पत्रकारांसाठी विविध सरकारी योजना

1
3140

अकोला, दि. 26 — आपल्या देशात प्रसार माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला गेला आहे, यावरुनच लोकशाहीत वृत्तपत्रांचे स्थान किती महत्त्वाचे आहे हे दिसून येते आणि म्हणूनच पत्रकारांना आपले कर्तव्य व जबाबदारी पारपाडण्यास सहाय व्हावे यासाठी शासनातर्फे पत्रकारांकरीता विविध योजना, कल्याणकारी उपक्रम, पत्रकारिता पुरस्कार स्पर्धा अशा अनेक बाबी राबविण्यात येतात, याचा लाभ पत्रकारांनी घ्यावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक देवेंद्र भुजबळ यांनी केले.
मराठी पत्रकार परिषद, मुंबई संलग्नित अकोला जिल्हा पत्रकार संघाच्या जिल्हा अधिवेशनात व्दितीय सत्रात आयोजित परिसंवादात श्री. भुजबळ बोलत होते. ते म्हणाले की, पत्रकारांसाठी राज्य शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना व उपक्रम आहेत. अधिस्विकृती पत्रिकेच्या माध्यमातून पत्रकारांना एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये 100 टक्के तर रेल्वेच्या प्रवासात 50 टक्के सवलत मिळते. शासकीय विश्रामगृहात सवलतीच्या दराने आरक्षण उपलब्ध होते. राज्यात जवळपास 2700 अधिस्वीकृती पत्रिका निर्गमित करण्यात आल्या आहेत. अधिक माहितीसाठी व फॉर्मसाठी पत्रकारांनी जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधावा. पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना विशिष्ट आजारासाठी बाबनिहाय जास्तीत जास्त 1 लाख रुपयांपर्यंत अर्थिक मदत मिळते. तर दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना 1 लाख रुपयांपर्यंत अर्थिक मदत मिळू शकते. तसेच अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना आरोग्य विभागाच्या व महापालिकांच्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध आहे. ही योजना आता त्यांच्या कुटुंबियांनाही लागू झाली आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये अधिस्वीकृतीधारक पत्रकार व त्यांच्यावर अवलंबून कुटुंबियांचा समावेश करण्यात आला आहे.
शासनमान्य जाहिरात यादीच्या माध्यमातून विशिष्ट निकष पूर्ण करणाऱ्या वृत्तपत्रांना शासनाच्या जाहिरात यादीत समाविष्ट करण्यात येते. 2031 वृत्तपत्रे शासनमान्य यादीत आहेत. या वृत्तपत्रांना वर्षातून आठ दर्शनी जाहिराती व शासनाच्या अन्य जाहिराती मिळतात, असे सांगून श्री. भुजबळ पुढे म्हणाले की, शासनाच्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या गृहनिर्माण योजनेमध्ये पत्रकारांसाठी 2 टक्के जागा आरक्षित आहेत. तसेच सिडकोतर्फे देखील पत्रकारांना प्राधान्याने जागा देता येते. तसेच शासनातर्फे पत्रकार भवन उभारण्यासाठी पत्रकार संघांना जागा देण्यात येते. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून काही प्रमाणात अर्थसहाय देखील देण्यात येते.
राज्यातील विकास कामांना प्रसिध्दी देणारे पत्रकार, छायाचित्रकार व दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या प्रतिनिधींसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे दरवर्षी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार योजना राबविण्यात येते. आतापर्यंत एकूण 170 पत्रकारांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्राप्त झाले आहेत. याशिवाय जलयुक्त शिवार अभियान व महात्मा गांधी तंटामुक्त योजनेच्या अनुषंगाने उत्कृष्ट लेखन प्रसिध्द करणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार देण्यात येतात. तसेच शासनातर्फे विविध प्रसंगी विविध समित्या नेमण्यात येतात. या समित्यांवरही पत्रकारांना स्थान देण्यात येते, असे श्री. भुजबळ यांनी सांगितले.
या परिसंवादात मराठी पत्रकार परिषद, मुंबईचे विश्वस्त किरण नाईक, एन.डी.टी.व्ही. चे वरिष्ठ पत्रकार प्रसाद काथे, देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे, दै. सकाळ, नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक श्रीमंत माने, दै. लोकमत, अकोला आवृत्तीचे निवासी संपादक रवी टाले यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पत्रकार डॉ. किरण वाघमारे यांनी केले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here