आयुष्यभर निष्ठेनं पत्रकारिता केलेल्या वरिष्ठ पत्रकारांना सन्मान योजनेचा लाभ मिळावा यासाठी निकष बदलाएस.एम.देशमुख यांची मागणी
अलिबाग दि.17 ( प्रतिनिधी ) आयुष्यभर निष्ठेने पत्रकारिता केलेल्या जास्तीत जास्त पत्रकारांना “बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजने”चा लाभ मिळावा यासाठी पत्रकार सन्मान योजनेच्या निकषात बदल करण्यात यावा आणि पत्रकार सन्मान योजनेसाठी अर्थसंकल्पात कायमस्वरूपी तरतूद करण्यात यावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी केली.रायगड प्रेस क्लबचा पंधरावा वर्धापन दिन आणि पुरस्कार वितरण सोहळा नुकताच अलिबाग येथे संपन्न झाला.या कार्यक्रमात अध्यक्षपदावरून देशमुख बोलत होते.देशमुख यांच्या मागणीवर बोलताना माहिती आणि जनसंपर्क मंत्री अदिती तटकरे यांनी पत्रकार सन्मान योजनेचा लाभ जास्तीत जास्त पात्र पत्रकारांना मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले. तसेच रायगड जिल्हयाचे मुख्यालय असलेल्या अलिबाग येथे अत्याधुनिक माहिती भवन उभे करण्याची घोषणा आदिती तटकरे यांनी यावेळी केली.पत्रकार सन्मान योजना सुरू व्हावी यासाठी आम्ही 20 वर्षे पाठपुरावा केला त्यानंतर सुरू झालेल्या सन्मान योजनेचा लाभ एक वर्षात केवळ 125 पत्रकारांनाच मिळत असेल तर ही योजना सुरू होऊन काही उपयोग नाही.तांत्रिक मुद्दे उपस्थित करून जर पात्र पत्रकारांचे अर्ज नाकारले जात असतील तर योजनेचे निकष बदलले पाहिजेत.तसेच ही योजना ठेवीतील व्याजातून न चालविता त्यासाठी बजेटमध्ये स्वतंत्र आर्थिक तरतूद केली तरच जास्तीत जास्त पात्र पत्रकारांना योजनेचा लाभ देता येईल अशी मागणी देशमुख यांनी केली.राज्य सरकारी कर्मचार्‍यांचे निवृत्तीचे वय जर 58 वर्षांचे असेल तर पत्रकारांसाठी वयाची अट 60 का ? असा सवाल करून सन्मान योजनेसाठी वयाची अट शिथिल करून ती 58 करावी आणि अनुभवाचा कालावधी 25 वर्षांचा करावा अशी मागणीही देशमुख यांनी केली.ज्या पत्रकारांकडे सलग 30-35 वर्षे अधिस्वीकृती पत्रिका आहे त्यापत्रकारांक़डे अन्य पुरावे मागून त्यांची अडवणूक आणि छळवणूक करू नका अशी विनंती त्यांनी केली.पंढरीनाथ सावंत ,नवीन सोष्टे यांच्यासारख्या अनेक पत्रकारांकडे जुनी कागदपत्रे नाहीत,छोटया दैनिकात काम करणार्‍या पत्रकार,संपादकांची देखील हीच अडचण आहे,याचा अर्थ ते पत्रकार नाहीत असा होत नाही.अशा स्थितीत जिल्हा माहिती अधिकार्‍यांमार्फत त्यांच्या पात्रतेची शहानिशा केली जावी अशी मागणीही देशमुख यांनी केली आहे.देशमुख म्हणाले,काही अपात्र पत्रकारांनी चुकीची कागदपत्रे दाखल करून सन्मान योजनेचे लाभ लाटले आहेत अशा लाभार्थ्यांची चौकशी होऊन त्यात चुकीचे आढळले तर त्यांची पेन्शन थांबवावी .देशमुख पुढे म्हणाले,पत्रकारांशी संबंधित अधिस्वीकृती समितीसह अन्य समित्यां गेली 3-4 वर्षे अस्तित्वातच नाहीत त्यामुळे तातडीने सर्व समित्यांचे पुनर्रगठण करण्यात यावे.आपल्या भाषणात आदिती तटकरे यांनी देशमुख यांच्या सर्वच मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत,जास्तीत जास्त पत्रकारांना सन्मान योजनेचा लाभ मिळाला पाहिजे या मतांचे आम्ही आहोत त्यात नियमांचा अडसर असेल तर त्यात बदल करावे लागतील त्यासाठी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्याकडे बैठक लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे सांगितले.सन्मान योजनेची बजेटमध्ये तरतूद झाली तर अधिक पत्रकारांना लाभ मिळेल हे खरे आहे त्यासाठी देखील प्रयत्न केले जातील,तसेच अधिस्वीकृती समितीचे पुनर्रगठण पुढील एक महिन्यात करण्यात येईल असे आश्‍वासन आदिती तटकरे यांनी यावेळी दिले.महासंचालक डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी समितीचे काम नियमानुसार चालते,असे स्पष्ट करून देशमुख यांनी केलेल्या मागणीनुसार निकष बदलले तर नक्कीच जास्तीत जास्त पत्रकारांना सन्मान योजनेचा लाभ होईल असे स्पष्ट केले.हेतुपुरस्सर कोणत्याही पत्रकारावर अन्याय केला जात नसल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.वरिष्ठ पत्रकार प्रफुल्ल मारपकवार यांनी सन्मान योजनेचा लाभ जास्तीत जास्त पत्रकारांना मिळाला पाहिजे अशी आग्रङी मागणी केली.तसेच पत्रकार आणि माहिती जनसंपर्क विभागाचा समन्वय पुर्वी सारखा राहिला नसल्याची खंतही त्यानी व्यक्त केली.यावेळी न्यूज 24 चे महाराष्ट्र विभागाचे संपादक विनोद जगदाळे यांना आदिती तटकरे यांच्या हस्ते आचार्य अत्रे युवा पत्रकार पुरस्काराने सन्माननित करण्यात आले तसेच वरिष्ठ छायाचित्रकार वामन पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला.यावेळी रायगड जिल्हयातील ंपंधरा पत्रकारांना विविध पुरस्कारानी सन्मानित केले गेले.कार्यक्रमास मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस संजीव जोशी,कोकण विभागीय सचिव विजय मोकल,माजी कोषाध्यक्ष मिलिंद अष्टीवकर,दीपक रानवडे,वरिष्ठ पत्रकार शोभना देशमुख आदि उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भुस्कुटे यानी केले तर आभाऱ प्रदर्शन शशिकांत मोरे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी कऱण्यासाठी मानसी चेऊलकर,अभय आपटे,भारत रांजनकर,मोहन जाधव आणि इतरांनी विशेष मेहनत घेतली.रायगड प्रेस क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष भारत राजनकर यांचा यावेळी आदिती तटकरे .एस.एम.देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here