नवी दिल्ली, दि. १३ – पत्रकारांना भेटवस्तू दिल्यामुळे नाराज झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संबंधित मंत्र्यांची चांगली कानउघडणी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅबिनेट मिटिंगदरम्यान सर्वांसमोर मोदींनी आपली नाराजी व्यक्त करत त्या मंत्र्याला खडे बोल सुनावले. मंत्र्यांना कामासाठी कोणालाही भेटवस्तू देण्यास यापूर्वीच मनाई करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मोदींच्या नाराजीचा सामना करावा लागलेले संबंधित मंत्री हे खरेतर मोदींचे अतिशय जवळचे मानले जातात. पॉलिसी आणि व्यापार या दोन क्षेत्रांतील कामावर त्यांची चांगली पकड असून या युवा मंत्र्यांवर मोदींना खूप विश्वास आहे. मात्र असे असले तरीही मोदींनी त्यांची ‘झीरो टॉलरन्स’ नीती सोडली नाही आणि त्या चार शब्द मंत्र्यालाही सुनावले. संबंधित मंत्र्याने आपले खाते कव्हर करण्याबद्दल काही पत्रकारांना भेटवस्तू दिल्या होत्या. यापूर्वी अशा गोष्टी सामान्य मानल्या जात असत, मात्र मोदींना हे मान्य नाही.
कॅबिनेट मीटिंगदरम्यान मोदींनी सर्वांसमोर त्या मंत्र्याला या गोष्टीबद्दल प्रश्न विचारत नाराजी व्यक्त केली. तसेच त्या मंत्र्याकडून कोणतेही स्पष्टीकरण न ऐकता यापुढे अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत असा इशाराही दिला. ‘ कोणीही, कितीही जवळचा असला तरी अशा गोष्टी घडल्यास कोणालाही सूट मिळणार नाही’, असा संदेशच मोदींनी त्या मंत्र्याच्या माध्यमातून सर्वांना दिला. (ऑनलाइन लोकमत)