पत्रकारांनी घडविला चमत्कार…

0
2995

पाणीच पाणी चोहिकडे..

बातमी देणं एवढंच काही पत्रकाराचं काम असू शकत नाही.असू नये.समाजिक बांधिलकी जपत समाजासाठी काही कऱणं,त्यांच्या दुःखात धावून जाणं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे.अनेक मान्यवर संपादकांना सामाजिक बांधिलकी हे जोखड वाटत असलं तरी ग्रामीण प्रश्‍नांशी नाळ जुळलेल्या पत्रकारांना मात्र तसं वाटत नाही.म्हणूनच आपल्या हातातील लेखणीचा तर ते समाजासाठी वापर करीत असतातच त्याचबरोबर गरज भासेल तेव्हा हातात टिकाव आणि फावडं घेऊन रस्त्यावर उतरायलाही ही मंडळी मागं पुढं पहात नाही.मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असे अनेक जिल्हा आण तालुका पत्रकार संघ राज्यात आज वेगळ्या पध्दतीनं समाजसेवा करताना दिसत आहेत.या सर्वांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

आटपाडी हा सधन पश्‍चिम महाराष्ट्रातील कायम दुष्काळी तालुका आहे.पाऊस कमी पडतो हे तर आहेच पण या भागात पाणी -पुरवठयाच्या पाहिजे तश्या व्यवस्था झालेल्या नाहीत.सरकारवर अवलंबून न राहाता काही सामाजिक संघटना आता पुढाकार घेताना दिसत आहेत.यामध्ये आता पत्रकारही मागं नाहीत हे आटपाडी तालुका पत्रकार संघातील सर्व संवेदनशील पत्रकारांनी दाखवून दिलं आहे.या भागातलं पाण्याचं दुर्भिक्ष्य दूर करण्यासाठी दिघंची या गावानजिकचा ओढा रूंदीकरण आणि खोलीकरण आणि विस्तारीकऱणाचा प्रकल्प आटपाडीच्या पत्रकारांनी हाती घेतला.आरंभाला स्वतः पुढाकार घेऊन काम सुरू केलं.नंतर त्यांना असं सांगितलं गेलं की,नामची मदत मिळू शकते.नामशी संपर्क साधल्यानंतर त्यांना पोकलिंगची व्यवस्था झाली.सुरूवातीला त्याला लागणारं डिझेलही पत्रकारांनी भरलं मात्र नंतर सारं गाव एकत्र आलं आणि बघता बघता नऊ किलो मिटर परिसरात पाणीच पाणी दिसू लागलं.परतीचा चांगला पाऊस या भागात झाल्यानं खोदलेल्या ओढयात हे पाणी साचलं आहे.एवढं पाणी एकत्र पाहण्याची सवय नसलेल्या या परिसरातील लोक हे पाणी पाहून भान हरपून गेले नसतील तरच नवल.उद्या मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते या पत्रकारांचा तसेच इतरांचा सत्कार होणार आहे.मला या सोहळ्यात सहभागी होता येत नसलं तरी आटपाडीच्या पत्रकारांनी केलेलं हे काम नक्कीच पत्रकारांबद्दलचा समजाचा दृष्टीकोन बदलायाला लावणारं आहे.आटपाडीच्या पत्रकारांचा आम्हाला अभिमान आहे.सर्वांचे मनापासून अभिनंदन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here