसेनेच्या 62 उमेदवारांपैकी 7 ( 11 टक्के ) शेतकरी कामगार पक्षाच्या 54 उमेदवारांपैकी12 ( 22 टक्के ) मनसेच्या 25 उमेदवारांपैकी 6 ( 24 टक्के ) उमेदवारांवर विविध गुन्हे दाखल आहेत.प्रतिज्ञापत्रातच त्यांनी ही माहिती दिली आहे.यातील काही उमेदवारांच्या विरोधात गंभीर गुन्हयांची नोंद झालेली आहे.गंमत म्हणजे हे सारे बाहुबली धनवानही आहेत आणि जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जायची त्यांची तयारी आहे.त्यामुळं पनवेल मनपाच्या सव्वा चार लाख मतदारांची आपल्या पसंतीचा उमेदवार निवडताना आणि योग्य ,लायक उमदेवारांच्या हातीच करोडपती मनपाच्या चाव्या देतान कसोटी लागणार हे नक्की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here