पत्रकारांनी पाहिलेले स्वप्न साकारताना …

0
966

पत्रकारांनी पाहिलेले  स्वप्न साकारताना …

एखादा विषय पत्रकारांनी हाती घेतला,त्यासाठी सतत पाच वर्षे लेखणी च्या माध्यमातून  आणि रस्त्यावर उतरून पाठपुरावा केला आणि अंतिमतः त्याचा तो लढा यशस्वी झाला याचं अलिकडंच्या काळातील उदाहरण म्हणून मुंबई -गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी कोकणातील पत्रकारांनी लढलेल्या लढ्याचं देता येईल.कोकणातील पत्रकार रायगड प्रेस क्लबच्या नेतृत्वाखाली एक झाले आणि त्यांना हा अनोखा लढा लढला.कोकणातून जाणारा मुंबई-गोवा हा एकमेव महामार्गा.हा रस्ता विविध कारणांनी मृत्यूचा सापळा बनला होता.दररोज रस्त्यावर सांडणारा रक्ताचा सडा पाहून प्रत्येक पत्रकारांच्या मनात कालवाकालव होत होती.लेखणीच्या माध्यमातून तर पत्रकार राजकारण्यांवर टीकेचे आसूड ओढत होतेच.मात्र कोडगे राजकारणी चांगल्या कामासाठी होणारी ही टीकाही गंभीरपणे घेत नव्हते.तेव्हा पत्रकारांनी रस्तयावर उतरून व्यवस्थेच्या विरोधात एल्गार पुकारण्याचं ठरविलं.त्यासाठी लोकशाहीनं दिलेल्या सर्व सनदशीर आयुधांचा वापर केला गेला.रस्ता रोको,उपोषणं,घेराव,निदर्शने,लाँगमार्च,मानवी साखळी,मशालमार्च अशा सर्वच सनदशीर मार्गानी पत्रकारांनी आंदोलनं केली.त्यासाठी मुंबईपासून दिल्लीपर्यत सरकार दरबारी फेर्‍याही मारल्या.विधानसभेत आवाज उठवावा यासाठी आमदारांची मनधरणी केली.हे सारं करताना बर्‍याचदा हेटाळणी आणि अनेकदा निंदाही पत्रकारांच्या वाट्याला आली.”रस्त्यावर उतरून आंदोलनं करणं हे काय पत्रकाराचं काम आहे काय”? अशी टीका काहीनी केली तर “पत्रकार आता पुढारी व्हायला निघालेत” असे टोलेही काहींनी मारले.आम्ही मात्र कोणत्याही टिकेला भिक न घालता निर्धारानं ही लढाई लढत होतो.निराश व्हावं,आंदोलन मध्येच सोडून द्यावं असेही प्रसंग आले पण प्रश्‍न कोकणातील जनतेच्या थेट जिविताशी निगडीत असल्यानं ही लढाई अर्ध्यावर सोडता येणारी नव्हती.त्यामुळं सर्व अडथळ्यांवर मात करीत आम्ही लढत राहिलो.सरकारनंही आमचा पाहता येईल तेवढां अंत पाहिला.पण अखेरीस सरकारला आमच्या आंदोलनाची दखल घ्यावीच लागली.2012 मध्ये पळस्पे ते इंदापूर या 84 किलो मिटरच्या पहिल्या टप्प्याचं कामाला मान्यता मिळाली.पण या कामालाही वेग नव्हता.जून 2014 पर्यंत जे काम पूर्ण होणं अपेक्षित होतं ते जानेवारी 2016 पर्यंत 35 टक्के देखील पूर्ण झालेलं नाही.त्यासाठी 2014 मध्ये पुन्हा आंदोलन करावं लागलं.या पार्श्‍वभूमीवर रत्नागिरीतील या  मार्गाच्या कामाचे  भूमिपूजन करताना नितीन गडकरी यांनी 2018 ची डेडलाईन दिलीय.त्याचं आम्ही स्वागत करतो.2018 नंतर या महामार्गावरून सुसाटपणे आणि निर्धोकपणे कोकणची सफर करता येणार आहे.त्यामुळं कोकणातील पर्यटन व्यवसायाला नक्कीच उर्जितावस्था येणार आहे.अपघातांची संख्याही घटणार आहे आणि वेळेचीही बचत होणार आहे.नितीन गडकरी सागरी महामार्गाबद्दलही बोलले आहेत.तो महामार्ग झाला तर गोवा मुंबईच्या अधिक जवळ येईल.तरीही मुंबई-गोवा महामार्गाचं महत्व कमी होणार नाही कारण हा महामार्ग कोकणची जीवन वाहिनी आहे.ही जीवन वाहिनी आता अधिक गतीमान होत असल्यानं त्यासाठी लढा उभारलेल्या पत्रकारांना नक्कीच आनंद झाला आहे.मी आज कोकणात नाही.पण या लढ्याचा मी देखील एक छोटा हिस्सा होतो त्यामुळं मी विशेष आनंदी आहे

.पत्रकाराचं वर्तन,पत्रकारांची कार्यशैली याबद्दल अनेकजण नाकं मुरडत असतात.पण मला वाटतं पत्रकारांनी काही चांगलं केलं तर त्यालाही दाद दिलीच पाहिजे.मुंबई-गोवा महामार्गासाठी पत्रकारांनी दिलेला लढा हा विषय नक्कीच कोकणातील पत्रकारांचं कौतूक करण्यासारखा आहे.पत्रकारांनी दाखविलेली एकजूट,पत्रकारांनी दाखविलेली चिकाटी आणि निर्धार या गोष्टी पत्रकारांच्या पाठिवर शाबासकीची थाप माराव्यात अश्याच आहेत ..पत्रकार लढत होते तेव्हा कोकणातील झाडून सर्वपक्षीय पुढारी पत्रकारांच्या या आंदोलनापासून चार हात दूर होते.साधं पाठिंब्याचं पत्रकही कोणी काढलं नाही.पत्रकारांनी तशी अपेक्षाही कधी केली नसली तरी आज काही राजकीय पक्ष ‘आम्हीच कोकणात रस्ता आणला’ म्हणून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करताहेत.आमचा त्याला विरोध नाही.कारण महामार्गचं काम कुणामुळं मार्गी लागतंय हे किमान कोकणी जनतेला तरी नक्कीच माहिती आहे.आज नितीन गडकरींचा रत्नागिरीतील कार्यक्रम पाहात असताना नक्कीच आनंद आणि समाधान वाटत होतं.पत्रकारांनी कोकणच्या महामार्गाचं स्वप्न पाहिलं ते आता साकरतंय ही पत्रकारांच्या कामाला मिळालेली मोठीच पावती आहे असं मला वाटतं.जाता जाता एकच अपेक्षा.कोकणचा हा मार्ग पत्रकारांच्या लढ्यातून साकारत असल्याने या मार्गाला कोकणातील एक सुपुत्र आणि आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर याचं नाव  देणं अधिक उचित ठरेल असं मला वाटतं.रस्त्याला ,पुलाला महापुरूषांची नावं देताना त्या नावामुळं मिळणार्‍या मतांचा विचार होतो.तसा विचार केला तर बाळशास्त्रींमुळं फार काही मतं मिळणार नाहीत.तरीही त्याच नावं दिलं तर त्यांचं स्मरण होईल आणि पत्रकारांनाही आनंद होईल.. (SM)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here