पाकिस्तानमधील लाहोर शहर सध्या जलमय झाले आहे. धुवांधार पावसामुळे सखल भागाला तळ्याचे स्वरूप आले आहे. साचलेले पाणी हटवण्यात तेथील महापालिकेची यंत्रणा पूर्णत: अपयशी ठरली आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होताना दिसते. पाकिस्तानातील दुनिया या वृत्त वाहिनीच्या पत्रकाराने याचे वार्तांकन अत्यंत अनोख्या पद्धतीने केले आहे. मुसळधार पावसामुळे साचलेल्या पाण्यात लहान मुलांच्या बाथटबमध्ये बसून या पत्रकाराने प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. लोकांनी या पावसाचा आनंद अशा पद्धतीने घेण्याचा सल्ला देखील त्याने दिला. आपल्या भोवती रंगीबेरंगी बाथटब ठेवत स्वत: एका बाथटबमध्ये बसून हा पत्रकार वार्तांकन करत होता. सोशल मीडियावर या व्हिडिओला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी ही व्हिडिओ पाहिला असून अनेकांनी त्यावर प्रतिक्रियाही दिली आहे.
मी सध्या कुठल्याही स्विमिंग टँकमध्ये नाही. मी सध्या पावसामुळे साचलेल्या पाण्यात आहे. पण तुम्ही पाहू शकता मी स्विमिंग टँकमध्ये असल्याचा अनुभव घेतोय, असा टोला त्याने लाहोर पालिका प्रशासनाला लगावला. लाहोरमध्ये जागोजागी पाणी साचले आहे. महापालिकेचे लोक इथे आले आहेत. पण त्यांनाही साचलेले पाणी काढण्यात अपयश आल्याचे, हा पत्रकार कॅमेऱ्यासमोर सांगताना दिसतो. त्याचा हा व्हिडिओ पाकिस्तानमध्ये व्हायरल झाला आहे.
महापालिकेला टोला लगावत लोकांनी पावसाचा आनंद घ्यावा, असा सल्ला या पत्रकाराने दिला आहे. हा व्हिडिओ मागील आठवड्यात शुक्रवारी शेअर करण्यात आला. फेसबुकवर हा व्हिडिओ १२ हजारहून अधिकवेळा शेअर करण्यात आला आहे. तर ५ लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. एक हजारहून अधिक प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. लाहोर शहरात मागील ३८ वर्षांतील विक्रमी पाऊस पडला आहे. नागरी वस्तीत पाणी शिरले आहे. आतापर्यंत ३ लोक मृत्यूमुखी पडले आहेत.
लोकसत्तावरून साभार