मंगरूळपीर येथील तहसिलदारांची अरेरावी,पत्रकार रस्त्यावर

वाशिमः अगोदर माहूरला घडले,नंतर बीड जिल्हयात पाटोद्यास त्याची पुनरावृत्ती झाली,आज वाशिम जिल्हयातील मंगरूळपीरमध्ये पुन्हा तेच घडले.काय झालंय या अधिकार्यांना..पत्रकारांनी विरोधात बातमी छापली,बेकायदेशीर रेती उपश्याबद्दल बातमी दिली,शहरातील पाणी पुरवठयाबद्दल वार्ता लिहिली किंवा तहसिलच्या गलथान कारभाराबद्दल ब्र काढला तरी तहसिलदार उठतात आणि थेट पत्रकारांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करायला पोलिसाना भाग पाडतात.वाशिम जिल्हयात मंगरूळपीर येथे काल रात्री तेच घडले.मंगरूळपीरचे लोकमतचे पत्रकार प्रा.नंदलाल पवार आणि स्थानिक न्यूज पोर्टलचे पत्रकार फुलचंद भगत यांनीही स्थानिक तहसिलदारांच्या कारभाराच्या विरोधात आसूड ओढले होते.त्यामुळं तहसिलदार वाहूर वाघ कमालीचे चिडले होते.काल रात्री त्यांनी संधी साधली आणि पवार आणि भगत यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी आणि खंडणीचे खोटे गुन्हे पोलिसांत दाखल केले.पोलिसांनी लगेच रात्री दोघांनाही एखादया सामांन्य गुन्हेगारांसारखे अटक करून कोठडीत डांबले.तहसिलदार ते तालुका दंडाधिकारी असतात.त्यामुळं पोलिसांचाही नाईलाज होतो आणि अशा घटना घडतात.मात्र अधिकार्यांच्या अशा मनमानीच्या आणि अरेरावीच्या विरोधात गप्प बसायचं नाही,त्याविरोधात आवाज उठवायचा असा निर्णय मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधा कृती समितीनं घेतला आहे.त्यामुळंच बीड जिल्हयातील पत्रकारांनी एकत्र येत पाटोद्यातील पत्रकाराच्या विरोधात आंदोलन केलं आणि आजही वाशिम जिल्हयातील पत्रकारांनी एकत्र येत पवार आणि भगत यांच्या समर्थनार्थ वाशिम येथे प्रखर आंदोलन केलं.मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा मुद्दाम वाशिमला गेले आणि वाशिमचे जिल्हाधिकारी ऋुषीकेश मोडक यांची भेट घेतली आणि खोटे गुन्हे दाखल करून पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न आम्ही खपवून घेणार नाही असे स्पष्ट केले.सिध्दार्थ शर्मा यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांनी दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.यावेळी वाशिम जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष माधवराव अंभोरे,अकोला जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मिरसाहेब,परिषदेचे अमरावती विभागीय सचिव जगदीश राठोड यांनी पत्रकारांना मार्गदर्शन केले आणि परिषद सदैव पत्रकारांच्या पाठिशी असल्याचे स्पष्ट केले.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी हा विषय मुख्यमंत्र्यांच्या कानी घातला असून तहसिलदार वाघ यांची तातडीने बदली करावी अशी मागणी केली आहे.पत्रकारांवर खंडणीचे खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज बंद करण्याच्या प्रयत्नांचा मराठी पत्रकार परिषदेने तसेच पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने धिक्कार केला आहे.पत्रकार संरक्षण कायदा करण्यास सरकार टाळाटाळ करीत असल्याने असे प्रकार वाढीस लागले असून अधिकार्यांना सरकारचीच फूस आहे की,काय असा प्रश्न पडला असल्याचे मत एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केले आहे.